तारे जमींपर...

By admin | Published: January 21, 2017 12:15 AM2017-01-21T00:15:02+5:302017-01-21T00:15:02+5:30

नाशकात घडविलेल्या नवनिर्माणाचे कौतुक करण्यासाठी मराठी तारे-तारकांना पाचारण करण्याची वेळ यावी

The stars on the floor ... | तारे जमींपर...

तारे जमींपर...

Next


नाशकात घडविलेल्या नवनिर्माणाचे कौतुक करण्यासाठी मराठी तारे-तारकांना पाचारण करण्याची वेळ यावी, हीच बाब पुरेशी बोलकी असून, राज ठाकरे यांचा गड सुरक्षित नसल्याची जाणीव करून देणारीही आहे.दुसऱ्यांनी लिहून दिलेले संवाद स्वमुखे बोलून दाखविणे हाच ज्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे, त्यांनी एकीकडे या व्यवसायाशी इमान राखतानाच आपण राज ठाकरे यांच्याशीही कसे इमानी आहोत याचेच दर्शन नाशकात येऊन घडविले. राज ठाकरे यांनी नाशकात केलेल्या (?) विकासकामांची प्रशंसा करणारे जे संवाद या तारे-तारकांनी बोलून दाखविले त्यामागे व्यक्तिगत राज यांच्यावरील स्नेह आणि प्रेमाची भावना होती, की मनसेच्या चित्रपट शाखेचा धाक; या वादात न पडता म्हणायचे तर, आपल्या दर्शनाने नाशिककर पुन्हा ‘मनसे’कडे वळतील असा गोड गैरसमज मात्र नक्कीच होता.
एकीकडे राज ठाकरे यांनी मराठी सिनेमातील तारे-तारका गोळा करुन त्यांच्या तोंडून स्वत:ची प्रशंसा वदवून घेतली त्याच सुमारास ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी नाशकातील कालिदास कलामंदिरातील भीषण वास्तवाचे सप्रमाण वाभाडे काढले. हे कलामंदिर महापालिकेच्या तर सध्या महापालिका राज ठाकरे यांच्या मालकीत आहे, हे विशेष. दामले यांनी लक्षात आणून दिलेल्या रास्त वास्तवावर अंतर्मुख होण्याऐवजी राज यांचे चेले अमेय खोपकर जेव्हां धमकीची भाषा करतात तेव्हां ते केवळ व्यक्तिगत राज ठाकरेच नव्हे तर मनसेच्या पायाखालील वाळू घसरल्याचेच लक्षण मानावे लागते. परिणामी मराठी तारे-तारकांचे ‘पॉलिटिकल टुरिझम’ घडवून आता जी ‘बूंदसे गई वह हौद से नही भर सकती’ हे राज यांच्या लक्षात येईल अशी अपेक्षा बाळगण्यातही मतलब नाही.
तसे पाहाता नाशकात राज ठाकरे यांच्या समोर आज भुजबळ वा तुल्यबळ प्रतिस्पर्धी नाही. भाजपा-शिवसेनेची ‘हवा’ भलेही जोरात असेल, पण या पक्षांकडे स्थानिक पातळीवर संपूर्ण शहराला भावेल असा खात्रीचा चेहरा नाही. भाजपाकडे नाशकातील तीन व ग्रामीणमधून निवडून आलेले परंतु शहरात रहिवास असलेले एक, असे एकूण चार आमदार आहेत. पण या चौघांची चार दिशांना असलेली मुखकमले नाशिककरांनी वेळोवेळी पाहून झालेली आहेत. या स्थितीत महापालिकेतील गेल्या पंचवार्षिक सत्ताकाळात मनसेने करून दाखविल्याची जोड लाभून गेली असती तर कदाचित आजचे चित्र वेगळेच राहिले असते.
राज यांच्या नवनिर्माण सेनेने कारकीर्द संपतासंपता काही लोकार्पण केल्याचा युक्तिवाद यासंदर्भात करणारे करतीलही. या प्रकल्पांनी शहराच्या सौंदर्यात भर पडली हेदेखील खरेच. पण यासाठी पूर्ण पाच वर्षे गेली. पालिकेतील आपल्या पक्षाच्या मुखंडांना अन्य काही करता आले नाही म्हणून राज यांना वैयक्तिक लक्ष घालून साकाराव्या लागलेल्या या बाबी. याखेरीज काय वा कोणता विकास, या प्रश्नाचे उत्तर शोधूनही न मिळणारे आहे. उलट विकास घडून आला असता व त्या बळावर पुन्हा निवडणुकांना सामोरे जाता येण्याचा विश्वास असता तर या पक्षाचे तब्बल २८ नगरसेवक पक्ष सोडून चालते झाले नसते. शिवाय ज्याला मनसेच्या पहिल्या महापौरपदाचा लौकिक प्राप्त करून दिला त्यानेही ‘टर्म’ संपताच पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला नसता. तेव्हा राज ठाकरे वा त्यांच्या मनसेचे नाशकातील जे काही अपयश आहे ते या सर्व बाबीतून उघड होणारे आहे.
महत्त्वाचे म्हणजे एकीकडे असे धक्के बसूनही व संघटनात्मक विकलांगावस्था समोर येऊनही राज ठाकरे मात्र आपला पक्ष केडरबेस असल्याचे म्हणत आहेत. उणिवांची कबुली देणे तर दूर, पण सत्यही न स्वीकारण्याच्या या पद्धतीला राजकीय अरेरावीच म्हणता यावी. त्यांच्या हाकेसरशी ‘ओ’ देणारे माजी आमदार वसंत गिते पक्षातून बाहेर पडले होते तेव्हाही ते प्रकरण अशाच अरेरावीतून हाताळले गेले होते. अन्यथा पुढील काळात इतकी पडझड झाली नसती. नाशिककर भरभरून प्रेम देतात, पण अरेरावी वाढली तर जमिनीवरही आणून ठेवतात हा भुजबळांपासून अनेकांच्या बाबतीतला इथला अनुभव आहे. तेव्हा भुजबळ आज प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात समोर नसले तरी त्यांचा अनुभव राज ठाकरे यांनी लक्षात घ्यायला हरकत नसावी.
- किरण अग्रवाल

Web Title: The stars on the floor ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.