मतदारांची कुंडली मांडणाऱ्या कंपनीची गोष्ट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2024 07:31 AM2024-05-18T07:31:01+5:302024-05-18T07:36:45+5:30
प्रत्येक मतदाराच्या स्वभावानुरूप स्वतंत्र संदेश तयार करून ‘टार्गेटेड’ राजकीय प्रचार करता येतो, हे सिद्ध केलेल्या केंब्रिज अनॅलिटिकाची आठवण!
विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयांचे अभ्यासक
ही गोष्ट आहे सहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या एक कंपनीची. विदाशास्त्र (डेटासायन्स), मानसशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या तिठ्यावर वसलेली. सर्वसाधारणपणे सांगायचे तर मार्केटिंग आणि नेमकेपणे सांगायचे तर राजकीय प्रचार या दोन क्षेत्रांसाठी काम करणारी कंपनी. २०११ साली स्थापन झालेली ही कंपनी बंद पडली २०१८ साली. या सातेक वर्षांत कंपनीने वेगवान उत्कर्ष, तितकीच वेगवान घसरण, नाचक्की आणि दिवाळखोरीही अनुभवली. या दोन टोकांच्या दरम्यान कंपनीने जागतिक राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या दोन महत्त्वाच्या प्रचारमोहिमांमध्ये कळीची भूमिका निभावली. आणि राजकीय प्रचारामध्ये विदा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर-गैरवापर कसा होऊ शकतो याचा वस्तुपाठही निर्माण केला.
या कंपनीचे नाव केंब्रिज अनॅलिटिका. ब्रेक्झिट नावाने ओळखल्या गेलेल्या सार्वमतामुळे ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडला, तर २०१६ च्या गाजलेल्या निवडणुकीतून डोनाल्ड ट्रम्प नावाची वादळी आणि वादग्रस्त व्यक्ती अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर पोहोचली. केंब्रिज अनॅलिटिकाने ब्रिटनमध्ये ब्रेक्झिट समर्थकांसाठी, तर अमेरिकेत ट्रम्प यांच्यासाठी काम केले होते. काय होते हे काम, कंपनीने ते कसे केले आणि प्रचारमोहिमेला यश आले होते तर कंपनीला गाशा का गुंडाळावा लागला, हे प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे; कारण त्यात फक्त तात्कालिक राजकीय परिस्थितीचेच नव्हे तर नव्या राजकीय प्रचारव्यवस्थेचे संदर्भ गुंतलेले आहेत.
कोणत्याही राजकीय प्रचाराचे दोन प्रमुख उद्देश असतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या मतावर अनुकूल प्रभाव पाडणे. पहिले उद्दिष्ट बऱ्यापैकी साध्य करता येते. ते किती साध्य झाले याचा गणिती अंदाजही बांधता येतो. दुसरे उद्दिष्ट मात्र साध्य करण्यासाठी कठीण आणि साध्य झाले हे दाखविणेही कठीण. प्रचारातील संदेश लोकांना आकर्षित करतील का, त्यांचा ते योग्य तोच अर्थ लावतील का, त्यांना तो पटेल का अशा अनेक घटकांवर ते अवलंबून असते. त्यासाठी लोकांची मानसिकता समजून घ्यायला हवी. केंब्रिज अनॅलिटिकाच्या कामाचे महत्त्व याच मुद्द्यात दडले होते. कारण कंपनीने मानसशास्त्र, विदा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांची सांगड घालून मतदारांना मानसिक पातळीवर ओळखण्याचे तंत्र विकसित केले होते.
मानसशास्त्रातील काही प्रस्थापित चाचण्या व सिद्धांताचा वापर करून कंपनीने लोकांची मतदार म्हणून पाच गटात विभागणी केली. नवअनुभवांसाठी उत्सुक, विचारी व जबाबदार, सकारात्मक व सहहृदयी, मैत्रीपूरक व स्वीकृतिप्रवण, आणि अस्वस्थ व नकारात्मक हे ते पाच गट. एकदा मतदारांची ही स्वभाववृती कळली की मग त्यानुसार योग्य तो प्रचार संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. एरवी वर्तमानपत्रे, टीव्ही यांसारख्या प्रसारमाध्यमांमध्ये ‘सब घोडे बारा टक्के’ या सूत्राने सगळ्यांपर्यंत एकसारखाच संदेश पोहोचतो. तिथे व्यक्तीनुसार संदेश अनुकूल करून घेण्याची सोय नसते.
सोशल मीडियावर मात्र लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय समाजमाध्यमे व्यक्तीला एका समूहाचा घटक म्हणूनच नव्हे तर एक विशिष्ट व्यक्ती म्हणूनही लक्ष्य करण्याची सोय पुरवतात. केंब्रिज अनॅलिटिकाने त्याचाच फायदा उठविला. पण, तसे करताना जी पद्धत वापरली ती बेकायदा आणि अनैतिक होती. त्यांनी फेसबुकवर व्यक्तिमत्त्व चाचणीच्या नावाखाली टाकलेल्या जाळ्यात हजारो अमेरिकी मतदार अडकले. फुकटात व्यक्तिमत्व चाचणी करून मिळते म्हणून त्यांनी ती लिंक क्लिक केली. ही चाचणी करताना करताना केंब्रिज अनॅलिटिकाने फेसबुकवरील त्यांच्या वावरासंबंधीचा सारा विदा (डेटा) खरवडून आपल्याकडे वळता करून घेतला. त्यांच्या फेसबुक मित्र मैत्रिणींचाही डेटा मिळवला. कंपनीच्याच एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तब्बल पाच कोटी अमेरिकी मतदारांचा डेटा त्यातून कंपनीकडे जमा झाला.
कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सुविधांचा वापर करून त्याची नेमकी वर्गवारी केली. त्यांच्या फेसबुकवरील वर्तनातील पॅटर्न शोधले. या वर्गवारीची आणि इतरही विदासाठ्यांशी सांगड घालून काही गोष्टींची खातरजमा केली. या सगळ्या उद्योगामुळे त्यांच्याकडे अमेरिकेतील ११ राज्यांमधील सुमारे दोन कोटी मतदारांच्या राजकीय वर्तनाची आणि वर्गवारीची एक कुंडलीच तयार झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे या कुंडलीतील प्रभावशाली अशा शेकडो छोट्या-मोठ्या घटकांचा अंदाज बांधता आला.
मग मतदारांच्या या कुंडलीनुरूप राजकीय संदेश तयार करणे फार अवघड नव्हते. तसे व्यक्तीअनुकूलित हजारो संदेश तयार केले गेले. डिजिटल साधनांमुळे हे काम सोपे झाले. टार्गेट व्यक्ती, तिची कुंडली, त्या अनुकूल संदेश तयार. तो पोहचविण्यासाठी समाजमाध्यमांची व्यवस्थाही सिद्ध. मग काय?... ट्रम्प यांच्या प्रचारार्थ अशा व्यक्तीअनुकूल संदेशांचा मारा करण्यात आला. हे असे कोणी ठरवून करत आहे याचा थांगपत्ताही कोणाला लागला नाही. त्याचा परिणाम काय झाला ते मग जगाने पाहिले. अनपेक्षितरीत्या ट्रम्प जिंकले. त्यांच्या जिंकण्यामध्ये केंब्रिज अनॅलिटिका हे एकमेव जरी नसले तरी एक महत्त्वाचे कारण होते. पण विदा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशा प्रचारामध्ये वावगे ते काय? अनैतिक आणि बेकायदा ते काय? केंब्रिज अनॅलिटिका बंद का पडली हा प्रश्न उरतोच. त्याचे उत्तर पुढील लेखात.
vishramdhole@gmail.com