राजकीय चकवा

By admin | Published: June 15, 2016 04:26 AM2016-06-15T04:26:57+5:302016-06-15T04:26:57+5:30

मध्यंतरी दानवेंच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष येणार अशी चर्चा होती. ती चर्चा होती की आवई? कारण मध्येच ती हवेत विरली. दानवेंनी तिला ‘चकवा’ दिला की, ती दानवेंसाठी ‘चकवा’ होती हे गूढच आहे.

State Chakwa | राजकीय चकवा

राजकीय चकवा

Next

- सुधीर महाजन

मध्यंतरी दानवेंच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष येणार अशी चर्चा होती. ती चर्चा होती की आवई? कारण मध्येच ती हवेत विरली. दानवेंनी तिला ‘चकवा’ दिला की, ती दानवेंसाठी ‘चकवा’ होती हे गूढच आहे.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली; असे म्हणण्यापेक्षा सर्व पक्षांसाठी सोयीसोयीने पार पाडली गेली, असे म्हणावे लागेल. तिकडे ठाण्यात डावखरे पराभूत झाले. परिषदेवर कोणाला पाठवायचे हे प्रकरण संपले; आता मंत्रिमंडळ विस्ताराचे बिगुल पुन्हा वाजायला लागले आहे. विधान परिषदेची निवडणूक संपल्यानंतर विस्तार होईल असे सांगितले गेले. आता तीसुद्धा पार पडली. मराठवाड्याच्या वाट्याला काय येणार हा प्रश्न साहजिकच या निमित्ताने पुढे येतो. शिवाय परिषदेवर निवडून आलेल्या नावांचाही विचार होईल का? कारण मंत्रिपदासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेत आणि आता तर जोरदार फिल्डिंग सुरू झाली. परवा जालन्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या बंगल्यावर मराठवाड्यासह बाहेरच्या आमदारांची वर्दळ वाढली होती आणि अशीच गर्दी भोकरदनमध्ये होती. आपली गोटी फिक्स करण्यासाठी सारेच प्रयत्न करताना दिसतात. दानवेही ‘चकवा’ देण्यात माहीर आहेत. मुद्दा मंत्रिमंडळ विस्तार आणि मराठवाड्याचा निघतो, त्यावेळी मंत्रिपद हे लोकांचे काम करण्यासाठी आहे, याची जाणीव व्हायला पाहिजे. ते काही शोभेचे पद नाही. मराठवाड्यातील दुष्काळ हटेल, अशी आशा आहे; पण हा विस्तार पूर्वीच होऊन मराठवाड्यातील मंत्र्यांची संख्या वाढली असती, तर कामांना अधिक वेग आला असता, ती पूर्ण झाली असती, याचा अर्थ मराठवाड्यात आता काम नाही, असाही नाही.
विधान परिषदेवर उस्मानाबादचे सुजितसिंग ठाकूर गेले. ते गोपीनाथ मुंडेंचे कार्यकर्ते, निवडणुकीपूर्वी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेचे नियोजन त्यांच्याकडेच होते. त्यांच्या रूपाने उस्मानाबादेतून भाजपाचा पहिला आमदार विधिमंडळात पोहोचवला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही तयारी असली तरी नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली. ठाकूर हे प्रदीर्घ काळापासून पक्षाच्या कार्यकारिणीत आहेत आणि प्रदेशाध्यक्ष नियुक्तीच्या वेळी रावसाहेब दानवेंसोबत त्यांच्याही नावाचा विचार झाला होता. यावरून त्यांचे संघटन कौशल्य लक्षात येते.
या विस्ताराच्या निमित्ताने भाजपामधील राजकारणाने वेग घेतला. गट-तट सक्रीय झाले आणि शह-काटशहात रंगत आली. ही पतंगबाजी उघडी पडू नये याचेच प्रयत्न श्रेष्ठींकडून होत आहेत. विस्तारामध्ये संभाजी पाटील निलंगेकर, विनायक मेटे आणि अर्जुन खोतकर या तीन आमदारांच्या नावांची चर्चा असून, खोतकर हे एकटेच सेनेचे आहेत, तर संभाजी पाटील हे सरकार सत्तेवर आल्यापासून ‘वेटिंग’मध्ये आहेत. प्रश्न विनायक मेटेंचा. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली तर ती पंकजा मुंडेंना निश्चित आवडणार नाही. त्यांच्यातील राजकीय भाऊबंदकी जाहीर आहे. मेटेंनी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्याला पंकजा फिरकल्या नव्हत्या आणि परवा गोपीनाथ गडावर झालेल्या गोपीनाथ मुंडेंच्या कार्यक्रमाकडे मेटेंनी पाठ फिरविली होती. मेटेंचा समावेश झालाच तर तो पंकजांना बीड जिल्ह्यात शह देण्यासाठी असेच समजले जाईल. किंबहुना तो सिग्नल असेल. संभाजी पाटील निलंगेकरांची वर्णीदेखील पंकजा मुंडेंची शक्ती कमी करणारी ठरू शकते. एक तर त्या लातूरच्या पालकमंत्री आहेत. त्यांचा साखर कारखानाही लातूर जिल्ह्यात आहे. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे संभाजी हे नातू. निलंगेकरांना मानणारा वर्ग लातूरमध्ये आहे. इकडे जालन्यातून अर्जुन खोतकर मंत्रिमंडळात गेले तर बबनराव लोणीकरांनंतर ते दुसरे मंत्री असतील. या विस्ताराने ‘कहीं खुशी कहीं गम’चा माहोल बनणार, सवते सुभे संपुष्टात येतील. मध्यंतरी दानवेंच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्ष येणार अशी चर्चा होती. ती चर्चा होती की आवई? कारण मध्येच ती चर्चा हवेत विरली. दानवेंनी तिला ‘चकवा’ दिला की, ती दानवेंसाठी ती ‘चकवा’ होती हे गूढच आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारसुद्धा चकवाच ठरु नये.

Web Title: State Chakwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.