भक्कम गाळणा
By admin | Published: January 8, 2017 01:29 AM2017-01-08T01:29:23+5:302017-01-08T01:29:23+5:30
नाशिक जिल्ह्यात बऱ्याच डोंगररांगा आहेत. यात एकूण ५८ किल्ले आहेत. त्यात देवगिरी किल्ल्याची भव्यता दाखवणारा, खानदेशाचे नाक असा समुद्र सपाटीपासून ७१० मी. उंचीवर
- गौरव भांदिर्गे
नाशिक जिल्ह्यात बऱ्याच डोंगररांगा आहेत. यात एकूण ५८ किल्ले आहेत. त्यात देवगिरी किल्ल्याची भव्यता दाखवणारा, खानदेशाचे नाक असा समुद्र सपाटीपासून ७१० मी. उंचीवर वसलेला असा गाळणा टेकड्यांचा म्होरक्या... किल्ले गाळणा.
कसे जायचे ?
१. मालेगाव बसस्थानकावरून बसने ३० कि.मी. अंतरावर गाळणे गावात पोहोचावे.
२. धुळे येथून बसने डोंगराळे गावात उतरावे व ४ कि. मी.ची पायपीट करून गाळणा गाव गाठावे.
गडदर्शन:-
गाळणा गावात गोरक्षनाथांचा आश्रम आहे. त्याला वळसा मारून गेल्यावर आपण गडाच्या पायथ्याला पोहोचतो. पायवाटेने पुढे गेल्यावर, आपण पहिल्या म्हणजे परकोट दरवाजात येतो. या दरवाजाला भव्य कमानी असून, दगडात कोरलेली कमळे आहेत व दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. पुढे पायऱ्यांच्या वाटेने दोन वळसे मारले की, आपण दुसऱ्या लोखंडी दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या मधल्या चर्येत एक पर्शियन शिलालेख आहे. पुढे जाताना आपल्याला वाटेत एक भग्न शिलालेखाचा दगड दिसतो.
यानंतर तिसरा म्हणजे, कोतवाल पिर दरवाजा व लांबच लांब पसरलेली ३५ ते ४० फूट उंचीची तटबंदी पाहायला मिळते. थोडे पुढे गेलं की, चौथा लाखा दरवाजा येतो. येथे दगडात कोरलेली कमळे व पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. उजव्या हाताला सुंदर महिरपी कमान आपल लक्ष वेधून घेते.
दरवाजा ओलांडून पुढे गेलं की, आपल्याला तटबंदीमध्ये बांधलेले दोन नक्षीदार सज्जे व कोठी पाहायला मिळतात. सरळ चालत गेले की, डाव्या बाजूला ५ काताळकोरीव गुहा दिसतात. त्यातील चौथ्या गुहेत गणपती व मारुतीची मूर्ती असून, पुरातन शिवलिंग आहे. गुहेतून बाहेर येताच, समोरच तटबंदीवर डाव्या व उजव्या बाजूला शरभाची शिल्पे असून, मधोमध पर्शियन शिलालेख आहे, तसेच सरळ गेल्यास चोर दरवाजा लागतो.
त्या दरवाजातून आपण थेट पहिल्या दरवाजात पोहोचतो. तिथून पुन्हा चौथ्या दरवाजात यावे.
तिथून पायऱ्यांचा वाटेने सरळ वरती जाताना वाटेत सुंदर महिरपी कमान दिसते, तसेच डाव्या हाताने पुढे गेले की, दक्षिणाभिमुख मशिदीसमोर येतो. या मशिदीचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यातील प्रत्येक खांबावर कुराणातील आयते व सुंदर मीनार कोरलेली आहेत. मशिदीच्या बाजूलाच २० फूट खोलीचा एक बांधिव हौद आहे. इथून डाव्या हाताने सरळ गेले की, आपणास अंबरखाना आणि सदर व त्यातील देवड्या, शिलालेख पाहायला मिळतो. येथून डाव्या बाजूला गेले की, तिहेरी कोट व एकाखाली एक खोदलेल्या टाक्या पाहायला मिळतात. अंबरखान्याच्या मागच्या बाजूने वर जाताच आपल्याला ४ नक्षीदार थडगी पाहायला मिळतात. इथून पुन्हा मशिदीजवळ येऊन, तीन कमानींनी तोललेली दगडी वास्तू, बाराही महिने वाहणारा झरा, जलसंकुल, कुंड, दगडी जिने, भल्या मोठ्या चर्या पाहायला मिळतात.
इतिहास
१४ व्या शतकात हिंदुंचे राज्य होते. बहामनी शासनसुद्धा हा किल्ला जिंकू शकले नाही. बागलाणचा राजा बहिर्जी याने गाळणा जिंकल्यानंतर, इ. स. १५२६ मध्ये अहमदनगरचा बादशहा बुरहान निजामशाहने किल्यावर आक्रमण करून, गाळणेश्वर महादेवाचे मंदिर उद्ध्वस्त करत मशीद बांधली. याच गाळणेश्वराच्या मंदिरावरून किल्याचे नाव ‘गाळणा’ असे पडले. इ.स.१६३१ मध्ये निजामशाहाचा खून झाला. शहाजी राजांनी मोगलांशी बंड करून किल्ला ताब्यात घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पण मोगल सुभेदार खानजमान, लळीगाचा मोगल किल्लेदार मीर कासिम, मुहुमद खान यांनी हा किल्ला ७ आॅक्टोबर १६३२ मध्ये ताब्यात घेतला. इ.स. १६७६ मध्ये जाफर लष्करी बेग हा किल्लेदार औरंगजेबाच्या परवानगीविना थालनेरच्या किल्लेदाराच्या भेटीस गेला. म्हणूनच औरंगजेबाने त्याची २० स्वरांची मनसब काढण्याची शिक्षा दिली. इ.स.१७५२ मध्ये निजामाशी झालेल्या भालकीच्या तहान्वये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्या वेळी पेशव्यांनी हा परगणा मल्हारराव होळकरांच्या ताब्यात दिला. शेवटी इ.स.१८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.