मध्य आशियातील तणावाने नव्या संघर्षाचा प्रारंभ

By admin | Published: January 5, 2016 11:54 PM2016-01-05T23:54:55+5:302016-01-05T23:54:55+5:30

सौदी अरेबियाने दहशतवादाच्या विरोधात मुख्यत: इस्लामी देशांची आघाडी निर्माण केल्याची घटना अजून ताजी असतानाच मध्य आशियात नव्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे

Stress is the start of a new struggle in Central Asia | मध्य आशियातील तणावाने नव्या संघर्षाचा प्रारंभ

मध्य आशियातील तणावाने नव्या संघर्षाचा प्रारंभ

Next

प्रा.दिलीप फडके, (ज्येष्ठ विश्लेषक)
सौदी अरेबियाने दहशतवादाच्या विरोधात मुख्यत: इस्लामी देशांची आघाडी निर्माण केल्याची घटना अजून ताजी असतानाच मध्य आशियात नव्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सौदीने इराकबरोबरचे आपले राजनैतिक संबंध तोडले असून इराकच्या दूतावासातल्या अधिकाऱ्यांना देशाबाहेर जाण्याचा आदेश दिला आहे. एका बाजूला सौदी आणि त्याची साथ देणारे सुन्नी बहुल देश तर दुसऱ्या बाजूला इराण व काही शियाबहुल देश अशा दोन फळ्या झालेल्या दिसतात आणि आतापर्यंत सर्वांच्या समोर असलेल्या इसिसच्या जहाल अतिरेक्यांचा मुकाबला करण्याचा विषय मागे पडून एक नवाच संघर्ष सुरु होताना दिसतो आहे. यामुळे इसिसच्या विरोधात आघाडी निर्माण करण्याच्या जागतिक प्रयत्नांना मोठाच धक्का पोहचेल अशी चिन्हे दिसत आहेत.
हा विषय सुरु झाला तो सौदीने दहशतवादी कारवायांसाठी गुन्हेगार म्हणून घोषित केलेल्या ४७ जणांना फाशी दिल्यानंतर. त्या कथित दहशतवादी लोकांमध्ये शियापंथीय धर्मगुरू निमर अल निमर यांचा समावेश होता. ५६ वर्षीय निमर यांच्यासह ४७ जणांना मृत्युदंड देण्यात आल्याचे जाहीर झाल्याच्या काही तासातच देशात निदर्शने सुरु झाली. शियाबहुल इराण आणि इतर देशांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालीे. याचा परिणाम आता सगळ्याच मध्य आशियात होऊ लागला आहे. सौदीच्या मागोमाग जगभरातील शियापंथीय समाजात या घटनेवरून आक्रोेश व्यक्त होतो आहे. इराण व्यतिरिक्त, पाकिस्तान, इराक, कुवेत, येमेन आणि लेबेनॉनच्या शिया नेत्यांनीही सौदीला परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. इराणने तर सौदीला ‘व्हाइट इसिस’ म्हणून संबोधले आहे. शिया धर्मगुरूला मृत्युदंडाची शिक्षा देणाऱ्या सौदी अरेबियाच्या विरोधात इराणी नागरिकात तीव्र असंतोष निर्माण झाल्याने रविवारी शेकडो निदर्शकांनी सौदीच्या राजदूत कार्यालयावर हल्लाबोल केला आणि सुन्नी पंथीयांच्या धर्मस्थळांची जाळपोळ करण्यात आली.
‘सीएनएन’ने कॅथरिन शोईचेस्ट आणि मारीअनो कॅस्टीलो यांचे एक वार्तापत्र प्रकाशित केले असून त्यात ले.जन.मार्क हर्टिलंग या लष्करी विश्लेषकाचे मत दिले आहे. त्यांच्या मते हा तणाव सातत्याने वाढण्याची शक्यता आहे व त्याची परिणती सौदी आणि इराण यांच्यातल्या सशस्त्र लढाईत होण्याची शक्यता आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने लीज स्ली यांचे विश्लेषण प्रकाशित केले आहे. मध्य आशियातल्या तणावग्रस्त परिस्थितीत अमेरिकेची स्थिती अवघड झाली असल्याचे ते नमूद करतात. एका बाजूला ज्याच्यासोबत सहकार्याचे संबंध निर्माण करण्याच्या प्रयत्नात अमेरिका आहे असा इराण तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेशी आर्थिक हितसंबंध असणारा जुना मित्र सौदी अरेबिया अशा कात्रीत ओबामा प्रशासन सापडले असल्याचे सांगून ते पुढे म्हणतात, या परिस्थितीमुळे इसिसच्या विरोधातल्या मोहिमेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे व त्याचा लाभ इसिसला होणार हे नक्की. सौदीच्या विमानसेवेने इराण आणि सौदीमधली सर्व उड्डाणे रद्द केल्याचा फटका तिथून सौदीच्या धर्मस्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या मुस्लीम यात्रस्थांना बसणार आहे. रशिया, चीन यासारख्या देशांनीही हा तणाव कमी व्हावा म्हणून प्रयत्न करायला सुरुवात केल्याची नोंद त्यांनी घेतली आहे. ओबामा प्रशासन या स्थितीत कुणा एकाची बाजू न घेता दोन्ही पक्षांना सारख्या अंतरावर ठेवून तणाव कमी व्हावा यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती वॉशिंग्टन पोस्टमधल्या करेन डीयंग यांच्या दुसऱ्या एका लेखात वाचायला मिळते.
बांगलादेशच्या ‘द डेली स्टार’च्या उपसंपादक आशा मेहेरीन अमीन यांच्या लेखातही त्यांनी या प्रश्नाचा विस्तृत आढावा घेतला आहे. अल निमर यांना अल कायदाच्या दहशतवादी अतिरेक्यांच्या बरोबर फाशी दिल्याचा संताप शियापंथीयांच्या मनात जास्त आहे हे नमूद करून त्या म्हणतात, ह्यूमन राईट्स वॉच सारख्यांनी दोन्ही देशांमधल्या फाशीच्या पद्धतीबद्दलची आपली नाराजी वारंवार व्यक्त केली आहे. तेथे अपिलांची भरवशाची पद्धत अस्तित्वात नाही हे नमूद करून अल कायदा आणि इसिसच्या विरोधात लढण्यासाठी सगळ्या मुस्लीम जगाने एकत्र येण्याची गरज आहे असेही त्या सांगतात. बांगलादेशसह इतरही मुस्लीमबहुल देशांमध्ये दहशतवादाच्या विरोधातल्या मोहिमा चालवल्या जात असून सौदीतदेखील यासाठी विशेष प्रयत्न केले जात असताना सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमुळे या प्रयत्नांना धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण होईल असे त्यांनी मुद्दाम नमूद केले आहे. एकूणातच बांगलादेशातले जनमत अल निमर यांना देहदंड देण्याच्या बाजूने नाही हेदेखील ध्यानात घेण्यासारखे आहे.
‘न्यूयॉर्क टाईम्स’ने या विषयावरच्या आपल्या अग्रलेखात सौदीमधली मारून टाकण्याची पद्धत अतिशय क्रूर असल्याचे म्हटले आहे. अल निमर यांना मारल्याची प्रतिक्रिया कशा प्रकारची असेल हे सौदीला नक्कीच माहिती असणार. पण इराण आणि इतर देशांसमोर आपले स्वत:चेच प्रश्न उभे असताना ते फारसे काही करू शकणार नाहीत, असा अंदाज बहुधा सौदीने केला असावा. तेहरानने गेल्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ७००हून अधिक लोकाना फाशी दिले आहे. मानवी हक्कांच्या बाबतीत सौदीचे रेकॉर्डही तितकेच खराब आहे. पण सध्या इस्लामी दहशतवादी गटांनी उभे केलेले संकट पाहाता किंवा सिरीयातल्या गृहयुद्धाचा वणवा शांत करण्याची आवश्यकता पाहाता वॉशिंग्टनला या दोघाना बरोबर घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण याचा अर्थ असा नाही की दोन समूहांमध्ये परस्परांमध्ये वैर निर्माण होईल अशा बेछूटपणाच्या कृतींकडे आणि त्यातून या भागाच्या स्थैर्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हानी पोहोचेल अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केले जावे.
पाकिस्तानच्या ‘डॉन’ने या विषयावरच्या आपल्या अग्रलेखात सद्यस्थितीत तणाव वाढू न देण्याचे आश्वासन सौदी आणि इराण या दोघांनीही आॅस्ट्रियाला दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. रियाद आणि तेहरान या दोघांनी किरकोळ विषयांमध्ये अडकून न पडता आपल्या धोरणांमधून दूरदृष्टी आणि साहस दाखवावे आणि तणाव कमी करून संघर्ष टाळावा असे सांगताना डॉनने युरोपचे उदाहरण देत भाष्य केले आहे की, तिथे झालेल्या तीस वर्षांच्या संघर्षामुळे जे हाल झाले त्याचे स्मरण ठेवून हे दोन्ही देश या सगळ्या प्रदेशाला युद्धाच्या खाईत लोटणार नाहीत अशी अपेक्षा आहे. शेवटी भावनाशील होत डॉनने नमूद केले आहे की आजच्या मध्य पूर्वेतल्या स्थितीतले पक्ष एक दिवस नाहीसे होतील पण त्यांच्या कृत्यांचे परिणाम भविष्यातल्या पिढ्यांंना सहन करावे लागणार आहेत हे विसरले जाता कामा नये. सौदी आणि इराणमधल्या तणावाचा ज्वालामुखी उफाळून आला असल्याचे दाखवणारे एक बोलके व्यंगचित्रही पाकिस्तानच्या डॉनमध्ये प्रकाशित झाले आहे.

Web Title: Stress is the start of a new struggle in Central Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.