विद्यार्थी म्हणजे प्रवेश प्रक्रिया आणि परीक्षा यांचे केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:15 AM2019-01-20T04:15:45+5:302019-01-20T04:15:53+5:30
सीईटी आणि नीटसारख्या सामाईक परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात.
- आनंद रायते
सीईटी आणि नीटसारख्या सामाईक परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. वैद्यकीय, आयुष, तंत्रशिक्षण, कृषी दुग्ध व मत्स्य, उच्च शिक्षण, कला शिक्षण संचालनालयाच्या महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाचे व शुल्काचे विनियमन करण्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे मुंबईतील प्रवेश नियामक प्राधिकरण व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल). यंदापासून विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेल नवीन स्वरूपात येत असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त आनंद रायते यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’मध्ये दिली.
२०१९-२०च्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काय महत्त्वपूर्ण बदल केले आहेत?
यंदा प्रथमच एमएचटी-सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यात आॅनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या निर्देशानुसार राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतला आहे. या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना आॅनलाइन परीक्षेचा सराव करण्याकरिता दोन सराव परीक्षा नाममात्र शुल्क भरून देण्याची संधी महाआॅनलाइन पोर्टलमार्फत मिळणार आहे. १ जानेवारीपासून सुरू झालेल्या सीईटी नोंदणीला सुरूवात झाली असून १९ जानेवारीपर्यंत राज्य सीईटीसाठी तब्ब्ल ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
एकूण किती परीक्षा आॅनलाइन घेणार?
राज्यातील १६ परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात येतील. या वर्षी कला संचालनालयाच्या परीक्षेतील एक भाग हा आॅनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कला शाखेची प्रात्यक्षिक परीक्षा मात्र नियमित आॅफलाइन पद्धतीनेच घेण्यात येईल. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे विद्यार्थ्यांसाठी विशेष हेल्पलाइनही सुरू केली आहे. सोबतच विद्यार्थ्यांच्या मेलवरून येणाºया प्रश्नांना, समस्यांना योग्य उत्तरे आणि मार्गदर्शन करण्याचे काम अविरत सुरूच आहे.
सफलता पोर्टल काय आहे?
राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष राबवित असलेल्या प्रवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे सफलता पोर्टल. बोगस शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखल्यांच्या आधारे अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना रोखण्यासोबतच प्रवेश प्रक्रियेतील कागदपत्रांची पडताळणी पारदर्शक होण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सफलता पोर्टल या डिजिटल लॉकरची निर्मिती केली आहे. यामध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीने राज्यातील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाºयांना त्यांच्या कागदपत्रांसोबतच आरक्षणासाठी दिलेले दाखले पाहता येणार आहेत. अशा प्रकारचे पोर्टल निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. सीईटी सेलच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांसोबतच कृषी अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना त्यांचे दाखले पोर्टलवर पाहता येतील.
डिजिटल लॉकरची सुविधा कशी असेल?
चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या दहावी, बारावी, पदवी गुणपत्रिका, सीईटी ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अशी शैक्षणिक कागदपत्रे, तर उत्पन्न, जात, जातवैधता, अधिवास प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेयर असे राखीव प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक दाखले विद्यार्थ्यांसोबत सामान्यांना एका क्लिकवर पाहता येतील. सफलता पोर्टलद्वारे तपासणी झालेल्या प्रवेशाचा संपूर्ण तपशील संबंधित विद्यापीठांना उपलब्ध केला आहे. ज्याद्वारे प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांना नामांकन व पात्रता प्रक्रियेसाठी पुन्हा मूळ कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. त्यांना त्यांची अपलोड केलेली मूळ प्रमाणपत्रे केव्हाही - कोठूनही उपलब्ध व्हावीत, यासाठी डिजिटल लॉकर देण्याचा प्रवेश नियामक प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. सफलता पोर्टलवरचा डाटाबेस शासनामार्फत राबविण्यात येणाºया विविध लोकाभिमुख विद्यार्थी केंद्रित योजनांसाठी उपयोगी ठरणार आहे, तसेच या डाटाबेसचा महा-डीबीटी या आॅनलाइन योजनेद्वारे देण्यात येणारे शिष्यवृत्ती/ शुल्क सवलती प्रकरणांची प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे.
नोंदणी न केलेल्या महाविद्यालयांवर नियंत्रण कसे ठेवणार?
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील सर्व प्रवेश प्रक्रियेच्या पडताळणीचे कामकाज यंदा सफलता या पोर्टलद्वारे आॅनलाइन करण्यात येणार असल्याच्या सूचना परिपत्रकाद्वारे उच्च शिक्षण संचालनालयाद्वारे महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. यासाठी राज्यातील महाविद्यालयांनी आपल्याकडील प्रवेश प्रक्रिया झालेल्या अभ्यासक्रमांची नोंदणी या पोर्टलवर करणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप राज्यातील काही महाविद्यालयांनी यावर नोंदणी केलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या बैठकीत महाविद्यालयांना नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, जी महाविद्यालये नोंदणी वेळेत करणार नाहीत, त्यांना दंड आकारण्यात येईल.
सेतू केंद्राची प्रवेश नियमावली कशी असेल?
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत जिल्हा स्तरावर विविध सेतू केंद्रे स्थापन करून, उमेदवाराने अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी होत आहे. सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मूळ प्रवेश प्रक्रियेच्या वेळी अनेक कारणांनी आणि नियमावलीत नमूद नियमांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडून विद्यार्थी प्रवेशाला मुकतात. हे होऊ नये यासाठी यंदापासून सीईटी सेल प्रवेश नियमांचा मसुदा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी यंदा संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहे. विद्यार्थ्यांना याचा अभ्यास करून, प्रक्रिया समजावून घेऊन, त्यावर काही हरकती सूचना असल्यास, त्या प्राधिकरणाला सुचविणे अपेक्षित आहे.
विद्यार्थ्यांसाठी काही विशेष योजना आहेत?
राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष ही संस्था ना नफा ना तोटा तत्त्वावर चालते. आत्तापर्यंत १०० कोटींचा शेष कोष कक्षाकडे निर्माण झाला आहे. गरीब कुटुंबांतील हुशार व उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाºया मुलींचे शिक्षण थांबू नये, यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने पुढाकार घेत २ कोटी रकमेचा निधी विद्यार्थिनींसाठी राखून ठेवला आहे. तसेच सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी बचत खात्यात ठेवला आहे. यावर बँकेतर्फे ६ टक्के व्याज मिळते. या व्याजाच्या रकमेतील ४ टक्के निधी कक्षाच्या खर्चासाठी, तर २ टक्के निधी हा विद्यार्थी विकास उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. हा निधी प्रवेशाच्या वेळी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच निधी कोणाला व किती द्यायचा, याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. (शब्दांकन : सीमा महांगडे)