जगभर : मस्क आणि मेलोनी यांच्या ‘डेट’वरून वादळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:36 IST2024-12-24T08:35:59+5:302024-12-24T08:36:07+5:30
मस्क यांची आणखी एक ‘वेगळी’ आणि सर्वपरिचित ओळख आहे, ती म्हणजे ‘प्रेमवीर’!

जगभर : मस्क आणि मेलोनी यांच्या ‘डेट’वरून वादळ!
कारण कोणतंही असो, पण आपल्याभोवती प्रसिद्धीचं वलय कायम राहील याची व्यवस्थित काळजी इलॉन मस्क कायम घेत असतात किंवा ते असं काहीतरी करतात, की चांगली असो वा वाईट, प्रसिद्धी आपोआप त्यांच्याकडे चालत येते. इलॉन मस्क जगभरातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. उद्योजक आहेत. स्पेस एक्सचे संचालक आहेत, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सोशल मीडिया व्यासपीठ ‘एक्स’चे चेअरमन आहेत, मस्क फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, अमेरिकेचे नूतन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘सख्खे मित्र’ आहेत, याशिवाय मस्क अजून बरंच काही आहेत. याशिवाय त्यांची आणखी एक ‘वेगळी’ आणि सर्वपरिचित ओळख आहे, ती म्हणजे ‘प्रेमवीर’!
आजपर्यंत अनेक जणींशी त्यांचं नाव जोडलं गेलं आहे. त्यातल्या काही जणींशी त्यांनी विवाह केला, घटस्फोटही घेतला. पुन्हा नवी नाती जुळवली. काही जणींशी त्यांनी लग्न केलं नाही, पण त्यांना मुलं झाली. लग्न, घटस्फोट, प्रेमप्रकरणं, गर्लफ्रेंड्स असा त्यांचा सिलसिला अखंड सुरू असतो.
आता त्यांचं नाव कोणाशी जाेडलं आणि जुळलं जावं? जगप्रसिद्ध असं एक नाव आहे, ते म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. मेलोनी यांच्याबरोबरची मस्क यांची ‘दोस्ती’ आता संपूर्ण जगभरात चर्चेत आहे. ही चर्चा आता इतकी रंगलीय की इटलीच्या त्यांच्या विरोधकांनीही हा प्रश्न लावून धरला आहे आणि त्यावरून इटालीयन जनतेतही खुसफूस सुरू आहे. जॉर्जिया मेलोनी यांना यावरून थेटच विचारलं जाऊ लागलं आहे. अनेकांनी मेलोनी आणि मस्क यांच्या दोस्तीवरून देशाच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं.
प्रश्नांच्या या सरबत्तीमुळे मेलोनी यांना थेट इटलीच्या संसदेतच उत्तर द्यावं लागलं. मेलोनी यांनीही आपल्या उत्तरात विरोधकांचा समाचार घेतला. संसदेत त्यांनी सांगितलं, हो इलॉन मस्क आणि माझी मैत्री आहे. मैत्री कोणाशीही असू शकते. संपूर्ण जगभरात माझे, मैत्रिणी आहेत. अनेकांचे असतात. त्यावरून त्या नात्याला काही नाव दिलं जाऊ नये, कंड्या पिकवल्या जाऊ नयेत आणि मुख्य म्हणजे या मैत्रीमुळे अमेरिकेला किंवा आणखी कोणाला, व्यावसायिक किंवा इतर कोणताही फायदा हाेण्याची काडीचीही शक्यता नाही. इलॉन मस्क माझे मित्र आहेत आणि मी इटलीची पंतप्रधान आहे. या दोन्ही गोष्टी एकाचवेळी असू शकत नाहीत का? जगात असे आणखी अनेक लोक आहेत, ज्यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत, पण म्हणून कोणाच्या ‘आदेशावर’ मी काम करीन असं कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. आजवर मी कोणाच्याही आदेशानुसार काम केलेलं नाही. जे चांगलं आणि योग्य आहे, तेच मी करते.
याच वर्षी २४ सप्टेंबरला इलॉन मस्क आणि मेलोनी यांची न्यू यॉर्कमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली होती. या भेटीचे अनेक फोटो क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या दोस्तीच्या कहाण्या सोशल मीडियाच्या घराघरांत रंगल्या. मस्क आणि मेलोनी एकमेकांना डेट करताहेत, असाही दावा अनेकांनी केला. त्याला आधार होता, त्या फोटोंचा. ते फोटो पाहूनच हे दोघंही डेट करताहेत, असा दावा लोकांनी केला.
मस्क आणि मेलोनी यांच्या या भेटीनंतर मस्क यांनी मेलोनी यांची तोंड भरून स्तुती केली होती. शिवाय मेलोनी अतिशय सुंदर आहेत, अशी पुष्टीही त्यांनी या स्तुतीला दिली होती. मस्क म्हणाले होते, जॉर्जिया जितक्या सुंदर दिसतात, तितकाच त्यांता अंतरात्माही सुंदर आहे. अंतर्बाह्य सुंदर असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे, पण आपण मेलोनी यांना डेट करत नाही, असंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या अफवा असून, त्यात काहीही तथ्य नसल्याचं ते म्हणाले.
मस्क गेल्या वर्षी डिसेंबर आणि या वर्षी जुलैमध्येही मेलोनी यांना भेटले होते. इटलीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ही भेट घेतली होती. त्यावेळी मेलोनी यांनीही मस्क यांच्या कौतुकात कोणतीही कसूर ठेवली नव्हती. इलॉन मस्क हे अतिशय हुशार आणि आगळंवेगळं व्यक्तिमत्त्व आहे, असं मेलोनी म्हणाल्या होत्या. मस्क यांनीही मेलोनी यांना अतिशय सुंदर म्हणून त्याची परतफेड केली असावी. पण, या दोघांचं प्रकरण आता जगभरात चांगलंच रंगलं आहे, एवढं मात्र खरं.
इटलीत मस्क यांची गुंतवणूक
इटलीमध्ये उद्योगधंद्यांना चालना मिळावी, या हेतूनं मेलोनी आणि मस्क यांच्या याआधी अनेक भेटी झाल्या आहेत. इटालियन सरकारने अवकाश क्षेत्राला चालना देण्यासाठी एक आराखडा तयार केला आहे, ज्यामुळे मस्कच्या ‘स्पेस एक्स’सारख्या परदेशी कंपन्यांना तेथे काम करणे सोपे झाले आहे. इटालियन सरकारच्या या फ्रेमवर्कनुसार, २०२६पर्यंत इटलीमध्ये ७३० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. इलॉन मस्क आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीमुळे दाेन्ही देशांतील संवेदनशील माहिती फुटण्याची भीती काही जणांनी व्यक्त केली आहे.