नियतीच्या फे-यात तेज झाकोळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 03:19 AM2017-11-04T03:19:29+5:302017-11-04T03:20:39+5:30
एखाद्याचे जीवन संघर्षपूर्ण असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती, कुटुंबीयांचे पाठबळ आणि गुरूंचे मार्गदर्शन याआधारे त्यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळणा-या व्यक्ती भोवताली दिसून येतात. पण त्यापैकी काहींना नियतीच्या फे-यापुढे पराभव स्वीकारावा लागतो.
- मिलिंद कुलकर्णी
गायन आणि प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगणारा प्रज्ञाचक्षू तेजस हा नियतीपुढे पराभूत झाला.
एखाद्याचे जीवन संघर्षपूर्ण असले तरी दुर्दम्य इच्छाशक्ती, कुटुंबीयांचे पाठबळ आणि गुरूंचे मार्गदर्शन याआधारे त्यावर मात करीत स्वत:ची वाट धुंडाळणा-या व्यक्ती भोवताली दिसून येतात. पण त्यापैकी काहींना नियतीच्या फे-यापुढे पराभव स्वीकारावा लागतो. त्यातून ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा...’ या महाकवी गदिमांच्या काव्यपंक्तीची यथार्थता जाणवते. जळगावच्या अवघ्या २० वर्षांच्या प्रज्ञाचक्षू उदयोन्मुख गायक तेजस नाईक याच्या अकाली निधनाने मानवी संघर्ष आणि नियतीपुढील हतबलता पुन्हा प्रत्ययास आली.
जळगावातील शाळेत शिक्षक असलेल्या नितीन आणि गृहिणी सुवर्णा या दाम्पत्याच्या तेजस या मुलाला बालपणापासून वेगवेगळ्या आजारांनी घेरले. तीन महिन्यांचा असताना दम्याचा आजार बळावला. नऊ वर्षाचा होईपर्यंत सुमारे ३५ ते ४० वेळा त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले, यावरून त्याच्या प्रकृतीअस्वास्थ्य, प्रतिकारक्षमतेच्या अभावाची कल्पना यावी. चौथीत असताना त्याला चिकुनगुनिया झाला. आजार बळावून अर्धांगवायूचा झटका आला. पुण्यात २२ दिवस कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. या जीवघेण्या आजारात त्याची दृष्टी गेली. आई-वडिलांवर आभाळ कोसळले. परंतु त्यांनी तेजसला भक्कम आधार दिला. तेजसने अभ्यास आणि गायनात मन गुंतवले. दहावीत ८५ टक्के तर बारावीत ७७ टक्के गुण मिळविले. गायनाचा अभ्यास आणि रियाज नियमितपणे करणाºया तेजसची जिद्द आणि आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. महाराष्टÑातील प्रमुख शहरांमध्ये आयोजित गायन स्पर्धेत तो आवर्जून सहभागी व्हायचा. शंभराहून अधिक बक्षिसे त्याने मिळविली. मू.जे. महाविद्यालयात बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असलेला तेजस विद्यार्थी व प्राध्यापकांचा लाडका होता. विद्यापीठाच्या युवक महोत्सवात त्याने तीन सुवर्णपदके मिळविली. प्रांजल पाटील या मूळ जळगावकर प्रज्ञाचक्षू मुलीने केंद्रीय लोकसेवा आयोगात यश मिळविले. बहुदा तिचा आदर्श समोर ठेवत तेजसदेखील या परीक्षेच्या तयारीला लागला. दीपस्तंभ मनोबल केंद्रात तो दोन वर्षे तयारी करीत होता. या केंद्रातील काही तरुणांना कृत्रिम पाय बसविल्यावर पुढील दिवाळीपर्यंत आपल्यालाही दृष्टी मिळेल, अशी आस त्याला होती.
गायन आणि प्रशासकीय सेवेचे तेजसचे स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीने आई-वडील प्रयत्नशील होते. सुमधूर गायनामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्याला आवर्जून बोलाविले जाई. कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात गायलेले गाणे हे त्याचे सार्वजनिक कार्यक्रमातील बहुदा शेवटचे गाणे असावे. डेंग्यू झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. कावीळ, न्यूमोनियाची भर पडल्याने प्रकृती ढासळली. औरंगाबादला हलविण्यात आले. १० दिवसांची झुंज अपयशी ठरली आणि नियतीपुढे तेज झाकोळले. तेजसवर जळगावकरांचे निस्सीम प्रेम होते. श्रद्धांजलीपर तीन मोठे कार्यक्रम झाले. त्याच्या आठवणी सांगताना शिक्षक, कलाकार, विद्यार्थी ढसाढसा रडले. त्याच्या स्मरणार्थ दीपस्तंभच्या मनोबल केंद्रात संगीत कक्ष आणि संगीत पुरस्काराची घोषणा झाली. तेजसविषयी जळगावकर हळवे झालेले असताना महापालिका प्रशासनाची असंवेदनशीलता दिसून आली. तेजसच्या मृत्यूचे डेंग्यू हे एक कारण असताना त्याच्या घराचा परिसर मृत्यूनंतरही चार दिवस तसाच अस्वच्छ होता. कलावंताची मृत्यूनंतरही उपेक्षा वेदनादायक आहे.