मृत्यूच्या दारात उभी ॲमी सांगते एक ‘सिक्रेट’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 07:01 AM2023-09-12T07:01:32+5:302023-09-12T07:08:10+5:30

‘मी ४९ व्या वर्षी मरणाच्या दारात उभी आहे; पण जसं आयुष्य मी जगले त्याबद्दल मला जराही पश्चात्ताप नाही!’, हे वाक्य आहे लेखिका ॲमी इटिंगरचं. तिच्या एखाद्या कादंबरीतलं हे वाक्य नाही. हे ती स्वत:बद्दल म्हणते आहे.

Standing at death's door, Amy tells a 'secret' | मृत्यूच्या दारात उभी ॲमी सांगते एक ‘सिक्रेट’

मृत्यूच्या दारात उभी ॲमी सांगते एक ‘सिक्रेट’

googlenewsNext

‘मी ४९ व्या वर्षी मरणाच्या दारात उभी आहे; पण जसं आयुष्य मी जगले त्याबद्दल मला जराही पश्चात्ताप नाही!’, हे वाक्य आहे लेखिका ॲमी इटिंगरचं. तिच्या एखाद्या कादंबरीतलं हे वाक्य नाही. हे ती स्वत:बद्दल म्हणते आहे. जगण्याशी घट्ट मैत्री करून मृत्यूला सामोरे जाण्याच्या तयारीत असलेल्या ॲमीला समोर उभ्या असलेल्या मृत्यूची ना भीती वाटते ना आपण हे जग लवकर सोडून चाललो याचं दु:ख. ॲमीची नजर आहे तिच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे. ॲमीला येणारा प्रत्येक क्षण समरसून जगायचा आहे.

लेखक, पत्रकार आणि शिक्षक असलेल्या ॲमीला मागच्या महिन्यात लिओमायोसारकोमा हा गर्भाशयाचा दुर्धर आणि दुर्मिळ कर्करोग  झाल्याचं निदान झालं. हा आजार चौथ्या टप्प्यात असून तिच्याकडे आता थोडेच महिने शिल्लक असल्याचं डाॅक्टरांनी नुकतंच तिला   सांगितलं आहे. आजाराचं निदान झालं तेव्हा ॲमीला धक्का बसला, दु:ख झालं. ती गोंधळली, तिला प्रचंड राग आला.  

पण हळूहळू ती शांत झाली. तिचं मन आतापर्यंत आयुष्यात आपण काय मिळवलं आणि अजून काय मिळवायचंय याचा हिशेब करू लागलं. या क्षणी तिच्या लक्षात आलं की, आपण जसे जगलो त्यामुळे आपल्याकडे कसलं दु:ख, कसला पश्चात्ताप करावा, असं काही नाहीच आहे.  आयुष्यातल्या आपल्या प्रिय माणसांना मनापासून ‘गुड बाय’ म्हणताना तिच्या जगण्याबद्दल तिला जे सांगावंसं वाटलं ते तिने मोकळेपणानं सांगितलं.

ॲमीची आयुष्याकडून काही ‘बकेट लिस्ट’  बकेट लिस्ट नाही. याचं कारण म्हणजे जे क्षण ॲमीच्या वाट्याला आलेत, ते ॲमीने भरभरून जगले. ॲमीच्या लेखी संधीला खूप महत्त्व. गेलेले पैसे परत मिळवता येतात, पण आयुष्य पावलागणिक जी संधी आपल्याला देते ती जर आपण गमावली तर ती पुन्हा येत नाही. त्यामुळेच ॲमीने तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण संधीसारखा जगला. लेखक म्हणून जगण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला आणि तिच्या नवऱ्याला खूप आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. तरीही आपण जगण्यापुरते पुरेसे पैसे कमावले, असं ॲमी म्हणते. 

ॲमीने पैसे कमावताना म्हातारपणाची तरतूद म्हणून मन मारून स्वत:च्या इच्छा बाजूला ठेवल्या नाहीत. पैसे आणि अनुभव यात ॲमीने कायम अनुभवाचीच निवड केली. प्रत्येक क्षणासाठी स्वागतशील या स्वभावामुळे आपल्या बकेट लिस्टमध्ये काही नाही  हे बघून ॲमीला खूप आनंद होतो.

ॲमी म्हणते, ‘जगण्याच्या प्रवासात माझी दमछाक झाली नाही. कारण मी स्वत:ला आहे तसं स्वीकारलं. मी अशी आहे हे जगापासून लपवून ठेवण्यासाठी मला कधीच झगडावं लागलं नाही. असं करताना लोक दुखावले, पण मी समोरच्याला जसं वाटतं तसं  करण्यासाठी इच्छेविरुद्ध वागले नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या माणसांनी माझ्यात बदल करण्याचा हट्ट धरला नाही. मला जसं आहे तसं त्यांनी स्वीकारलं. माझ्या जगण्यातला वेळ स्वत:ला लपवण्यात गेला नाही. मी अशी आहे असं सांगून मोकळी झाल्याने माझ्या आयुष्यात जी माणसं आली ती माझ्यावर खरंखुरं प्रेम करणारी आहेत!’ आणि म्हणूनच ॲमीला या सर्वांना गुड बाय म्हणावंसं वाटलं.

ॲमी म्हणते, ‘आयुष्याचा शेवट अगदी जवळ आलाय. शरीरात जे होतंय ते समजून घेणं अवघड जातंय. पण एक गोष्ट माझ्या आयुष्यानं शिकवली ती म्हणजे जो क्षण मिळतो तो जगून घ्यायला हवा. स्वत:च्या, निसर्गाच्या, आपल्या प्रिय माणसांच्या सहवासात आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण जगून घ्यायला हवा!’ ॲमी आता मृत्यू येईपर्यंतचे प्रत्येक क्षण ती ज्या प्रकारे जगत आली तशीच भरभरून जगणार आहे.  हे असं जगलं  की जगण्याबद्दल मग कुठली तक्रारच राहत नाही, असं ॲमीला वाटतं!  आता ॲमीला जे वाटतंय ते किती खरं हे बघण्यासाठी आपल्यालाही ॲमीसारखं आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणावर प्रेम करावं लागेल. करून पाहायला काय हरकत आहे, नाही का? 

तरीही ॲमी लेखकच झाली!
लेखक झालीस तर खाशील काय? कसं होणार तुझं? हेच ॲमीला प्रत्येकाने सांगितलं. पण ॲमीने जे ठरवलं तेच केलं. ‘स्वीट पाॅट : ॲन आइस्क्रीम बिंज अक्राॅस अमेरिका’ हे आइस्क्रीम आणि अमेरिकेतलं सांस्कृतिक नातं उलगडून सांगणारं पुस्तक पेंग्विन प्रकाशनाने प्रकाशित केलं आणि ॲमी लोकप्रिय लेखक झाली. आज या पुस्तकाची लेखक म्हणून ॲमीची मुख्य ओळख आहे. ॲमी न्यूयाॅर्क टाइम्स, न्यूयाॅर्क मॅग्झिन, द वाॅशिंग्टन पोस्ट, द हफिंगस्टन पोस्टसारखी आघाडीची दैनिकं आणि नियतकालिकातील वाचकप्रिय लेखक आहे.

Web Title: Standing at death's door, Amy tells a 'secret'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.