मुक्काम पोस्ट महामुंबई; मोदींचा दौरा, नेत्यांमधील कार्यकर्त्याचा मृत्यू

By अतुल कुलकर्णी | Published: February 13, 2023 07:37 AM2023-02-13T07:37:51+5:302023-02-13T07:38:24+5:30

काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, असे सांगितले जात होते. ते विधान भाजपच्या बाबतीत खरे होऊ नये, असे वरिष्ठ नेत्यांना वाटते.

Stay Post Mahamumbai; Modi's visit, death of activist among leaders | मुक्काम पोस्ट महामुंबई; मोदींचा दौरा, नेत्यांमधील कार्यकर्त्याचा मृत्यू

मुक्काम पोस्ट महामुंबई; मोदींचा दौरा, नेत्यांमधील कार्यकर्त्याचा मृत्यू

googlenewsNext

अतुल कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी महिनाभरात दुसऱ्यांदा मुंबईला येऊन गेले. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्त्यावरील वाकोला ते कुर्ला आणि एमटीएनएल ते एलबीएस उड्डाणपुलाच्या उन्नत मार्गाचे, तसेच मालाडमधील कुरारगाव भुयारी मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन झाले.  मुंबई ते सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचाही शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. आणखी काही दिवसांनी पंतप्रधान पुन्हा मुंबई येणार आहेत. त्यांच्या हस्ते आणखी काही विकासकामांचे उद्घाटन करण्याचे नियोजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी यात सरकारची भूमिकाही महत्त्वाची आहे. जोपर्यंत निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत वेगवेगळ्या कामांची उद्घाटने करून घेण्यावर सरकारने भर दिला आहे. अर्थातच भाजपला मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता हवी आहे, हे लपून राहिलेले नाही. इतके दिवस या इच्छाशक्तीच्या आड उद्धव ठाकरे यांची शिवसेना येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुंबई महापालिकेत तसे फारसे कोणी नाही. आजही मुंबईतील अनेक आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदे यांना एकहाती सत्ता हवी आहे. त्या ठिकाणी भाजपचे म्हणावे तसे वर्चस्व नाही. दोघांसाठी ही तशी विन विन सिच्युएशन आहे. या दोघांच्याही इच्छाशक्तिला मूर्त स्वरूप येण्यासाठी निवडणुका होणे गरजेचे आहे. ज्या व्हायला तयार नाहीत. त्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळत असलेली सहानुभूती आडवी येत आहे. परिणामी दोन्ही महापालिकेत सध्या प्रशासक असल्याने अप्रत्यक्षपणे सरकारचेच राज्य आहे. निवडणूक घेऊन, कोण निवडून येतो, याची परीक्षा घेण्यापेक्षा, विना निवडणूक दोघांनाही दोन्ही महापालिकेत सत्ता राबवायला मिळत असेल, तर निवडणुकांचा आग्रह आम्ही कशाला धरावा? अशी बोलकी प्रतिक्रिया भाजपमधील नेते देत आहेत. 

खरी गंमत पुढेच आहे. महापालिका असो अथवा विधानसभा. दोन्ही ठिकाणी निवडणूक कोणाच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार? हा मिलियन डॉलरचा प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली होणार आहेत. लोकांच्या मनात आजही मोदी यांची प्रतिमा कायम आहे. त्यामुळे लोकसभेला प्रश्न येणार नाही. खरी अडचण विधानसभेला होणार आहे. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोण? या प्रश्नाचे उत्तर भाजपला द्यावे लागेल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे सांगितले तर एकनाथ शिंदे नाराज होतील. शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली तर शिंदेंच्या नाराजीपेक्षा भाजपला शंभर टक्के यश मिळेल का? असा सवाल खुद्द भाजप नेत्यांमध्येच आहे. महाराष्ट्रात सध्या जे चालू आहे तसेच चालू राहिले तर आपण जिंकून येऊ का? महाराष्ट्रात पुन्हा आपले सरकार येईल का? याविषयी भाजप नेत्यांच्या मनात शंका आहे.  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकहाती सत्ता जाणार असेल, असा विश्वास वाटला तरच महाराष्ट्रात भाजपला यश मिळेल, असे काही नेत्यांना वाटते. काही नेत्यांच्या मते, महाराष्ट्रात भाजपने मराठा चेहरा पुढे केला पाहिजे. त्याचा कसा फायदा होईल, याची गणितं काही नेत्यांनी मांडणे सुरू आहे. चिन्हांचे घोळ झाले तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार भाजपच्या तिकिटावर उभे राहिले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असेही सांगितले जात आहे. राजकारणात जर तरला अर्थ नसतो. मात्र, राजकीय वातावरण निर्मितीसाठी राजकीय नेत्यांना अशा चर्चा हव्याच असतात. 

या चर्चेचे आणि वातावरणाचे परिणाम मुंबई महापालिका निवडणुकीवर नक्की होतील. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. आता नाही तर पुन्हा कधीच नाही, अशी त्यांच्यासाठी परिस्थिती आहे. त्यामुळे महापौरपदाचा उमेदवार कोण इथपासून ते प्रत्येक वॉर्डामध्ये कोणाला उभे करायचे इथपर्यंत भाजपची पडद्याआड तयारी सुरू आहे. अर्थातच या अभ्यासात शिंदे गटाचा हस्तक्षेप भाजपला आवडणारा नसेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर आजतरी इच्छुक उमेदवारांना नेमका कोणासोबत संपर्क वाढवावा, हा प्रश्न पडला आहे. भाजपच्या इच्छुक उमेदवारांना स्थानिक आमदार, मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ओळखीसाठी फिल्डिंग लावावी लागत आहे. नेमके कोणत्या आमदारामार्फत गेलो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जवळ जाता येईल, याची चाचपणी सुरू आहे. अनेकांनी मधला मार्ग म्हणून श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क वाढवणे सुरू केले आहे. भाजपमध्येदेखील काँग्रेस कल्चर वाढीला लागले आहे. नेत्यांचे सुप्त गट वेगाने कार्यरत होत आहेत. त्यामुळेच कदाचित नाशिकच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांमधील कार्यकर्ता मेला तर भाजपची काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही, या शब्दांत नेत्यांची कान उघाडणी केली आहे. काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते, असे एकेकाळी सांगितले जात होते. ते विधान भाजपच्या बाबतीत खरे होऊ नये, असे वरिष्ठ नेत्यांना वाटले तर नवल नाही...

Web Title: Stay Post Mahamumbai; Modi's visit, death of activist among leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.