अमेरिकी ‘निर्वासितांची’ कहाणी
By admin | Published: March 12, 2016 03:40 AM2016-03-12T03:40:32+5:302016-03-12T03:40:32+5:30
अमेरिकी नागरिकांचा एक वर्ग आपला देश सोडून कॅनडात वास्तव्याला जायला सिद्ध झाल्याच्या बातम्यांनी त्या देशाच्या राजकारण व समाजकारणाएवढेच जगभरच्या विचारवंतांना ग्रासायला सुरुवात केली आहे.
अमेरिकी नागरिकांचा एक वर्ग आपला देश सोडून कॅनडात वास्तव्याला जायला सिद्ध झाल्याच्या बातम्यांनी त्या देशाच्या राजकारण व समाजकारणाएवढेच जगभरच्या विचारवंतांना ग्रासायला सुरुवात केली आहे. त्या देशातील ११ राज्यात आपल्या पक्षाची अध्यक्षीय उमेदवारी मिळविण्यासाठी झालेल्या मतदानाने नोव्हेंबरात होणारी अध्यक्षपदाची निवडणूक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनॉल्ड ट्रम्प यांच्यात होईल हे स्पष्ट केले आहे. हिलरी क्लिंटन यांनी या राज्यांपैकी सात राज्ये जिंकून आपले प्रतिस्पर्धी सिनेटर बर्नी सँडर्स यांचा पराभव केला. तिकडे रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्या दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांचा सात राज्यात पराभव करून उमेदवारीवरील आपला हक्क मजबूत केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारी-विजयाच्या घटनेने हादरलेले अनेकजण आता देश सोडून कॅनडामध्ये जाण्याच्या तयारीला लागले आहेत. त्या देशाकडे तशी परवानगी मागण्यासाठी चौकशी करणाऱ्यांची व प्रत्यक्ष तसे अर्ज करणाऱ्यांची संख्या आताच काही हजारांवर गेली आहे. अशी परवानगी मागणाऱ्या अमेरिकनांची संख्या मोठी असल्याचे प्रत्यक्ष कॅनडाच्याच परराष्ट्र मंत्रालयाने जगाला सांगितले आहे. आपला देश सोडून जाऊ इच्छिणारे लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या शक्यतेनेच धास्तावले आहेत. स्त्रीद्वेष, वर्णद्वेष आणि धर्मद्वेष यांनी ग्रस्त असलेले ट्रम्प हे अमेरिकेत वास्तव्यासाठी येऊ इच्छिणाऱ्या साऱ्यांवरच निर्बंध लादण्याची, मुसलमानांना सरसकट प्रवेश नाकारण्याची आणि देशाभोवती संरक्षक भिंत घालून त्यात मेक्सिकनांसह दक्षिणेतील इतरांपासून देश ‘सुरक्षित’ करण्याची सुलतानी भाषा बोलणारे पुढारी आहेत. एक यशस्वी बिल्डर म्हणून प्रचंड संपत्ती मिळविलेल्या ट्रम्प यांची भाषा अरेरावीची, धमकीवजा व काहीशी हिंस्र वाटावी अशी आहे. आश्चर्य म्हणजे पावणेतीनशे वर्षांची लोकशाही परंपरा असलेल्या त्या देशातील अनेकांना याच गोष्टींमुळे त्यांची लाट उभी होण्याचे भय वाटू लागले आहे. ‘हिटलर असाच सत्तेवर आला’ असे सांगणारी वार्तापत्रे प्रत्यक्ष अमेरिकेतील व पाश्चात्त्य लोकशाही देशातील वृत्तपत्रात प्रकाशीत होऊ लागली आहेत. ट्रम्प यांच्या अशा प्रतिमेने धास्तावलेल्या अमेरिकी लोकाना आपण कॅनडात सुरक्षित राहू शकू असे वाटू लागले आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी होऊ शकणाऱ्या उमेदवार हिलरी क्लिंटन या प्रस्थापित लोकशाही मूल्यांशी बांधिलकी सांगणाऱ्या व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या इतिहासाशी सुसंगत भाषा बोलणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्याविषयी जनतेत विश्वासाची भावना असली तरी बराक ओबामा यांच्या समन्वयी राजवटीच्या पार्श्वभूमीवर टोकाची व अतिरेकी भूमिका घेणारे ट्रम्प यांचे आक्रमक पुढारीपण तेथील अनेकाना भावणारेही आहे. तिकडे कॅनडा हा क्षेत्रफळाने जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश असून त्याची लोकसंख्या अमेरिकेच्या ३२ कोटी लोकांच्या तुलनेत साडेतीन कोटी एवढी लहान आहे. शिवाय त्याचे पंतप्रधान ट्रूड्यू हे जगाला आपल्या येथे राहायला येण्याचे निमंत्रण देणारे उदारमतवादी नेते आहेत. सिरियाच्या निर्वासितांनाही आपल्या देशात यायला ते प्रोत्साहन देत आहेत. झालेच तर अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमा ८९००कि.मी. लांबीची असून त्या दोन देशांचे परस्परसंबंध अतिशय घनिष्ट राहिले आहेत. अविकसित व विकसनशील देशातील लोकात अमेरिकेसारख्या धनवंत देशात शिक्षण, नोकरी व व्यवसायासाठी जाण्याची मोठी स्पर्धा असताना अमेरिकेतील शिक्षित व सुस्थितीत असलेल्या लोकाना आपला देश सोडून विदेशात जाऊन राहाण्याची इच्छा होण्याचे भयकारी कारण त्या देशाच्या राजकारणात ट्रम्प यांच्यामुळे येऊ शकणारे प्रतिगामी व एककल्ली नेतृत्व हे आहे. भीतीचे राजकारण अर्थकारणात प्रगत असलेल्या देशातील नागरिकांनाही असुरक्षित वाटायला लावणारे ठरते असे सांगणारे हे चित्र आहे. ट्रम्प यांना उमेदवारी मिळाली तर आणि ते अमेरिकेच्या अध्यक्षपदी आलेच तर त्यांच्या आताच्या भाषेत व वागणुकीत फरक पडणार नाही व ते सौम्य होणार नाहीत असे नाही. मात्र अशा शक्यतेवर विश्वास नसणाऱ्यांचा एक वर्गच त्यांच्या अतिरेकी प्रतिमेवर भाळल्यासारखा आज दिसत आहे. रिपब्लिकन पक्षातील विवेकी नेतृत्वही या प्रतिमेने अस्वस्थ झाले आहे. ट्रम्प यांना पक्षाची उमेदवारी मिळालीच तरी ते हिलरी क्लिंटन यांचा पराभव करू शकणार नाहीत असे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांचे म्हणणे आहे. हिलरींना उदारमतवादी आणि सर्वसमावेशक भूमिका घेणाऱ्या मतदारांएवढाच महिलांचा व कृष्णवर्णीय अमेरिकी मतदारांचा मोठा पाठिंबा आहे. त्यांना विजय मिळाला तर ट्रम्प यांचे संकट टळेल असे जगभरच्या विचारवंतांचे आणि माध्यमांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांची लाट ओसरेल आणि अमेरिका पुन्हा आपल्या लोकशाही वळणावर येईल असा विश्वासही ते व्यक्त करीत आहेत.