अम्मांची आणि दीदींची राजकीय पुनर्परीक्षा

By admin | Published: May 13, 2016 03:16 AM2016-05-13T03:16:29+5:302016-05-13T03:16:29+5:30

वरवर बघता जयललिता आणि ममता बॅनर्जी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, जसे की इडली-सांबार आणि माछेर झोल आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता

State examinations of Ammochi and Didi | अम्मांची आणि दीदींची राजकीय पुनर्परीक्षा

अम्मांची आणि दीदींची राजकीय पुनर्परीक्षा

Next

राजदीप सरदेसाई, (ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)
वरवर बघता जयललिता आणि ममता बॅनर्जी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत, जसे की इडली-सांबार आणि माछेर झोल आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या पोस गार्डनमध्ये राहणाऱ्या स्वयंघोषित सम्राज्ञी आहेत. त्यांना एकटेपणा आवडतो, त्यांच्यापर्यंत पोहोचणेसुद्धा अवघड असते आणि त्यांचे राहणीमान ऐश्वर्य संपन्न आहे. याउलट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना स्वत:ला सर्वसामान्यांची नेता म्हणून प्रदर्शित करणे आवडते. त्यासाठी त्या सुरकुतलेली साडी आणि चप्पल घालून नेहमीच रस्त्यावर लढा देण्याच्या तयारीत असल्याचे दाखवत असतात. जयललिता या कॉन्व्हेंट शाळेत शिकलेल्या आणि चित्रपट अभिनेत्री होत्या, ज्यांनी एम.जी. रामचंद्रन यांचा राजकीय वारसा हातात घेतला आहे. ममता बॅनर्र्जी मात्र बाहेरच्या आणि कालीघाटच्या परिसरातून पुढे आलेल्या तसेच कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या आहेत. सध्या या दोन्हीही नेत्या निवडणुकांना परत एकदा सामोरे जात आहेत. त्यांचे समान वैशिष्ट्य कोड्यात पाडणारे आहे. कारण त्या दोन्हीही सध्याच्या भारतीय राजकारणात आशा आणि निराशेच्या प्रतीक झाल्या आहेत.
जयललिता आणि ममता दोघींनी आपापला पक्ष कठोर नियंत्रणात ठेवला आहे. त्यांच्या पक्षात दुसऱ्या क्रमांकाचा नेता कोण आहे हे कुणीही सांगू शकत नाही. किंवा त्यांचा वारस कोण असेल याचाही अंदाज कुणी लावू शकत नाही. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत निवडणूक प्रचाराचे वृत्तांकन करताना मी एकही प्रचार पत्रकावर अण्णा द्रमुकच्या किंवा तृणमूल कॉँग्रेसच्या अन्य कुणा नेत्याचे छायाचित्र बघितलेलेच नाही. दोन्हीही पक्षात त्यांना सर्वोच्च स्थान आहे, दुसऱ्या कुठल्याही पर्यायी नेतृत्वाला शून्य जागा आहे. कॉँग्रेसमध्ये आई आणि मुलाच्या हातात सत्ता आहे तर भाजपात नरेंद्र मोदी काहीवेळा नेतृत्व अमित शहांना तर काहीवेळा अरुण जेटली यांच्याकडे देत असतात. अम्मा आणि दीदी यांच्याविषयी त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकप्रतिनिधींमध्ये आदरयुक्त भीती आहे. तुम्ही जर एखाद्या अण्णा द्रमुकच्या खासदाराला टीव्हीवरील कार्यक्रमात बोलावले तर तो लगेच म्हणतो मला अम्मांना विचारावे लागेल आणि नंतर तो दिसेनासा होतो. तृणमूल कॉँग्रेसचे स्थानिक नेते त्या मानाने बोलायला उत्सुक असतात; पण एखाद्याने जर नेतृत्वाविषयी हलकीशी नाराजी जरी जाहीर केली तरी त्याला माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांच्यासारखा पक्षातून घरचा रस्ता धरावा लागतोच. कदाचित, नेतृत्वाची ही कठोर आणि अस्थिर पद्धत जाणून-बुजून पक्षातील पुरुष मंडळींना सतत नियंत्रणात ठेवण्यासाठी जपली गेली असावी. जयललिता यांचा पक्षावर असलेल्या जबरदस्त पकडीचे प्रातिनिधिक छायाचित्र होते. माजी मुख्यमंत्री ओ पनीरसेलवन यांनी त्यांना घातलेला दंडवत. ममता त्यांच्या पक्षावरच्या नियंत्रणाचे सार्वजनिक प्रदर्शन करीत नाहीत; पण खासगीत त्यांच्या पक्षाचे नेते दीदींच्या सेवेत नेहमीच तत्पर असतात. दोघांची राज्य करण्याची पद्धत लोकानुयायी आणि आर्थिकदृष्ट्या अविचारी आहे. जयललिता यांच्या मोफत देण्याच्या कार्यक्र मात एक रुपयात इडली देणाऱ्या अम्मा कॅन्टीनपासून मिक्सर, ग्राइण्डर, स्मार्टफोन आणि यावेळी स्कूटर देण्यापर्यंतचा समावेश होतो. हे दुसरे तिसरे काहीच नसून मतदारांना लाच दिल्यासारखेच आहे. बॅनर्जी यांनी मोफत देण्याऐवजी दुसरा मार्ग अवलंबलेला आहे, त्यात त्या दोन रुपये किलोने तांदूळ, सवलतीच्या दरात औषधे, विद्यार्थिनींसाठी मोफत सायकल आणि मदरश्यांना अनुदान देतात. परिस्थिती अशी असेल तर मग तामिळनाडू आणि बंगाल ही राज्ये आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत याचे आश्चर्य वाटायला नको.
दोन्ही नेत्यांनी शहरी मध्यमवर्गीयांचा वाढता रोष ओढवून घेतला आहे. दोन्हीही नेत्यांच्या बाबतीत मध्यमवर्गात असे बोलले जाते की दोन्हींचा कारभार बेजबाबदार आहे आणि त्यांच्या कारभाराच्या काळात भ्रष्टाचार फोफावला आहे. चेन्नईतील एक व्यावसायिक मला कुठल्या वरिष्ठ राजकीय नेत्याचे किती दर आहेत ते सांगत होता. कोलकात्यात एक जण मला प्रबळ स्थानिक व्यावसायिक हितसंबंधांविषयी सांगत होता. हे लोक माफिया पद्धतीने कारभार करत असतात आणि पक्षाच्या नावाने पैसा गोळा करत असतात. जयललितांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आता परिचयाचे झाले आहेत. पण ममता मात्र सत्तेवर आल्या त्या प्रामाणिक राजकारण्याची प्रतिमा घेऊन. मागील वर्षी मात्र शारदा चिट फंड घोटाळ्यात आणि नारदा स्टिंग आॅपरेशनमध्ये त्यांचे आमदार पैसे घेताना कॅमेरात कैद झाले होते, त्यामुळे ममतांची प्रतिमा भ्रष्ट झाली आहे. दोन्हींमध्ये कितीही उणिवा असल्यातरी अम्मा आणि दीदी या जनसमूहाच्या नेत्या आहेत. दोन्हीही नेत्यांनी त्यांची गरिबांचे पाठीराखे अशी प्रतिमा जपून ठेवली आहे. अपवाद मात्र जयललिता यांच्या मद्याच्या धोरणावर आहे. या धोरणामुळे त्यांच्या प्रतिमेला थोडा तडा गेला आहे; पण त्यामुळे त्यांना चूक सुधारण्यासाठी मद्यावर संपूर्ण बंदी घालावी लागली आहे. ममतांची मां, माटी, मानुष ही घोषणा आता पोकळ वाटत असली तरी त्या अजूनही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या नेत्या म्हणून कायम आहेत.
दोघांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी बरेच चढाव आणि उतार बघितले आहेत. पण त्यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ संघर्ष कधीच सोडलेला नाही. ममता बंगालमध्ये डाव्यांसोबत एकट्याच लढत होत्या तर जयललिता कधी कारागृहात तर कधी बाहेर राहत होत्या. कठीण काळातील त्यांचा लवचिकपणा म्हणजे त्यांची सत्तेविषयी असलेली आसक्ती आहे; पण त्याचसोबत ते याचेही द्योतक आहे की कशाप्रकारे त्यांनी अडचणींवर विजय मिळवला आहे. दोघांनाही फायदा याचा आहे की त्यांचे मुख्य विरोधक औचित्यासाठी संघर्ष करीत आहेत. डीएमके-कॉँग्रेस युतीचे नेतृत्व ९३ वर्षीय एम.करु णानिधी यांच्याकडे आहे, कदाचित त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक असेल. तिकडे पश्चिम बंगालमध्ये डावे आणि कॉँग्रेसमधील युती निव्वळ उद्गिग्नेतून झाली आहे. सगळ्याच निवडणूक चाचण्या असे सुचवत आहेत की जयललिता आणि ममता पुन्हा सत्तेत येतील. त्या जिंकल्या किंवा हरल्या तरी एक गोष्ट निश्चित आहे की त्यांचे राजकीय अस्तित्व आहे तसेच राहील.
ताजा कलम : २०१६ हे वर्ष अम्मा आणि दीदी यांची परीक्षा घेणारे आहे. पुढीलवर्षी आणखी अशाच एका व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या पक्षात सर्वोच्च असलेल्या महिला नेत्याचा संघर्ष बघायला मिळेल. हे व्यक्तिमत्त्व आहे मायावती यांचे, त्यांना बहेनजीसुद्धा म्हणतात, त्यांनाही कमी लेखून चालणार नाही. या तिन्ही महिला नेत्या तीन देवीया आहेत. त्या भारतातील निवडणुकांच्या राजकारणातील प्रबळ व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत. त्याचबरोबर त्या वाढत्या सत्तावादाच्या आणि नैतिक भावशून्येतेकडे झुकणारे व्यक्तिमत्त्वदेखील आहेत.

Web Title: State examinations of Ammochi and Didi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.