‘‘समुद्र आमचा अख्खा देश गिळतो आहे...’’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 08:45 AM2021-12-17T08:45:08+5:302021-12-17T08:45:37+5:30

ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही नसतं. तो सगळ्या एनजीओंनी उभा केलेला बागुलबुवा आहे.” असा समज मनाशी घट्ट पकडून असणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, आणि ते बरेच असतात. 

story of tuvalu country first affect of global warming in world | ‘‘समुद्र आमचा अख्खा देश गिळतो आहे...’’

‘‘समुद्र आमचा अख्खा देश गिळतो आहे...’’

googlenewsNext

“ग्लोबल वॉर्मिंग वगैरे काही नसतं. तो सगळ्या एनजीओंनी उभा केलेला बागुलबुवा आहे.” असा समज मनाशी घट्ट पकडून असणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात, आणि ते बरेच असतात. त्यापैकी काहींचं मत हे त्यांच्या राजकीय विचारसरणीने प्रभावित झालेलं असतं. म्हणजे त्यांच्या नेत्याने जर, का “ ग्लोबल वॉर्मिंग झूठ है |” अशी भूमिका घेतली तर, हे लोक फारसा विचार न करता तीच भूमिका लावून धरतात. काहीजण हे ‘आपल्याला काय घेणं देणं आहे’ अशा प्रकारातले असतात. ग्लोबल वॉर्मिंग असलं काय किंवा नसलं काय, त्यांच्या आयुष्यात त्याने काहीच फरक पडणार नाही अशी त्यांची खात्री असते. उन्हाळा फार वाढायला लागला तर, सगळ्या खोल्यांमध्ये एसी लावायचा, थंडी वाढली तर, जास्त गरम कपडे घ्यायचे (तेवढीच फॅशन !) आणि सारखा सारखा अवेळी पाऊस पडायला लागला तर, अजून एक फोर व्हिलर घ्यायची - हे त्यांच्या दृष्टीने  सोपे उपाय असतात.

या दोन प्रकारांच्या पलीकडे तिसऱ्या प्रकारातले लोक असतात, ज्यांना आजूबाजूला घडणाऱ्या घटना दिसत असतात, पण, त्यामध्ये काही संगती आहे हे फारसं पटत नसतं. “ हल्ली पूर्वीइतकी थंडी पडत नाही.” “ वीस-पंचवीस वर्षांपूर्वी उन्हाळ्यात इतकं तापमान वाढायचं नाही.” “ हल्ली जवळजवळ दर वर्षीच थंडीत अवकाळी पाऊस पडतो नाही तर, वादळं येतात, ते पूर्वी क्वचित एखाद्या वर्षी व्हायचं.”- अशा बाबी त्यांच्या लक्षात येतात, पण, त्यामागे ग्लोबल वॉर्मिंग इतकं मोठं कारण असेल हे त्यांच्या पचनी पडत नाही. त्यांच्या दृष्टीने त्यासाठी ‘जगातलं पाप वाढलेलं आहे’ इथपासून ‘असं सगळ्याच पिढ्यांना कायम वाटतं’ इथपर्यंत काहीही कारण असू शकतं. परदेशात होणारी  तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठीची जागतिक परिषद आणि आपल्यावर वारंवार येणारं दुबार पेरणीचं संकट याचा आपापसातील संबंध त्यांना जोडता येत नाही. पण, आता मात्र ग्लोबल वॉर्मिंगमुळे ज्यांचा थेट बळी जाणार आहे असा एक देश समोर आला आहे तुवालू ! 

तुवालू या देशाचं नाव कोणी सहसा ऐकलेलंही नसतं. पॅसिफिक समुद्रात असलेलं हे केवळ २६ चौरस किलोमीटर्स क्षेत्रफळ असलेलं बेट. त्याची एकूण लोकसंख्या आहे जेमतेम साडेदहा हजार. बरं हे काही टुरिस्ट डेस्टिनेशन वगैरे नाही. इथे वर्षाकाठी जेमतेम दीड हजार पर्यटक जातात.  पण, हेच तुवालू बेट अत्यंत दुर्दैवी कारणासाठी अचानक प्रकाशात आलं आहे. समुद्रसपाटीपासून फारसं उंच नसलेलं हे बेट जागतिक तापमानवाढीचा पहिला बळी ठरणार आहे. गेली अनेक वर्षं शास्त्रज्ञ ओरडून  सांगतायत की, जागतिक तापमानवाढ रोखली गेली नाही, तर,  समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल. शास्त्रज्ञांचं हे म्हणणं कोणी फार गांभीर्यानं घेतलं नाही, कारण   समुद्राची पातळी वाढेल म्हणजे काय हे आपल्या डोळ्यासमोर येत नाही. हजारो चौरस मैल पसरलेला समुद्र. त्याच्या भरती ओहोटीच्या पातळीत देखील काही ठिकाणी एकेक किलोमीटरचा फरक दिसतो. अशा समुद्राची पातळी एक सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटरनी वाढली तर, काय होणार आहे? 

तर, तुवालू या संपूर्ण देशाची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची आहे ६.६ फूट. त्याचे किनाऱ्याचे प्रदेश बहुतेक ठिकाणी समुद्रसपाटीला समांतर आहेत. म्हणजे समुद्राला लागून असणारे उंच कडे वगैरे असला काही प्रकार नाही. त्यामुळे तुवालूच्या किनाऱ्यावरील भागात समुद्राचं पाणी आत आलेलं स्पष्ट दिसतं.

तुवालूवर आलेल्या या संकटाचं गांभीर्य जगापर्यंत पोचावं म्हणून यावर्षी झालेल्या ग्लासगो हवामान बदल परिषदेत तुवालूचे मंत्री गुढघाभर पाण्यात उभं राहून आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. ते जिथे उभे आहेत त्या जागी काही वर्षांपूर्वी सपाट स्वच्छ कोरडी जमीन असायची. आता मात्र ती जागा समुद्राने गिळंकृत केली आहे. इतकंच नाही, तर, या छोट्याशा बेटाला हल्ली सतत चक्रीवादळं, आणि महाप्रचंड मोठ्या लाटांना तोंड द्यावं लागतं. चक्रीवादळ आलं की, इथली अनेक पिके नष्ट होऊन जातात. इथली जमीन मोठ्या प्रमाणात प्रवाळापासून तयार झालेली आहे. त्यामुळे इथल्या सखल भूप्रदेशांमध्ये समुद्राचं पाणी जमिनीतून वर येतं. त्याची ओहोटीच्या वेळी खाजणं तयार होतात. समुद्राचं पाणी मोठ्या भरतीला आणि मोठ्या लाटांमुळे वर येऊन इथली जमीन काही ठिकाणी नापीक होऊ लागलेली आहे. मुळात बेटाचं क्षेत्रफळ २६ चौरस किलोमीटर्स असल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर आहे. 

प्रश्न एकट्या तुवालूचा आहे का?
जगाचं तापमान याच वेगाने वाढत राहिलं, तर, काही वर्षात तुवालू हा देश माणसांना राहण्यासारखा उरणार नाही. तिथल्या सगळ्याच्या सगळ्या नागरिकांना इतर कुठल्यातरी देशात निर्वासित म्हणून जगावं लागेल. आणि तुवालू ही या भयंकराची केवळ सुरुवात असेल. सॉलोमन आयलँड्स, सामोआ, मालदिव असे इतरही अनेक बेटांवर वसलेले देश आज ना उद्या याच संकटात ढकलले जाणार आहेत.

Web Title: story of tuvalu country first affect of global warming in world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.