उत्थानाचा मार्ग दाखवणारे वादळ शमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:38 AM2018-03-28T02:38:16+5:302018-03-28T02:40:40+5:30

डॉ. गंगाधर पानतावणे गेल्याचे वृत्त ऐकले आणि मॉरिस कॉलेजच्या प्रांगणात शोधमग्न अवस्थेत बसलेल्या विद्यार्थीदशेतील गंगाधरपासून तर विद्रोहाच्या वाटेने उत्थानाचा मार्ग दाखवणाऱ्या

The storm showcasing the path of uplift has happened | उत्थानाचा मार्ग दाखवणारे वादळ शमले

उत्थानाचा मार्ग दाखवणारे वादळ शमले

googlenewsNext

डॉ. गंगाधर पानतावणे गेल्याचे वृत्त ऐकले आणि मॉरिस कॉलेजच्या प्रांगणात शोधमग्न अवस्थेत बसलेल्या विद्यार्थीदशेतील गंगाधरपासून तर विद्रोहाच्या वाटेने उत्थानाचा मार्ग दाखवणाऱ्या प्रगल्भ पानतावणेंपर्यंतचा त्यांचा संपूर्ण प्रवास नजरेखालून तरळून गेला. पानतावणेंबाबतच्या सर्व आठवणी इतक्या ताज्या आहेत, वाटतं हे सर्व काल-परवाच घडलंय. आताची वसंतराव नाईक शिक्षण संस्था म्हणजे तेव्हाचे मॉरिस कॉलेज. मी या कॉलेजात शिकत असताना पानतावणे मला दोन वर्षे ज्युनिअर होते. नवमतवादी तरुणांच्या सामाजिक, सांस्कृतिक चळवळींमध्ये सहभागाचा तो भारावलेला काळ होता. त्यातही मॉरिस कॉलेज या चळवळीचे जणू केंद्रबिंदू झाले होते. वि.भि. कोलते, कवी अनिल देशपांडे यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मराठी विभागाच्या शारदा मंडळाचा मोठा बोलबाला होता. कवी गे्रस, पानतावणे हे एकाच वर्गात शिकणारे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या साहित्यिक-विचारवंतांना बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करणे, विविध सामाजिक विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आयोजित करणे असे उपक्रम या शारदा मंडळात नियमित सुरू असायचे. यात पानतावणेंचा पुढाकार हमखास असायचा. या विविध उपक्रमातूनच पानतावणेंंच्या विचारांची दिशा स्पष्ट होत गेली. पानतावणे मूळचे नागपूरचेच. पाचपावलीतील बारसेनगरात त्यांचा जन्म झाला. वर्णव्यवस्थेने जातीधर्माच्या आधारावर जी सामाजिक उतरंड निर्माण करून ठेवली होती, त्या उतरंडीचा फटका त्यांनाही सोसावा लागला. मानसिक गुलामगिरीतून दलित समाज मुक्त होऊ पाहत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून तो तेजस्वी होत असताना ज्या तरुण दलित पिढीने वैचारिक अस्पृश्यतेचा अंधार नाकारला त्या तरुण पिढीचा एक भाग पानतावणेही होते. त्यामुळे वरून अतिशय शांत, संयमी दिसणाºया पानतावणेंच्या हृदयातही विद्रोहाचे विचार आकार घ्यायला लागले. पुुढे त्यांना नोकरीच्या निमित्ताने औरंगाबादला जावे लागले. मिलिंद महाविद्यालयात असताना अस्मितादर्श नियतकालिकाचा विचार त्यांच्या मनात आला. एकेक व्यक्ती सुसंगत व्हावी आणि त्यातून सुसंगत व्यक्तींचा समूह तयार व्हावा; म्हणजे त्या त्या गणसमाजाची उन्नती होईल, हा तो विचार होता. पानतावणेंच्या विचारांचे अधिष्ठानच मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि बाबासाहेबांनाही असाच उन्नत गणसमाज अपेक्षित होता. असा समाज घडविण्यासाठीचे समर्थ माध्यम म्हणून पानतावणेंनी अस्मितादर्श जन्माला घातले. आमच्यासारख्या अनेकांच्या लेखन्यांना अस्मितादर्शने मोठे बळ दिले. मला अजूनही चांगले आठवते. अमेरिकन संशोधक एलिनॉर झेलिएट, गेल आॅमवेट, अनुपमा राव काही खास विषयांवरील अस्मितादर्शतील लेखनाचा अभ्यास करण्यासाठी नागपूरला वसंत मून यांच्या ग्रंथालयात येते होते. अस्मितादर्श हे शुद्रातिशुद्रांच्या मुक्ती चळवळीचा दस्तऐवज ठरले असून, हा दस्तऐवज जन्माला घालण्याचे महान कार्य डॉ. पानतावणे यांनी केले. त्यांंच्या जाण्याने जे नुकसान झाले ते कशानेही भरून निघणारे नाही, हे खरे पण, त्यांच्या चळवळीचा वेग मात्र थांबायला नको याची काळजी पानतावणेंचा वैचारिक वारसा पुढे चालविणाºया पिढीने घेणे गरजेचे आहे. पण, त्यासाठी सर्वात आधी परस्परातील हेवेदावे-व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवावा लागेल. नवीन पिढीने पुढे यावे आणि पानतावणेंची वैचारिक पताका आपल्या खांद्यावर घेऊन समाजातील शेवटच्या माणसाची अस्मिता जागविण्यासाढी पुढाकार घ्यावा; कारण हीच खरी पानतावणेंना श्रद्धांजली ठरेल.
- कुमुद पावडे
(सामाजिक कार्यकर्त्या)

Web Title: The storm showcasing the path of uplift has happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.