तारा
By admin | Published: April 4, 2017 11:49 PM2017-04-04T23:49:55+5:302017-04-04T23:49:55+5:30
किशोरीतार्इंचं स्थान ‘तिथे’. त्या सर्वोच्च ठिकाणी. तिथे आता नाही कुणी पोचू शकणार...
- अच्युत गोडबोले
किशोरीतार्इंचं स्थान ‘तिथे’.
त्या सर्वोच्च ठिकाणी.
तिथे आता नाही कुणी पोचू शकणार...
किशोरीताई गेल्या ! अजून त्यावर विश्वासच बसत नाहीए. परवाच म्हणजे खरोखरच काही आठवड्यांपूर्वी गानसरस्वती महोत्सवात त्या गायल्या होत्या. तेव्हा मी हजर होतो. या वयात त्या जे गायल्या, त्याला तोड नव्हती. त्यांचा हुसैनी तोडी अजूनही कानात रुंजी घालतोय. किशोरीताई तो कधीतरीच गायच्या. त्यांचे मियां की तोडी आणि बहादुरी तोडी मी असंख्य वेळा ऐकले होते आणि दोन्ही त्या अफलातून गायच्या. पण हुसैनीचा बाज वेगळा आहे. त्यात देसी रागही डोकावतो आणि त्यामुळे त्यात मला नेहमीच एक विनवणी, आर्जव दिसायचे. त्या सगळ्या मांडणीत कुठे तरी दु:खाची किनार असायची. त्या दिवशीही ती प्रकर्षाने जाणवली. सुरुवातीला ५-६ मिनिटे आवाज लागायला त्रास झाला. पण नंतरची आलापी जी सुंदर होती, त्याचा जबाब नव्हता. मला वाटलं, या वयात जर त्या असं गाऊ शकत असतील, तर आणखी दहा वर्षे तरी त्यांचं गाणं ऐकायला मिळणार.
...पण तसं व्हायचं नव्हतं. अचानक त्या आपल्यातून नाहीशा झाल्या आणि तेही खूप दूर.. कधीही न परतण्यासाठी.
माझं मन झर्रकन ५0 वर्षं मागे गेलं. मी आयआयटीत होतो, तेव्हा त्यांची एक एलपी रेकॉर्ड आली होती. एका बाजूला जौनपुरी होता, तर दुसऱ्या बाजूला पटबिहाग आणि भैरवी. जौनपुरीतील बजे झनक ही बंदिश ऐकली आणि किशोरी आमोणकर हे नाव माझ्या मनावर कोरलं गेलं, ते कायमचंच. त्यातलं ते आर्जव, त्यातली आलापी, त्यातल्या त्या चपळ ताना आणि द्रुत हे सारं बेफाट होतं. पटबिहागचं तसंच. कुमार गंधर्व हाच राग लंकेश्री म्हणून गात. त्यातली कोयलिया ना बोले ही भैरवी तर अतिशय सुंदर होती.
मग किशोरीतार्इंच्या घरी येणं-जाणं सुरू झालं. त्यांच्याकडे गेलं की वेळ कसा गेला, हे कळायचंच नाही. त्या काळी त्यांच्या घरी आतल्या खोलीत प्रफुल्ला डहाणूकरांनी काढलेलं मोगूबार्इंचं एक उत्कृष्ट चित्र होतं. त्या खोलीत आम्ही बसायचो. तिथेच एकदा हृदयनाथ मंगेशकर किशोरीतार्इंना ‘जाईन विचारीत रानफुला’ची चाल शिकवत होते.. तेव्हा मीही तिथे हजर होतो. असे किती क्षण सांगावेत! आज त्या सगळ्या आठवणी दाटून आल्या आहेत.
किशोरी आमोणकरांचं घर आणि आमचं घर यांच्यात तिहेरी संबंध होते. एक तर माझे वडील आणि किशोरीतार्इंचे यजमान रवि यांची फक्त ओळखच नव्हती, तर ते बोर्डाच्या परीक्षेला परीक्षक म्हणून बरेचदा एकत्रही असायचे आणि राहायचे. दोघंही गणिताचे शिक्षक. दुसरा दुवा म्हणजे माझी बहीण सुलभाताई ही मोगूबाई कुर्डीकरांकडे आणि किशोरीतार्इंकडे गाणं शिकत होती आणि तिसरा दुवा म्हणजे मला किशोरीतार्इंचं गाणं बेहद्द आवडत असल्यामुळे आदर, मैत्री, स्नेह, प्रेम या सगळ्या भावनांतून मी त्यांच्याकडे अनेकवेळा जात असे. गेल्यावर मोगूबाई प्रसन्न चेहऱ्यानं माझं स्वागत करत तेव्हा खूपच झकास वाटायचं.
किशोरीताईही मला खूपच प्रेमानं वागवत. ‘अरे अच्युता...’ अशी त्या वाक्याची सुरुवात करत. त्यांच्या गाण्याविषयी मला एक नेहमी वाटायचं, अजून वाटतं, त्या स्वत:ला मोगूबार्इंच्या शिष्या, जयपूर-अत्रोली घराण्याची गायिका असं जरी म्हणवून घेत असल्या, तरी त्या सगळ्या घराण्यांच्या मर्यादा केव्हाच ओलांडून गेल्या होत्या. लयबद्ध गाणं, लयीच्या ताना वगैरे जयपुरी थाट त्यांच्या गाण्यात होताच, पण त्यांची संथ आलापीनं रागाची मांडणी करणं हे मला प्रचंड भावायचं. त्यामुळे त्यात मला किराणा घराणंही दिसायचं. त्या कुठलाही राग गाताना पहिल्यांदाच खर्जापासून तारसप्तकापर्यंत त्या रागातले सगळे सूर मांडायच्या; तेव्हा त्या रागाचं स्वरूप आणि रागाचं भावविश्व हे प्रथम श्रोत्यांसमोर उभं राहायचं आणि मग खर्जापासून एकेक सुराला गोंजारत रागाची इमारत उभी करायच्या. त्यामुळे कुठल्याही सुराचं संपूर्ण रागाशी आणि त्यातल्या इतर सुरांशी काय नातं आहे ते चटकन कळायचं आणि त्यामुळे द्रुत चालू होईपर्यंत आपण त्या रागाच्या वातावरणात चिंब भिजलेलो असायचो.
रागाचं वातावरण कलेकलेनं तयार करून त्यात न्हाऊ घालणं, त्याचे सूर श्रोत्यांच्या मनात रेंगाळत ठेवणं हा आणि हाच शास्त्रीय रागसंगीताचा हेतू आणि अंतिम ध्येय त्याही मानायच्या आणि मीही. त्यामुळेच त्यांचं गाणं मला सर्वोत्कृष्ट वाटायचं. त्यात नुसतंच वैचित्र्य किंवा वैविध्य नसायचं. उगाचच प्रयोगशीलता असावी म्हणून काहीतरी करणं नसायचं आणि ‘सिंगिंग फॉर द गॅलरी’ तर नसायचंच. त्यामुळे नको तिथे ताना मारणं, एकदम तारसप्तकात आवाज कसा पोहोचतो, तो पेटीबाहेर कसा जातो हे दाखवणं किंवा एकदम खर्जातला स्वर काढणं, त्यातल्या कोलांटउड्या असले प्रकार त्यात नसायचे. त्या रागाची मूर्ती उभी करणं हे आणि हेच त्या गाण्याचं उद्दिष्ट असायचं. म्हणूनच मला ते भावायचं.
एकदा आठवतंय, सुरेश हळदणकरांच्या घरी दादरला किशोरीतार्इंचं गाणं होतं. मी त्या गाण्याला हजर होतो. सुबोध जावडेकरही त्या गाण्याला हजर होता असं अंधुकसं आठवतंय. भीमपलास पूरिया धनाश्री आणि इतर काही असं त्या गायल्या होत्या. भीमपलासची ‘रे बिरहा जमना सगुन बिचारो’ अशी चीज होती. भीमपलासमधलं ते दुपार आणि संध्याकाळ यांच्यामधलं पहुडलेलं, कशाची घाई नसलेलं पण विनवणीचं, आर्जवाचं रूप त्यांनी इतकं भन्नाटपणे उभं केलं होतं की जेव्हा ‘रंगसो रंग मिलाये’ ही द्रूत बंदिश चालू झाली तेव्हा लोक चक्क नाचायचेच बाकी राहिले होते. असा भीमपलास मी आयुष्यात ऐकला नव्हता. त्यांच्या अनेक मैफलीत असा अनुभव यायचा.
पूर्वी किशोरीताई मुंबईला गोवालिया टँकपाशी अशर मॅँशनमध्ये राहत. मी तिथे त्यांना भेटायला जाई. नाना चौकातून वळून गोवालिया टँकला जाऊन मग मी अशर मॅँशनला पोहोचे. त्याच सुमारास काही काळ त्यांचा आवाज ठीक नसल्यामुळे त्यांनी गाणं बंद केलं होतं. त्यावेळी डोळ्यात पाणी आणून माझ्याशी त्या त्याविषयी एकदा बोलल्या होत्या. मनात चर्र झालं होतं. भारतातल्या एका महान गायिकेच्या वाट्याला हे का यावं? पण नंतर सगळं ठाकठीक झालं आणि त्यानंतर पुन्हा त्यांचं ते अफलातून गाणं ऐकायला मिळालं तेव्हा किती ग्रेट वाटलं होतं!
त्यांनी नंतर प्रभादेवीला प्रस्थान केलं. काही काळ त्या विलेपार्ल्यातल्या हायवेजवळच्या जयविजय सोसायटीतही राहायला आल्या होत्या. या प्रत्येक ठिकाणी मी त्यांच्याकडे अनेकदा गेलोय. पुलंच्या नारायणासारखा कुठे काही लागलं तर मी हजर असेच.
मला भीमसेनांचे अभंग, कुमारांची भजनं, मेहंदी हसनच्या आणि बेगम अख्तरच्या गझला खूप आवडायच्या. किशोरीताई गझल का गात नाहीत, असा मला प्रश्न पडे. एकदा तसं मी त्यांना सरळ विचारलं. तेव्हा फक्त मी समोर बसलेला असताना त्यांनी मला दोन गझला म्हणून दाखवल्या. त्या इतक्या अफलातून होत्या की त्या ऐकून तर मी सर्दच झालो. यानंतर मी त्यांच्याकडे गझलांचा हट्टच धरला. त्या क्वचित माझ्यापाशी गुणगुणायच्या. पण बाहेर मात्र त्या गायल्या नाहीत.
एकदा ज्ञानेश्वरीतल्या अभंगांना त्यांनी चाली लावल्या होत्या. त्यावेळी त्या पार्ल्याच्या जयविजयमध्ये राहायच्या. मी तिथे गेलो असताना मला म्हणाल्या. ‘‘अरे अच्युता, ही चाल कशी वाटते बघ रे!’’ आणि त्यांनी ‘जियेचा अंबुवा रुसोनिया जाये’ हा अभंग गाऊन दाखवला. त्यात जयजयवंती होता. तो इतका सुंदर होता की मला राहवलंच नाही. म्हटलं, ‘‘हा तर सुंदरच आहे. पण ताई, तुम्ही मैफलीत जयजयवंती फारसा का गात नाही?’’
एकतर मला जयजयवंती खूप आवडायचा. हा राग किशोरीतार्इंच्या आवाजात ऐकायला किती सुंदर वाटेल असं वाटायचं आणि पुढे एकदा मी त्यांच्या मैफलीत बसलोय हे लक्षात आल्यावर असेल कदाचित पण त्यांनी जयजयवंती सुरू केला. इतका सुंदर जयजयवंती मी ऐकलेलाच नव्हता. झिंझोटीचंही असंच. एकदा त्यांनी तो मैफलीत गायलेला ऐकला आणि वाटलं की झिंझोटी यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.
किशोरी आमोणकर या माझ्या मते आतापर्यंतच्या शास्त्रीय संगीतातला सर्वात मोठा तारा आहे. यापुढेही गायक-गायिका गात राहतील आणि चांगलंही गातील; पण पुन्हा किशोरीताई होणं नाही, यात शंकाच नाही.
(शास्त्रीय संगीताचे रसज्ञ आणि ख्यातनाम लेखक)