हुंडा अन् कुप्रथांच्या विरोधातील संकल्प परिषदेचे निमंत्रण स्वारातीम विद्यापीठाने रद्द का केले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 09:13 AM2019-01-16T09:13:54+5:302019-01-16T09:14:58+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने गुणवत्तेबरोबरच आजवर सामाजिक भूमिका ठामपणे घेतली आहे. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी जाती-पातीच्या भिंती नसलेले गाव उभारण्याचा प्रयोग साकारला.
धर्मराज हल्लाळे
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने गुणवत्तेबरोबरच आजवर सामाजिक भूमिका ठामपणे घेतली आहे. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी जाती-पातीच्या भिंती नसलेले गाव उभारण्याचा प्रयोग साकारला. विशेष म्हणजे विद्यापीठ क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून जात विरहित समाज रचनेच्या राष्ट्रीय सेवाग्रामची पायाभरणी केली होती. मुळातच राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा जागृत करण्यासाठी कटिबद्ध आहेत. देशभरामध्ये सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक समाजसेवेचे धडे गिरवितात. एखाद्या गावात श्रमदानातून पर्यावरण संरक्षक काम करणे, स्वच्छता मोहीम राबविणे, पाणी आडवा पाणी जिरवा मोहीम आखणे अशी अनेक कामे विद्यार्थ्यांनी केली आहेत. मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांनी झोपडपट्ट्यांमधून संस्कार केंद्र चालविले आहेत. त्यापुढे जाऊन स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने औसा तालुक्यातील चलबुर्गा हे भूकंपग्रस्त गाव दत्तक घेतले. नैसर्गिक प्रकोपानंतर नव्याने गाव उभारताना जुन्या गावगाड्याप्रमाणे जातीच्या भिंती उभारण्यापेक्षा जात विरहीत गाव रचना उभारण्याचा संकल्प संस्थापक कुलगुरू डॉ. वाघमारे यांनी केला. त्याला विद्यार्थ्यांनी साथ दिली आणि चलबुर्गा हे राष्ट्रीय सेवाग्राम म्हणून पुढे आले. हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण असे की या विद्यापीठाला सामाजिक चेहरा आहे. विद्यापीठ हे लोकपीठ झाले पाहिजे ही भूमिका आहे. त्यातून विद्यार्थी घडले. केवळ भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत एवढी प्रतिज्ञा घेऊन चालत नाही तर त्या दिशेने कृती करावी लागते. प्रतिज्ञेला कृतिज्ञेची जोड द्यावी लागते. सारे भारतीय माझे बांधव आहेत असे आपण म्हणतो परंतु, माझ्या घराशेजारी माझ्या जातीचे लोक असले पाहिजेत ही पद्धत मी केव्हा बदलणार हाही प्रश्न पडला पाहिजे.एकंदर, अशा नाविण्यपूर्ण सामाजिक आशय असलेल्या उपक्रमांनी नांदेडच्या विद्यापीठाला देशात लौकिक मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेचा राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारचा पुरस्कार विद्यापीठाने मिळविला. सदर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेची उज्जवल परंपरा आहे. स्वयंसेवकांनी हुंडाविरोधी मोहीम आणि शपथविधीचे अनेक सोहळे केले आहेत. त्याच वाटेने जाणारा एक उपक्रम अर्थात जोडीदाराची विवेकी निवड युवा राज्यसंकल्प परिषद होती. लातूरमध्ये संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते आले होते. सोबत विद्यापीठ क्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने निमंत्रण पाठविले होते. सध्या नयनतारा सहगल पॅटर्न रूढ झाला आहे. त्याचीच पुनरावृत्ती करीत विद्यापीठाने २ जानेवारीला निमंत्रण पाठविले आणि ९ जानेवारीला रद्द केले.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांना युवा संकल्प परिषदेला जाण्यापासून का रोखले याचे उत्तर दिले पाहिजेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा आढावा व्यापक आहे. त्यातील युवक युवतींसाठी जोडीदाराची विवेकी निवड हे अभियान वर्षानुवर्षे चालविले जात आहे. हा राजकीय कार्यक्रम नाही. तो केवळ आणि केवळ युवक युवती केंद्रीत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होतील हीच भूमिका आहे. आयुष्याचा जोडीदार निवडताना हुंड्यासारख्या कुप्रथांपासून दूर राहिले पाहिजे हा विचार समाजाला योग्य दिशेने घेऊन जाणार आहे. त्याला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. शारीरिक, सामाजिक, व्यावहारिक निकष कसे तपासून पाहावेत याचे समुपदेशन केले जाते. विवाह संस्था योग्य दिशेने बळकट करणारा उपक्रम आहे. जाती धर्माच्या पलिकडे जाऊन युवा पिढी विचार करीत असेल तर त्याचे समर्थनही योग्य मार्गाने करणारी ही परिषद होती. केवळ आकर्षण लक्षात घेऊन भरकटणाऱ्या पिढीला दिशा देणारा विचार मांडला जातो. विवाहाच्या उंबरठ्यावर असताना योग्यता तपासायला सांगितली जाते. विवाह इच्छुक मुलगा अथवा मुलगी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का अर्थात अनुवंशिक आजार आहेत का ही चर्चा करणे अयोग्य कसे ठरू शकते. मुलाच्या कथित प्रतिष्ठेपेक्षा त्याला व्यसन नसणे आणि तो स्वत:ची जबाबदारी पार पाडू शकेल इतकी त्याची क्षमता असणे हे निकष समजावून सांगणारी युवा संकल्प परिषद चुकीची कशी ठरू शकते. एकूणच या परिषदेत सांगितला जाणारा प्रत्येक विषय आणि आशय मूल्याधिष्ठीत आहे. युवा पिढीला विचार प्रवृर्तक करणारा आहे. सद्मार्ग दाखवणारा आहे. हे सर्व विद्यापीठातील धुरीणांना समजत नाही, असे म्हणणे त्यांच्यावरही अन्याय करणारे आहे. अशावेळी निमंत्रणाचे परिपत्रक रद्द का झाले, याचा संबंध सध्याच्या राजकीय परिस्थितीशी जोडला जात असेल तर ते अधिक गंभीर आहे. त्यामुळे विद्यापीठाने उत्तर दिले पाहिजे. विद्यमान कुलगुरू नुतन आहेत. त्यांची भूमिका विद्यार्थी हिताची आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांचा आहे. तसेच नुकतेच निवृत्त झालेले कुलगुरूही विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी अशा उपक्रमांना सदैव समर्थन दिले. शेवटी एकच मुद्दा महत्वाचा आहे. ज्या सामाजिक भूमिकेतून नांदेडच्या विद्यापीठाची निर्मिती झाली त्याच विचारांना पुढे नेत संस्थापक कुलगुरूंनी मोठे काम उभे केले.तीच वाटचाल पुढे राहीली आणि यापुढेही रहावी हीच अपेक्षा आहे.