शिवरायांच्या राज्याभिषेकाची कहाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2023 07:38 AM2023-06-06T07:38:17+5:302023-06-06T07:39:31+5:30

१९४३ साली वा. सी. बेंद्रे यांनी गागाभट्टकृत ‘राज्याभिषेकप्रयोग:’ या संस्कृत  ग्रंथाची पोथी बिकानेर राज्य हस्तलिखित संग्रहालयातून शोधून काढली.

story of chhatrapati shivaji maharaj shiv rajyabhishek | शिवरायांच्या राज्याभिषेकाची कहाणी...

शिवरायांच्या राज्याभिषेकाची कहाणी...

googlenewsNext

- साधना बेंद्रे, अध्यक्ष, इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे मेमोरियल ट्रस्ट

महाराष्ट्राला साक्षेपी इतिहास संशोधकांची, व्यासंगी इतिहासकारांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. प्रामुख्याने विसाव्या शतकात मराठ्यांच्या इतिहासाच्या शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाला प्रारंभ झाला आणि वस्तुनिष्ठ मांडणीची परंपरा सुरू झाली. याच धारेतील एक श्रेष्ठ इतिहासकार म्हणजे वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे! आज छ. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करताना इतिहासाचार्य वा. सी. बेंद्रे यांचे स्मरण घडते ते त्यांनी केलेल्या अत्यंत मौलिक अशा  कार्यामुळेच! 

मराठ्यांच्या इतिहासाचे विविधांगी पैलू उजेडात आणण्याचे महत्कार्य तर वा. सी. बेंद्रे यांनी केलेच ; पण छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक विधीचा साद्यंत वृतान्त मराठी जनांसमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य बेंद्रे यांनी केले. गागाभट्टकृत राजाभिषेकप्रयोगः या संस्कृत ग्रंथाचा मराठी आणि इंग्लिश अनुवाद करून वा. सी. बेंद्रे यांनी शिवराज्याभिषेकाचा विधी जगभरातील वाचकांसमोर आणला. एका अर्थाने, वा. सी. बेंद्रेंच्या या भाषांतरकार्यामुळे राज्याभिषेकाच्या विधीची माहिती इतिहास अभ्यासक व शिवप्रेमी यांच्यासाठी खुली झाली. 

१९४३ साली बेंद्रेंनी “गागाभट्टकृत ‘राज्याभिषेकप्रयोग:’ या संस्कृत ग्रंथाची पोथी बिकानेर राज्य हस्तलिखित संग्रहालयातून शोधून काढली. तेथील दिवाण श्री. मनुभाई मेहता यांच्या सहकार्याने ही प्रत त्यांनी नकलून घेतली. मग, या ग्रंथाचे सुलभ मराठीत भाषांतर करून हा ऐतिहासिक ऐवज त्यांनी मराठी वाचकांसमोर आणला. इतिहास अभ्यासकांसाठी ही जणू पर्वणीच ठरली आहे. वा. सी. बेंद्रेंचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असे सांगतो की, ही पोथी पूर्णतः वैदिक असून सात दिवसांच्या कालावधीत करावयाच्या राज्याभिषेकाचे विधी गागाभट्टांनी यात दिनवार लिहून काढले आहेत. सदर ग्रंथाचा मराठी अनुवाद ‘शिवराज्याभिषेक - मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील सर्वोच्च घटना’ या डॉ. सदानंद मोरे संपादित ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.

राज्याभिषेकाचा सविस्तर विधी मांडतानाच, राज्याभिषेक का आवश्यक होता याचे बेंद्रेंनी केलेले विश्लेषणही विलक्षण आहे. राज्याभिषेकाच्या घटनेचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उत्क्रांतीच्या परिप्रेक्ष्यात असलेले महत्त्व विषद करताना बेंद्रे लिहितात, ‘शिवराज्याभिषेकामुळे सतराव्या शतकात राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि व्यावहारिक संघटनाचे एक उत्तम व प्रभावी साधन महाराष्ट्राच्या हाती आले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सांस्कृतिक उत्क्रांतीची ही एक महत्त्वाची घटना होती. या घटनेतील सांस्कृतिक तत्त्वांचा आत्मा अमर होता, याची आजही प्रचीती येते.’

 

Web Title: story of chhatrapati shivaji maharaj shiv rajyabhishek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.