परिचितांची लांडगेशाही रोखण्याचे आव्हान !
By किरण अग्रवाल | Published: December 26, 2019 12:29 PM2019-12-26T12:29:10+5:302019-12-26T12:45:31+5:30
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी समाजमन अस्वस्थ झाले आहे
- किरण अग्रवाल
देशात विविध ठिकाणी घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिला हिंसाचाराचा व त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करता येईल, याचा विषय सध्या चर्चेत आला आहे खरा; पण या अशा घटनांतील बाह्य व्यक्तींच्या त्रासाबरोबरच कुटुंबातीलच अगर परिचितांकडून होणाऱ्या छळाच्या प्रकारांतून कसे बचावता यावे हादेखील चिंतेचा मुद्दा ठरला आहे; कारण सुरक्षेची खात्री म्हणून समाजमान्य असलेल्या ज्या कुंपणांकडे पाहिले जाते, ती कुंपणंही काही ठिकाणी शेत खाऊ लागल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. कायद्याच्या धाकाखेरीज ढळू लागलेली नैतिकता व अस्तंगत होऊ पाहणारे सामाजिक भय याकडे लक्ष वेधले जाणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी समाजमन अस्वस्थ झाले आहे, अशा प्रकरणातील आरोपी हाती लागताच कायदा हाती घेऊन त्याला शिक्षा देण्याचे प्रकारही घडू लागल्याने समाजाची चीड किती टोकाला पोहोचली आहे हे लक्षात यावे. अर्थात, याबाबतीत पोलीस खात्यानेही सजग होत विविध शहरांत निर्भया पथके नेमून महिलांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष पुरविले आहे. याबाबत कायदेशीर उपायांखेरीज जनजागृती मोहीमही हाती घेण्यात आली असून, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने नाशकात एक चर्चासत्रही घेण्यात आले. यात ‘मर्दानी’ चित्रपटात पोलीस अधिका-याची भूमिका साकारणा-या राणी मुखर्जीसह मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. याचपाठोपाठ नाशकात तिसरी महिला हिंसाचारमुक्ती परिषदही पार पडून त्यात एकूणच महिलांच्या हिंसेबाबत व्यापक मंथन घडून आले. या विषयाची गंभीरता व त्याची घेतली जात असलेली दखल यानिमित्ताने अधोरेखित व्हावी. पण हे होत असताना विशेषत: स्वकीय, आप्तेष्ट अगर परिचितांकडून जे अत्याचार होतात, ती लांडगेशाही रोखण्याचेही मोठे आव्हान असल्याचे दुर्लक्षिता येऊ नये.
पित्यानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या वार्ता अधून-मधून समोर येतात तेव्हा नात्याला काळिमा फासला गेल्याची चर्चा घडून येते. तसेही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अधिकतर घटनांमध्ये आरोपी हा परिचितच असतो हे वेळोवेळी आढळून आले आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीची नाशकातीलच एक घटना घ्या, पैसे कमाविण्याच्या हेतूने एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीला देहविक्रीसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदविली गेली आहे. याप्रकरणी पीडितेच्या पित्यासह सावत्र आईसही अटक केली गेली आहे. या प्रकाराकडे प्रातिनिधिक म्हणून बघता यावे. नैतिकतेचा कडेलोट घडविणा-या या प्रकारांमुळे समाजाची किती अधोगती होत चालली आहे हे तर लक्षात यावेच, परंतु कायद्याचा धाक न बाळगण्याबरोबरच समाजाचे म्हणून असणारे भयही आता कुणी बाळगेनासे झाल्याचेही यातून स्पष्ट व्हावे. चिंता व चिंतनाचाही मुद्दा हाच आहे. का व कशामुळे होतोय हा -हास?
आज प्रत्येकच जण मी व माझ्यात गुरफटला आहे. शेजारी काय चालले आहे याच्याशी कुणाला काही देणे-घेणे उरलेले नाही. स्वयंकेंद्री एकारलेपण यातून बळावत चालले आहे. नवीन पिढीच नव्हे, तर ज्येष्ठांनीही स्वत:हून आपल्या मर्यादा आखून घेतल्या आहेत. त्यामुळे चुकीचे काही करणाऱ्यांना दटावणारेच कुटुंबात व समाजातही कुणी उरले नाही. दोन दिवसांपूर्वीच साने गुरुजींची जयंती झाली. त्यानिमित्त संस्काराची शिंपण करणा-या त्यांच्या श्यामची आई व गोड गोष्टींची आठवण अनेकांनी केली; पण आज किती आई-बाबा अथवा आजी-आजोबा आपल्या मुला-नातवंडांना या संस्कारित करणा-या गोष्टी ऐकवतात किंवा वाचायला देतात? मुळात त्यांनाच मोबाइलमधून डोकं वर करायला वेळ नाही आणि टीव्हीच्या मालिका बघण्यातून उसंत. त्यामुळे घरात, कुटुंबात नैतिकतेची, संस्कारांची जी रुजुवात व्हायला हवी तीच दुरापास्त होत चालली आहे. जो आदरयुक्त धाक वाटायला हवा, तोच लयास चालला आहे. आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले हे संकट आहे. घरातच कुणी धाक बाळगत नाही म्हटल्यावर शेजारचा, गल्लीतला तरी कोण कशाला असले भय बाळगेल? अपप्रवृत्ती, अनाचाराला यातून पोषकता लाभणे स्वाभाविक ठरते. परिचितांकडून घडून येणारी लांडगेशाही ही यातीलच पुढची पायरी. तेव्हा, हे टाळायचे असेल तर प्रत्येकानेच आपापल्या परीने काळजी घ्यायला हवी... जागते रहो!