... हा तर राजकीय आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 04:40 PM2019-06-25T16:40:36+5:302019-06-25T16:41:45+5:30

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे

... this is the state suicide | ... हा तर राजकीय आत्मघात

... हा तर राजकीय आत्मघात

Next

मिलिंद कुलकर्णी
भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिलेला राजीनामा आणि त्यानंतर डॉ.संजीव पाटील यांची त्या पदावर झालेली निवड हा घटनाक्रम अनपेक्षित नसला तरी सत्ताधारी बनलेल्या पक्षातील अंतर्गत खळबळ दर्शविणारा आहे. वाघांची शिकार केल्याचा आव कुणी आणत असले तरी मुळात वाघ यांचा हा राजकीय आत्मघात आहे, असेच म्हणावे लागेल.
राजकीय पक्षांमध्ये सदासर्वकाळ एका नेत्याची सत्ता अबाधीत राहत नाही. काळ, परिस्थिती बदलत जाते, तसे नेतृत्वाचेही होत जाते. चाणाक्ष नेते परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊन हालचाली करतात, स्वत: बदलतात किंवा बंडाचा झेंडा हाती घेऊन परिस्थिती अनुकूल बनवितात. हल्ली बंडाचा झेंडा घेऊन परिस्थिती बदलण्याएवढी ताकद नेत्यांमध्ये राहिलेली नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथराव खडसे या नेत्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला, पण फारसे यश हाती लागले नाही. ही पार्श्वभूमी पाहता स्मिता आणि उदय वाघ या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या उच्चशिक्षित दाम्पत्याकडून मोठ्या अपेक्षा असताना असे घडणे दुर्देवी आहे. मूळात राजकारणात एखाद्या दाम्पत्याची यशस्वी वाटचाल हा दुर्मिळ योग असतो. स्व. शरद्चंद्रिकाआक्का व डॉ.सुरेश पाटील, स्व.गोजरताई व रामरावदादा पाटील, प्रतिभाताई पाटील व डॉ.देवीसिंह शेखावत ही सन्माननीय उदाहरणे खान्देशात आहेत. महिलांसाठी आरक्षणाची तरतूद नसताना या महिला नेत्यांनी स्वकर्तृत्वाने राजकारणात स्वत:चा ठसा उमटविला. त्यांच्या यशात पतीसह संपूर्ण कुटुंबियांचेही मोठे योगदान होते, हे नाकारुन चालणार नाही.
अलिकडे महिलांसाठी आरक्षणाची तरतूद झाल्यानंतर अनेक महिला नेत्यांनी राजकारणात सक्रीय सहभाग नोंदविला असला तरी त्यात राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिलांची संख्या मोठी आहे. वाघ दाम्पत्यामध्ये आमदार स्मिता वाघ यांचे तसे नाही. उदय आणि स्मिता वाघ या दोघांनी विद्यार्थी चळवळीपासून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. स्वकर्तुत्वावर दोघांनी यश मिळविले. स्मिता या भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांपासून प्रदेशाध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, विधान परिषद सदस्य अशी वाटचाल राहिली. उदय वाघ यांनी ग्रामपंचायत, जिल्हा बँक संचालक, बाजार समिती सभापती या पदांपासून जिल्हाध्यक्षपदाची दुसरी कारकिर्द अशा चढत्या भाजणीने यश मिळविले.
विद्यार्थी परिषद, रा.स्व.संघ यांची पार्श्वभूमी असल्याने या दोन्ही नेत्यांनी उत्तम जनसंपर्क आणि नेत्यांशी ऋणानुबंध जोडले. त्यामुळे विधान परिषदेची उमेदवारी असो की, लोकसभेची...अनेकांना मागे सारत त्यांनी ही कामगिरी बजावली होती. विशेषत: एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष या नात्याने उदय वाघ यांनी संघटनेची सूत्रे यशस्वीपणे हाताळली. जिल्हा बैठकांमधील वादळी चर्चा, प्रशिक्षण कार्यशाळांवर मुक्ताईनगर, बोदवड शाखांचा बहिष्कार अशा प्रसंगातून वाट काढत वाघ यांनी संघटनात्मक कार्यावर परिणाम होऊ दिला नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पालिका आणि आता लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशाची कमान चढती ठेवण्यात जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही.
परंतु, एकीकडे यश मिळत असतानाच संघटनेत एकाधिकारशाही, घराणेशाही, आरोप यांची मालिकादेखील सुरु झाली. विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद आल्यानंतर वाघ दाम्पत्याचे वजन स्वाभाविकपणे वाढले. पाटील यांच्याशी घनिष्टता असताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यापासून मात्र दुरावा निर्माण होऊ लागला. महाजन यांचे मुख्यमंत्र्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, संकटमोचक म्हणून निर्माण झालेली प्रतिमा, पक्षातील वाढलेले वजन लक्षात घेता हा दुरावा ठेवणे अयोग्य होते. आधी खडसे दुरावले असताना जिल्ह्यातील महाजन गटापासून अंतर राखणे हे वाघ दाम्पत्याला महागात पडले. लोकसभेची उमेदवारी मिळविताना महाजन यांना विश्वासात न घेतल्याने त्याचे परिणाम दिसून आले. अमळनेरात माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांना झालेली मारहाण वाघ यांच्या राजकीय आत्मघाताला कारणीभूत ठरली. पक्षसंघटनेत काम करताना प्रत्येकवेळी मनासारखे होतेच असे नाही, श्रध्दा आणि सबुरी हे गुण दीर्घकाळाच्या राजकारणाच्यादृष्टीने यशाचे गमक असतात. पक्षाने यापूर्वी भरभरुन दिलेले असताना काहीवेळा दिलेला नकार पचविण्याची ताकद, मनाचा मोठेपणा ठेवायचा असतो. तसे न घडल्याने अशी वेळ येते. राजकारण किती निर्दयी असते याचा अनुभव या प्रकाराने अधोरेखीत झाला. उमेदवारी कापली गेल्यानंतर ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ असे जे वर्णन वाघ दाम्पत्याने केले होते, त्याची प्रचिती त्यांच्या राजीनाम्याने पुन्हा एकदा आली.

Web Title: ... this is the state suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.