गोव्यातील वादळ
By admin | Published: September 2, 2016 02:52 AM2016-09-02T02:52:10+5:302016-09-02T02:52:10+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभागाचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाने दिले आणि या चिरेबंदी मानल्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा विभागाचे संघचालक सुभाष वेलिंगकर यांना जबाबदारीतून मुक्त करण्याचे आदेश संघाच्या नागपूर येथील मुख्यालयाने दिले आणि या चिरेबंदी मानल्या जाणाऱ्या संघटनेच्या गोवा विभागात बंडाळीसदृश स्थिती निर्माण झाली. लगोलग सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे तर दिलेच शिवाय प्रांताचे प्रतिनिधी म्हणून आलेल्यांसमोर आपल्या प्रक्षोभाला वाट मोकळी करून दिली. संघाच्या इतिहासातले अशा प्रकारचे हे पहिलेच बंड असावे. यामागे आहे तो गोव्यातल्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा वाद. इथले भाजपा सरकार मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण व्हायला हवे असे धोरण असल्याचे सांगते पण त्याचवेळी चर्चसंस्थेच्या अखत्यारीतल्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदानही देते. काँग्रेसच्या कारकिर्दीतला हा निर्णय बदलणे नव्या सरकारला शक्य झाला नाही, यामागे अर्थातच राजकीय अपरिहार्यता आहे. काँग्रेस राजवटीत गठित झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंच या संघटनेने या दुटप्पीपणाच्या निषेधार्थ आपले आंदोलन तीव्र केले. सुभाष वेलिंगकर या मंचाचे निमंत्रक. राज्यभर भ्रमण करत त्यांनी आपल्याच एके काळच्या चेल्यांचे वस्त्रहरण करणे सुरू केले. राज्याच्या मंत्र्यांबरोबरच केंद्रीय संरक्षणमंत्रदी मनोहर पर्रीकर यांच्या कार्यक्रमात जाऊन त्यांना काळे झेंडे दाखविले गेले. भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेल्या राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनाही काळे झेंडे दाखविण्यात आले. वेलिंगकर यांनी तर आता मंच येत्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करील असे जाहीर करीत सरळ राजकीय पवित्रा घेतला आहे. दरम्यान त्यांनी आपली शस्त्रे म्यान करावीत यासाठी सर्वोच्च पातळीवर जे प्रयत्न जारी होते, त्यांना ते दाद देत नाहीत म्हटल्यावर त्यांच्यावर कारवाई होईल हे दिसतच होते. मात्र त्यांना पाठबळ देत गोव्यातले अवघे स्वयंसेवक विद्रोह करतील याचा अंदाज नागपूरला नसावा. पण संघ आणि भाजपा यामध्ये निर्माण झालेली ही दरी भाजपाच्या येत्या निवडणुकीअंती गोव्यात पुन्हा सत्तारोहण करण्याच्या मनसुब्यांना सुरुंग लावू शकते. पंचवीस-तीस हजारांचे विधानसभा मतदारसंघ असलेल्या या राज्यात पाच-सहाशे मतांचा फरक विजेता आणि पराभूत यात बदल करू शकतो. वेलिंगकर यांनाही हेच अभिप्रेत आहे. किंबहुना भारतीय भाषांच्या काळजीपेक्षा भाजपाचे पतन हाच त्यांचा आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचचा यापुढला कार्यक्रम असेल असे संकेत ताज्या घटनाक्रमावरून मिळत आहेत.