काविळीच्या जीवघेण्या विषाणूवरील ‘नोबेल’ विजयाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 05:00 AM2020-10-07T05:00:03+5:302020-10-07T05:00:15+5:30
एका विषाणूनेच अवघ्या जगाला सळो की पळो करून सोडलेलं असताना या तीन शास्रज्ञांनी केलेल्या कामाचं महत्त्व निश्चितच विशेष आहे!
- डॉ. मृदुला बेळे, औषधनिर्माणशास्राच्या प्राध्यापक
कावीळ हा आजार काही तसा आपल्याला नवा नाही. आपण फार पूर्वीपासून या आजाराबद्दल ऐकत आलो आहोत. हा आजार यकृताचा दाह झाल्यामुळे होतो हे माणसाच्या लक्षात आलं १९१२ मधे, आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं हिपॅटायटिस, किंवा यकृतदाह. १९६०च्या आसपास शास्रज्ञांना समजलं की हा यकृतदाह एका विषाणूसंसर्गामुळे होतो. यकृतदाह घडवून आणणारे दोन वेगवेगळे विषाणू शास्रज्ञांना सापडले. त्यांची नावं ठेवण्यात आली हिपॅटायटीस ए व्हायरस (एचएव्ही) आणि हिपॅटायटीस बी व्हायरस (एचबीव्ही). एचएव्ही हा एक आरएनए विषाणू आहे, आणि त्याचा संसर्ग दूषित अन्न आणि पाण्यावाटे होतो तर एचबीव्ही हा डीएनए विषाणू आहे आणि त्याचा संसर्ग रक्तावाटे होतो. हिपॅटायटीस ए आणि बीचं निदान करणाऱ्या चाचण्या तयार झाल्या.
गोष्ट आहे १९७६ सालातली. डॉ. हार्वे आल्टर हे अमेरिकेतल्या बेथेस्डा इथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ’ या संस्थेत काम करणारे शास्रज्ञ रक्तदानातून होणाºया हिपॅटायटीसचा अभ्यास करत होते. तोवर हिपॅटायटीस-बी हा रक्तातून संसर्ग होणाऱ्या यकृतदाहाचा एकच प्रकार ठाऊक होता. रक्त देण्याआधी त्या रक्ताची हिपॅटायटीस चाचणी केली जात असे. पण ही चाचणी करून आणि ती हिपॅटायटीस बी विषाणूसाठी निगेटिव्ह येऊनही काही रुग्णात यकृतदाहाची लक्षणं दिसतायत, असं डॉ. आल्टर यांच्या लक्षात आल्याने ते बुचकाळ्यात पडले. मग त्याचा शोध घेणं सुरू झालं. या रुग्णांचं रक्त चिम्पांझींना दिलं तर त्यांच्यातही रोगाची लक्षणं दिसतायत असंही आल्टर आणि सहकाऱ्यांना आढळलं. मग पुढे बरीच वर्षं अभ्यास केल्यावर त्यांना आढळलं की हा आजार हा यकृतदाहच आहे आणि तो विषाणूजन्यही आहे; पण हा कुठला तरी नवा विषाणू आहे. लवकरच त्यांनी रक्तातून हा विषाणू वेगळा करण्यात यश मिळवलं. हा एक फ्लाव्ही व्हायरस प्रकारचा आरएनए विषाणू होता आणि त्याचं नाव ठेवलं गेलं हिपॅटायटीस सी व्हायरस. याच सुमारास डॉ. मायकेल हॉटन इंग्लंडमध्ये ‘शिरॉन कॉर्पोरेशन’ नावाच्या औषध कंपनीत शास्रज्ञ म्हणून काम करत होते. त्यांनी आपल्या सहकाºयांबरोबर या हिपॅटायटीस-सी विषाणूवर काम करायला सुरुवात केली. काही काळातच त्यांनी या विषाणूचा जिनोम सिक्वेन्स शोधून काढला. संसर्ग झालेल्या चिम्पांझींच्या रक्तातून त्यांनी हा विषाणू मिळवला, आणि त्याच्या आरएनमधल्या केंद्रकीय आम्लांचा क्रम शोधून काढला. हिपॅटायटीस सीच्या रुग्णांच्या रक्तातही त्यांना या विषाणूशी लढण्यासाठी त्यांच्या शरीराने बनवलेली प्रतिपिंडं सापडली. त्यावरून रक्तातील हा विषाणू शोधून काढण्याच्या चाचण्या तयार करण्यात आल्या. १९९०मध्ये या चाचण्यांची निर्मिती झाली. १९९२मध्ये रुग्णाला रक्त देण्याआधी त्या रक्ताच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करता येणं शक्य होऊ लागलं. त्यामुळे हिपॅटायटीस सी संसर्गाला मोठ्या प्रमाणावर आळा घालता येणं शक्य होऊ लागलं. शिवाय हिपॅटायटीस सीमुळे एका प्रकारचा यकृताचा कर्करोग होतो हेही हॉटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्ध केलं. २०१३ सालात कॅनडामधल्या अल्बर्टा विद्यापीठात संशोधन करत असताना हॉटन यांनी हिपॅटायटीस सीच्या लसीबाबतही महत्त्वाचे शोध लावले. त्यानुसार आता लस बनवणे सुरू आहे.
डॉ. आल्टर आणि डॉ. हॉटन यांच्या अथक प्रयत्नातून १९८९ सालात या विषाणूच्या जिनोमची प्रतिकृती (क्लोन) करता आली होती. पण तरीही काही केल्या प्रयोगशाळेत परीक्षानळीत यकृतपेशींवर हा विषाणू वाढवणं शक्य होत नव्हतं. या प्रतिकृतीत काय कमतरता राहिली आहे हे अमेरिकेतल्या वॉशिंग्टन विद्यापीठात संशोधक म्हणून काम करणाºया डॉ. चार्ल्स राइस यांनी शोधून काढलं. आणि प्रयोगशाळेत हा विषाणू वाढवण्यात यश मिळवलं. यानंतर २००० सालात डॉ. राइस रॉकफेलर विद्यापीठात रुजू झाले. तिथे त्यांनी केलेल्या कामामुळे या विषाणूवर बनवण्यात येणाºया औषधांच्या चाचण्या करणं शक्य झालं. हे तंत्रज्ञान वापरूनच नोव्हेंबर २०१३मध्ये सिमेप्रेविर आणि डिसेंबर २०१३ मध्ये सोफोस्बुव्हीर ही हिपॅटायटीस सीवरली पहिली औषधं बाजारात येणं शक्य होऊ शकलं. त्यामुळे आता या आजारामुळे होणारे मृत्यू रोखणं शक्य होऊ लागलं आहे. हिपॅटायटीस सी या आजाराला कारणीभूत असणारा विषाणू शोधणं, त्याला वेगळं करणं, त्याचा जीनोम सिक्वेन्स शोधणं, त्याला प्रयोगशाळेत वाढवणं, उपचार शोधणं या डॉ. हर्वे आल्टर, डॉ. मायकेल हॉटन आणि डॉ. चार्ल्स राइस यांनी केलेल्या डोंगराएवढ्या कामासाठी २०२० सालातलं ‘शरीरक्रियाशास्र किंवा औषधं’ या विषयातलं नोबेल पारितोषिक या तिघांना मिळून देण्यात आलं आहे. एका विषाणूनेच अवघ्या जगाला सळो की पळो करून सोडलेलं असताना या तीन शास्रज्ञांनी केलेल्या कामाचं महत्त्व निश्चितच विशेष आहे!