दगड मारण्यास कारण की....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 10:34 AM2019-07-21T10:34:33+5:302019-07-21T10:41:10+5:30
लोकलवर दगड मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमल्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने केली. त्यानंतर लोकलवर दगडफेक होण्याच्या घटनात वाढ झाली.
विनायक पात्रुडकर
लोकलवर दगड मारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमल्याची घोषणा दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने केली. त्यानंतर लोकलवर दगडफेक होण्याच्या घटनात वाढ झाली. हा योगायोग म्हणावा की रेल्वे प्रशासनाला दिलेले खुले आवाहन. अशा घटना घडण्याला रेल्वे प्रशासनदेखील जबाबदार आहे हे नव्याने सांगायला नको. गेल्या काही वर्षांत मुंबईवर झालेले अतिक्रमणही या घटनांना पोषक ठरले आहे. रेल्वे हद्दीत एक फेरफटका मारला तरी तेथील सुरक्षारक्षक हटकतात आणि याच हद्दीच्या शेजारी अनधिकृत झोपड्या उभ्या आहेत. बहुतांश रेल्वे स्थानक, रूळांशेजारी झोपड्यांचे जाळे आहे. या अनधिकृत झोपड्यांना वीज, पाणी मिळते़ त्यामुळे अशा झोपड्यांची आकडेवारी दुप्पटीने, तिप्पटीने वाढली आहे. याला अर्थातच राजकीय नेत्यांचे, स्थानिक गुंडांचे व भ्रष्ट अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. येथे राहणारे कोण आहेत, हे शोधले तर बहुतांश परप्रांतीय आहेत. हा भेदभाव स्थानिक व परप्रांतीय असा नाही, तर गरीबी व श्रीमंती असाही केला जातो आहे. त्यात समाधान मानणे हे प्रत्येकालाच जमत नाही.
मानवी प्रवृत्तीची सतत धडपड सुरू असते काही ना काही मिळवण्याची. या स्पर्धेत नैराश्य येते. अपयशाचे खापर फोडण्यासाठी कोणी तरी हवा असतो. अशा परिस्थितीतून समाजकंटक तयार होतात व लोकलवर दगड फेकण्याच्या घटना घडतात. अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने वारंवार दिले आहेत. त्यानुसार कारवाई देखील होते़ ही कारवाई तात्पूरती असते़ काही दिवसांनी पुन्हा तेथे झोपड्या उभ्या राहतात. गेली चार दशके या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. अधिकारी कितीही शिस्तीचा असो त्याची कारवाई कधीही यशस्वी झाली नाही. एवढच काय तर घाटकोपर स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झोपड्यांमध्ये वेश्या व्यवसाय चालतो. त्याला पोलिसांपासून सर्वांचेच अभय आहे. असे प्रकार रेल्वे रूळाशेजारी सुरू असतील तर समाज घातक घटना कशा रोखल्या जाणार, असा प्रश्न आहे.
प्रवासात हवा घेण्यासाठी रेल्वे प्रवासी दरवाजात उभे असतात. हवा घेण्याच्या नादात एक दगड येतो आणि गंभीर दुखापत करतो. मात्र अशा घटना थांबायला हव्यात व ती सर्वस्वी जबाबदारी रेल्वेचीच आहे. संपूर्ण देशात मुंबईतून सर्वाधिक महसूल रेल्वेला मिळतो. तरीही मुंबईकरांना सोयी सुविधा मिळत नाहीत़ किमान प्रवाशांना प्रवासात दगड लागणार नाही, याची तरी काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायला हवी. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. संपूर्ण जगातील पर्यटक येथे येतात. त्यामुळे लाजेखातर तरी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवयाला हवी. कारण परदेशात अशा घटना घडत नाहीत, हे वेगळे सांगायला नको. तेव्हा प्रवाशांचे हित व सुरक्षा रेल्वेने जपायला हवी.