उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे अटलजी!
By admin | Published: December 25, 2014 11:47 PM2014-12-25T23:47:56+5:302014-12-25T23:47:56+5:30
अटलजींचे जाहीर भाषण सर्वप्रथम मी १९६७ मध्ये ऐकले. त्यावेळी मी शिकत होतो. अटलजींच्या भाषणासंबंधी मी बरेच ऐकले होते;
अरुण जेटली ,केंद्रीय अर्थमंत्री
अटलजींचे जाहीर भाषण सर्वप्रथम मी १९६७ मध्ये ऐकले. त्यावेळी मी शिकत होतो. अटलजींच्या भाषणासंबंधी मी बरेच ऐकले होते; पण त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मला अचानक मिळाली. मी दिल्लीत राहात होतो त्या भागात जनसंघाची सभा होती. १९६७ च्या निवडणुकीचा तो काळ होता. त्यामुळे प्रचारसभेत भाषण देण्यासाठी ते आले होते. ते एक आदर्श वक्ता आणि नेता व्हायचे होते; पण त्यादृष्टीने त्यांची वाटचाल मात्र सुरू झाली होती. त्यांचे भाषण म्हणजे श्रवणीय आनंद असायचा. आम्ही मुलं त्यांचे भाषण ऐकून त्यातील वाक्येच्या वाक्ये उद्धृत करीत असू. त्यांच्या भाषणाचा प्रभाव अनेक दिवस मनावर कायम असायचा. अनेकजण त्यांच्या भाषणाचे अनुकरण करायचा प्रयत्न करायचे. त्यांची वक्तृत्व शैली अत्यंत आकर्षक अशीच होती.
१९७० मध्ये मी जनसंघाच्या विद्यार्थी शाखेचा क्रियाशील सदस्य झालो. ही विद्यार्थी संघटना ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ म्हणून ओळखली जात होती. १९७० मध्ये मी अ.भा.वि.प. साठी काम करू लागलो. त्या काळात अटलजींचा चेहरा सार्वजनिक सभांमधून तसेच लोकसभेतही झळकत असे. आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जात असू. ते प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी आम्ही त्यांना त्या प्रश्नांची माहिती पुरवीत असू. दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भाषणे देण्यासाठीही आम्ही त्यांना अनेकदा निमंत्रित केले होते. त्यांचे भाषण ऐकणे ही मेजवानीच असायची.
दिल्ली विद्यापीठात १९७३पासून मी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करू लागलो, तेव्हापासून अटलजींशी माझा अधिक निकटचा संबंध आला. त्यानंतर त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही अनेकदा मिळाली. आमचे म्हणणे ते काळजीपूर्वक ऐकायचे. आम्ही काही नव्या कल्पना मांडल्या, की त्यांचा ते स्वीकार तर करायचे; पण तसे करताना हास्यविनोदही करायचे. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या चळवळीच्या काळात देशभर हिंडून त्यांनी अनेक सभांना संबोधित केले होते.
१९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा अटलजी, अडवाणीजी यांना अन्य काही नेत्यांसह बंगलोर तुरुंगात ठेवण्यात आले होते. मलादेखील सुरुवातीला अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये हलविण्यात आले. तुरुंगात असतानाच अटलजींचे पाठीचे दुखणे वाढले, तेव्हा उपचारासाठी त्यांना घरीच स्थानबद्ध करण्यात आले. दुखणे वाढल्यावर त्यांना दिल्लीच्या ए.आय.आय.एम.एस. मध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांच्या कविमनाचे प्रत्यंतर आले. त्यांनी एक कविता लिहिली. तेथील डॉक्टरांनी अटलजींना म्हटले होते, ‘‘अटलजी, आपण जास्त वाकला तर नव्हता?’’ (आप ज्यादा झुक गये होंगे) त्यावर अटलजी म्हणाले, ‘‘डॉक्टरसाब, झुक तो सकते नहीं, यूँ कहीये की मूड गये होंगे’’ त्यानंतर त्यांनी जी कविता रचली ती १९७७ च्या निवडणूक प्रचारसभांतून अनेकदा ऐकायला मिळाली. त्याच्या पहिल्या ओळी होत्या, ‘‘टूट सकते है मगर हम झुक नहीं सकते.’’
त्यानंतरच्या काळात भारताचे परराष्ट्र मंत्री, विरोधी खासदार, विरोधी पक्ष नेता अशा विविध रूपात त्यांना पाहायला मिळाले. वयाने ते वाढत असताना आमच्या दृष्टीसमोर त्यांची प्रतिमा ‘एक उत्कृष्ट व्यक्ती’ अशीच होती. तरीही देशाचे ते पंतप्रधान होऊ शकले नाही, याची खंतही वाटत होती; पण अखेर आमचे ते स्वप्न पूर्ण झाले. ते देशाचे पंतप्रधान झाले आणि चांगले पंतप्रधान असा त्यांनी लौकिक संपादन केला.
आपल्या देशाच्या लोकशाही पद्धतीतूनच अटलजींची जडणघडण झाली आहे. संसदेची मूल्ये त्यांनी आत्मसात केली होती. जनमत आणि सुसंवाद यांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. त्यांच्या कॅबिनेटच्या बैठका या नेहमी हसत खेळत पार पडायच्या. त्यात ताण-तणाव अजिबात जाणवत नव्हता. स्वत: विनोद करून त्यावर स्वत:च खळखळून हसण्याची त्यांची लकब विलोभनीय होती. त्या बैठकीत त्यांनी एखादा विषय मांडल्यावर मंत्रिमंडळातील एखाद्या सहकारी मंत्र्याने विरोधी मत नोंदवले, तर ते शांतपणे ऐकून घ्यायचे. सहकाऱ्यांना चर्चा करण्यास ते उद्युक्त करायचे. कारण चर्चेतूनच नवे विचार प्रकट होत असतात असे त्यांना वाटायचे. त्यामुळे त्यांनी खुली चर्चा कधीच नाकारली नाही. पण चर्चेनंतर अखेरचा शब्द मात्र त्यांचाच असायचा.
आर्थिक विषयांवर ते उदारमतवादी होते. प्रत्येक क्षेत्रात पायाभूत सोयी निर्माण व्हायला हव्यात, असे त्यांना वाटत असे. त्यामुळे पायाभूत सोयींची निर्मिती करण्यावर त्यांचा भर असायचा. औद्योगिक विकासासाठी पायाभूत सोयींची निर्मिती आवश्यक आहे असे त्यांना वाटायचे. महामार्गाची निर्मिती, वाहतुकीचा चतुष्कोन, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा ही त्यांचीच निर्मिती आहे. देशभर महामार्गांचे जाळे विस्तारायच्या विचारातूनच त्यांनी महामार्ग विकासाचा कार्यक्रम हाती घेतला होता. आपल्या शेजारी राष्ट्रांशी संबंध सुधारणे हे देशाच्या विकासासाठी गरजेचे आहे असे त्यांना वाटायचे आणि त्यासाठी हे संबंध सुधारायचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता. पाकिस्तानशी चांगले संबंध सुधारण्यासाठी त्यांनी भारत-पाक दरम्यान बससेवा सुरू केली. त्यावेळी त्यांनी फार मोठा राजकीय धोका पत्करला होता. २००३ मध्ये त्यांनी चीनसोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी चीनसोबत त्यांनी सीमासंबंधी करारही केला. कारण सीमावाद हा चीन-भारत चांगल्या संबंधांच्या मार्गातील अडथळा आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्या सत्ताकाळात चीन-भारत यांच्या संबंधांचे नवे पर्व सुरू झाले, असे निश्चित म्हणता येईल.
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील सर्वश्रेष्ठ वक्ता असा लौकिक त्यांनी संपादन केला होता. शब्दांशी खेळ करणे हा त्यांचा आवडीचा छंद होता; पण बोलताना ते कधीही लक्ष्मणरेषा ओलांडायचे नाही. संयमित बोलणे हे त्यांच्या भाषणाचे वैशिष्ट्य असायचे. ते शब्दसृष्टीचे जादूगार होते. भाषण देताना त्यांच्या हातून कधीही अनौचित्यकारक वर्तन घडले नाही. सामाजिक सुसंवादाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते त्यामुळेच चांगले संसदपटू असा लौकिक ते संपादन करू शकले. राष्ट्रीय प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी पक्षीय विचार कधी केला नाही म्हणून सगळ्या पक्षातील नेते त्यांच्याकडे आदराने बघत. त्यांचा नव्वदावा वाढदिवस ‘सुशासन दिवस’ म्हणून पाळण्यात येत असतानाच त्यांना ‘भारतरत्न’ ही उपाधी देण्याची घोषणा होणे हा त्यांच्या कामाचा, व्यक्तिमत्त्वाचा आणि देशसेवेचा यथोचित गौरवच म्हटला पाहिजे. त्यांना मी चांगले आरोग्य आणि निरामय आरोग्य चिंतितो.