नव्या अध्यायाचा प्रारंभ

By रवी टाले | Published: December 27, 2019 08:10 PM2019-12-27T20:10:31+5:302019-12-28T12:00:00+5:30

ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणल्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे एका नव्या युगात प्रवेश करणार आहे आणि त्याचे अनेक दृश्य परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत.

Start of a new chapter | नव्या अध्यायाचा प्रारंभ

नव्या अध्यायाचा प्रारंभ

Next
ठळक मुद्दे सध्या भारतात मालगाड्या ताशी सरासरी २५ किलोमीटर वेगाने धावतात.मालगाड्यांच्या वेगात चौपटीने होऊ घातलेली वाढ भारतीय रेल्वेचे चित्र आमुलाग्र बदलवू शकते!दोन समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांचे काम हाती घेण्याचे सुतोवाच करण्यात आले.

भारतीय रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाचे, म्हणजेच ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे सफल परीक्षण गुरुवारी पार पडले आणि एका नव्या अध्यायाचा प्रारंभ झाला. नव्या अध्यायाचा प्रारंभ यासाठी, की सध्या भारतात मालगाड्या ताशी सरासरी २५ किलोमीटर वेगाने धावतात. गुरुवारी पार पडलेल्या परीक्षणादरम्यान मालगाडीने चक्क ताशी शंभर किलोमीटर वेग गाठला होता. मालगाड्यांच्या वेगात चौपटीने होऊ घातलेली वाढ भारतीय रेल्वेचे चित्र आमुलाग्र बदलवू शकते!
भारताने १९९१ मध्ये खुल्या अर्थव्यवस्थेचा अंगिकार केला आणि त्याच सुमारास माहिती तंत्रज्ञान उद्योगानेही चांगलेच बाळसे धरले. या दोन्ही घडामोडींचा परिपाक म्हणून भारताने विकासाच्या एका नव्या पर्वात प्रवेश केला. तोपर्यंत तीन ते चार टक्क्यांच्या दरम्यान घुटमळणारा विकास दर सहा ते सात टक्क्यांच्या घरात पोहचला. सध्याच्या घडीला विकासाचा वेग बराच मंदावला असला, तरी तो तसा कायमस्वरुपी राहणार नाही आणि पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन वेगाने धावू लागेल, हे निश्चित आहे. कोणतीही अर्थव्यवस्था वेगाने वाढत असते, तेव्हा कच्च्या व पक्क्या मालाच्या वाहतुकीमध्ये वाढ होणे स्वाभाविकच असते. तशी ती भारतातही झाली. दुर्दैवाने वाढती माल वाहतूक हाताळण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासाकडे प्रारंभी लक्ष दिले गेले नव्हते. त्यामुळे एकीकडे महामार्गांची दुर्दशा झाली, तर दुसरीकडे रेल्वेमार्गांवर कोंडी वाढली.
भारतात रेल्वेचे आगमन झाल्यापासून प्रवासी व मालवाहू गाड्या एकाच मार्गावरून धावतात. वाहतूक कमी होती तोपर्यंत ते चालून गेले; मात्र प्रवासी आणि माल वाहतुकीमध्ये वाढ झाल्यामुळे हल्ली रेल्वेमार्गांवर प्रचंड कोंडी होत आहे. परिणामी एकीकडे मागणी व गरज असूनही प्रवासी रेल्वेगाड्यांची संख्या वाढवता येत नाही, तर दुसरीकडे माल गंतव्य स्थळी पोहचण्यातही विलंब होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अखेर अकराव्या पंचवार्षिक योजनेत पूर्व आणि पश्चिम अशा दोन समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांचे काम हाती घेण्याचे सुतोवाच करण्यात आले.
पश्चिम समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदरापासून उत्तर प्रदेशमधील दादरीपर्यंत, तर पूर्व समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग पंजाबमधील लुधियानापासून पश्चिम बंगालमधील दानकुनीपर्यंत असेल. याशिवाय २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण आणि पूर्व किनारपट्टी असे नामकरण करण्यात आलेल्या आणखी तीन समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांच्या उभारणीची घोषणा करण्यात आली. याव्यतिरिक्त दक्षिण-पश्चिम असे नामाभिधान करण्यात आलेल्या आणखी एका समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाच्या उभारणीचेही नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग सुवर्ण चतुष्कोन मालवाहू रेल्वेमार्ग योजनेचा भाग असतील.
गुरुवारी चाचणी घेण्यात आलेला मार्ग पश्चिम समर्पित मालवाहू रेल्वेमार्गाचा भाग होता. एकूण १६७६ किलोमीटर लांबीच्या या मार्गाचा ३५० किलोमीटर लांबीचा टप्पा तयार झाला असून, लवकरच त्यावरून मालगाड्या धावायला प्रारंभ करतील. भारतात सध्याच्या घडीला प्रवाशी व मालगाड्या एकाच मार्गावर धावतात. त्यातही मालगाड्यांचा सरासरी वेग ताशी अवघा २५ किलोमीटर प्रती तास एवढाच आहे. परिणामी मालगाड्या प्रवासी गाड्यांच्या मार्गात अवरोध निर्माण करतात. प्रवासी गाड्यांना पुढे काढण्यासाठी मालगाड्यांना रोखून धरावे लागते. त्यामुळे माल गंतव्य स्थळी पोहचण्यात अतोनात विलंब होतो. परिणामी व्यापारी व उद्योजक नाराज होतात. शिवाय प्रवासी गाड्याही पूर्ण वेगाने चालवता येत नाहीत. या पाशर््वभूमीवर समर्पित मालवाहू रेल्वेमार्ग उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. एकदा का हे मार्ग पूर्ण झाले, की प्रवासी व मालवाहू या दोन्ही प्रकारच्या गाड्यांच्या सरासरी वेगात चांगलीच वाढ होईल. शिवाय मालगाड्या हटल्यामुळे विद्यमान रेल्वेमार्गांवर आणखी प्रवासी गाड्या चालविता येतील. त्यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल.
समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांवर केवळ विजेवर चालणाऱ्या इंजिनच वापरले जातील आणि या मालगाड्या सरासरी ताशी शंभर किलोमीटरच्या वेगाने धावतील. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन भारतीय उद्योग जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यात सक्षम होतील. समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांवरील मालगाड्या शंभर टक्के विजेचाच वापर करणार असल्याने डिझेल इंजिनमुळे होणारे प्रदुषण कमी होऊन, पॅरिस करारान्वये भारताने प्रदुषण कपातीचे जे लक्ष्य मान्य केले आहे ते साध्य करण्यासही मदत होईल. नव्या तंत्रज्ञानाचा विकास, सध्याच्या घडीला फार यशस्वी न ठरलेल्या रो रो सेवेचा यशस्वी विस्तार, असे अनेक अनुषंगिक लाभदेखील समर्पित मालवाहू रेल्वेमार्गांमुळे होणार आहेत. थोडक्यात, ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणल्यानंतर प्रथमच भारतीय रेल्वे एका नव्या युगात प्रवेश करणार आहे आणि त्याचे अनेक दृश्य परिणाम आगामी काळात बघायला मिळणार आहेत.

 

Web Title: Start of a new chapter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे