मजबूत गुडघे स्वस्तात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:38 AM2017-08-18T00:38:16+5:302017-08-18T00:38:18+5:30
एखाद्याची अक्कल काढायची असल्यास, त्याची अक्कल घुटण्यात आहे काय?
एखाद्याची अक्कल काढायची असल्यास, त्याची अक्कल घुटण्यात आहे काय? असा शब्दप्रयोग सर्रास केला जातो किंवा कुणाला शरणागती पत्करण्यास भाग पाडले तरी ‘त्याला गुडघे टेकायला लावले’, असे आम्ही मोठ्या अभिमानाने सांगत असतो. तर असा हा ‘घुटणा’ म्हणजेच गुडघा मानवी शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग. गुडघा निकामी झाला की माणसाचे चालणेच थांबते. अशा वेळी मग कृत्रिम गुडघा बसविण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो. एरवी या गुडघ्याच्या प्रत्यारोपणाचा अवाढव्य खर्च आणि रुग्णांची होणारी लुटमार बघितली की मग कुणाच्याही घुटण्यात आल्याशिवाय राहत नाही. मात्र यापुढे तशी गरज पडणार नाही. कारण केंद्र शासनाने आता गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठीच्या दरांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेवरील खर्च जवळपास ७० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता असून, समस्त गुडघाग्रस्तांसाठी ही आनंदाची वार्ता आहे. राष्टÑीय औषध दर नियंत्रण प्राधिकरणाने (एनपीपीए) गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णांची होणारी लुबाडणूक थांबविण्याकरिता रुग्णालये, वितरक तसेच आयातदारांच्या नफेखोरीचे आकडे गेल्या आठवड्यात उघडकीस आणले होते. या शस्त्रक्रियेत तब्बल ३०० टक्क्यांहून अधिक नफा कमावला जात असल्याचे एनपीपीएने लक्षात आणून दिले आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात हृदयरुग्णांसाठीच्या स्टेंटस्प्रमाणे गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया स्वस्त करण्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर हालचालींना वेग आला. हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आणि रुग्णांना मोठा दिलासा देणारा आहे. अपघात, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे आज अस्थिरोग आणि प्रामुख्याने गुडघ्यांचे आजार प्रचंड वाढले आहेत. देशात आजमितीस दीड ते दोन कोटी लोकांना गुडघा प्रत्यारोपणाची गरज आहे. परंतु केवळ सव्वा ते दीड लाखच शस्त्रक्रिया होत असतात. कारण यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येत असल्याने अनेकदा रुग्णांना ते आर्थिकदृष्ट्या परवडत नसते. परंतु आता किमती घसरल्याने ते शक्य होणार आहे. केंद्र शासनाने यावर्षीच्या प्रारंभी नवे आरोग्य धोरण जाहीर केले होते. या धोरणात ज्या महत्त्वाच्या पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यात जनतेला आरोग्यसेवेवर कराव्या लागणाºया खर्चात कपात प्रमुख होती. त्यादिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे समजण्यास हरकत नाही.