पुण्यात शिकायला आलेल्या ‘या’ मुलींना दोन वेळचे जेवण मिळेल?
By श्रीनिवास नागे | Published: December 26, 2023 07:48 AM2023-12-26T07:48:19+5:302023-12-26T07:50:17+5:30
उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या मुली सध्या विचित्र चिंतेत आहेत - गावाकडे दुष्काळाच्या झळा असताना आई-बापाकडे पैसे कसे मागावे?
श्रीनिवास नागे, वरिष्ठ वृत्तसंपादक, लोकमत, पिंपरी-चिंचवड
जालना जिल्ह्यातली अरुणा काकुळतीला आलेली. ती एमपीएससी करतेय. आई-बाप शेतमजूर. लेकीला शिकवायचं म्हणून पोटाला चिमटा घेऊन पुण्यात शिकायला पाठवलंय. ती शिकणार, फौजदार होणार, हे त्यांचं बापुडं स्वप्न; पण तिचा झगडा वेगळाच. आयुष्याशी लढायचं, पोटात अन्नाचा कण नसताना पुस्तकं वाचायची, की स्पर्धेत टिकण्यासाठी तयारी करायची..? पार मेंदूचा भुगा झालाय. गावाकडं दुष्काळ पडलाय, मग महिन्याचं खोलीभाडं, खानावळीचं बिल, क्लासची फी भागवायला घराकडून पैसे कसे मागायचे? चहा-नाश्त्याचे फाजील लाड न करता ती एकवेळच कशीबशी जेवतेय.
संजीवनीचंही तसंच. कोरोनात वडील गेल्यानंतर जिगरबाज आईनं शिकायला पुण्यात पाठवलंय. बीड जिल्ह्यातल्या कोपऱ्यातल्या गावात राहणाऱ्या आईला फोनवरून महिन्याच्या खर्चाचं सांगावं, तर ती कुणापुढं तरी हात पसरणार. आधीच दीडेक लाखाचं कर्ज डोक्यावर. त्यामुळं संजीवनीने सकाळी वडापाव खाल्ला की थेट रात्री स्वस्तातल्या मेसचं जेवण!
महात्मा जोतिबा फुल्यांनी जिथं पहिली मुलींची शाळा सुरू केली, त्या विद्येचं माहेरघर बनलेल्या पुण्यातलं हे प्रातिनिधिक चित्र. उच्च शिक्षणासाठी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून पुण्यात आलेल्या सावित्रीच्या लेकींची ही फरफट.
मराठवाड्यातून येऊन एमपीएससी, यूपीएससी करणाऱ्या हजारभर पोरी पुण्यातल्या पेठांमध्ये राहातात. लेकरं शिकवून शहाणी करण्यासाठी आई-बाप हाडाची काडं करतात. त्यातही पोरींना शिकवायचंच म्हणून पै-पाहुण्यांच्या टीकेचा आगडोंब सांभाळत पुण्याला पाठवतात. काही पोरी स्वत:च हिमतीनं पुढचं पाऊल टाकतात, तर काहींचे भाऊ-बहिणी त्यांना इथं पाठवायचं धाडस करतात; पण पदरात एक-दोन एकर रान असलेल्यांच्या, नाही तर दुसऱ्याच्या रानात राबणाऱ्यांच्या, कुठं तरी मजुरी करणाऱ्यांच्या पोरींनी ‘लै शिकायचं’ स्वप्न बघायचंच नाही का, असा रोकडा सवाल या पोरी करताहेत. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत राज्यभरात २०७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मोबाइल, पेट्रोलच्या विक्रीत आणि दरात दोन-अडीचशे टक्क्यांनी वाढ होत असताना, शेतमालाचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत.
शेती तोट्याची झाली, त्यात हा अस्मानी फेरा! हे सोसून पोरीला शिकायला बाहेर ठेवायचं तर कमाईचा आणि खर्चाचा हाता-तोंडाशी गाठ घालण्याचा घोर. कॉलेज आणि क्लासची काहीच्याबाही फी, राहण्या-जेवण्याची तजवीज, पुस्तकं-कपडेलत्त्याची व्यवस्था, हे सगळं करायचं कसं, पैसा आणायचा कुठून, या काळजीनं या पोरींचं आयुष्य करपून चाललंय. दोन-अडीचशे मैलावरच्या आई-बापाची आसवं त्यांना हलवून सोडताहेत. पुण्यात विद्यार्थ्यांचं खोलीभाडं चार-पाच हजारांवर गेलंय, दोन वेळच्या मेसला पाच हजार लागतात. बाकीच्या खर्चाला चार-पाच हजार पुरत नाहीत. कॉलेज-क्लासची फी-पुस्तकं यांचं तर विचारूच नका!
मराठवाडा मित्रमंडळाची चार शिक्षण संकुलं पुण्यात आहेत. तीसेक हजार मुलं-मुली शिकतात. त्यात बहुसंख्य मराठवाड्यातलीच. इंजिनिअरिंग आणि तत्सम विद्याशाखा सोडल्या तर इतर विभागातल्या मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहं नाहीत. मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब जाधव सांगतात, ‘मराठवाड्यातल्या काही उद्योजकांनी एकेक विद्यार्थी दत्तक घेऊन खर्च उचललाय. पुण्यात स्वस्तात राहण्या-खाण्याच्या सोयी आहेत; पण तुटपुंज्या. गरजेपेक्षा खूपच कमी. गरजू आणि होतकरू विद्यार्थांसाठी विद्यार्थी सहायक समितीकडून वसतिगृहाची उभारणी होतेय. त्यांना आम्ही अडीच कोटींचा निधी दिलाय.’
पुण्यात शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त विद्यार्थांना ‘स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स’ ही संस्थाही मदत करते. त्यांच्याकडं नोंदणी करणाऱ्यांना दोनवेळचं जेवण मोफत देणं सुरू झालं आहे. भाऊसाहेब जाधव सांगतात, ‘दुष्काळी भागातले पालक सजग झालेत. मुलींना शिकायला पुण्याला पाठवतात.या गरीब मुलींना स्वस्तात सोयी-सुविधा मिळत नाहीत. शिवाय एमपीएससी करणाऱ्या मुलींकडं ‘प्लॅन बी’ तयार नसतो. अपयश पदरात पडलं की, पुढं काय करायचं, हे ठरलेलं नसतं. गावाकडं गेलं की घरचे लोक लग्न लावून देणार, हे माहीत असतं. वय वाढत असतं. त्यामुळं आई-बापाच्या काळजाला घरं पडत असतात...’
एकूणच पुण्यात शिकायला आलेल्या मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त मुलींची परवड ठरलेली. त्यांच्या वसतिगृहांची गरज अधोरेखित होते आहे. या मुलींना पुढचे काही महिने मोफत मेस मिळावी, कमवा आणि शिका योजनेच्या रकमेत वाढ करावी, सरसकट विद्यार्थ्यांच्या हाताला एकवेळ काम द्यावे, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ व्हावी, या मागण्यांचा टाहो फोडला जातोय. तो सरकारच्या कानापर्यंत जाईल काय?