डॉक्टर होण्याच्या स्वप्नाकडे विद्यार्थ्यांची पाठ?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 04:08 AM2020-12-17T04:08:10+5:302020-12-17T04:09:01+5:30
वैद्यकीय प्रवेशासाठी अटीतटीची स्पर्धा काहीशी कमी होताना दिसते आहे. डॉक्टरकी नको असल्याचे कारण फक्त आर्थिकच नव्हे, तर भावनिक व सुरक्षिततेचेही आहे.
- डॉ. अमोल अन्नदाते, आरोग्य व सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक
यावर्षी वैद्यकीय प्रवेशामध्ये विस्मयजनक कल दिसून आला. दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी अटीतटीची स्पर्धा काहीशी कमी होताना दिसते आहे. नीटमध्ये १४७ गुण हा पात्रतेचा निकष असताना १६७ गुण असलेल्या विद्यार्थ्याला डोनेशनशिवाय सहज खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळतो आहे. गेल्या कित्येक वर्षांत असे पहिल्यांदाच घडते आहे. खाजगी व अभिमत महाविद्यालयाची २० ते २५ लाख प्रती वर्ष इतकी आकाशाला भिडलेली फी, मुलांना कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि आर्थिक मंदी ही वरवरून दिसणारी तात्कालिक कारणे वाटत असली तरी ‘वैद्यकीय क्षेत्राच्या मार्गाला जायला नकोच’ हा समाजात रुजत चाललेल्या विद्यार्थी-पालकांच्या विचारसरणीची ही नांदी आहे. तात्कालिक कारणांपलीकडे या विचारामागे एक अस्वस्थता आहे, जिचा मागोवा घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी आता दुसऱ्या क्षेत्राकडे वळत आहेत एवढा साधा हा बदल नसून देशात आधीच असलेल्या लोकसंख्येच्या मानाने डॉक्टरांची कमी संख्या आणि त्यातच ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या तीव्र तुटवड्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक झोक तपासावा लागेल.
गेली कित्येक दशके आपल्या एका तरी पाल्याने डॉक्टर व्हावे हे स्वप्न उरी बाळगणारे पालक प्रत्येक घरात होते. हे स्वप्न पाहताना मात्र त्याने समाजासाठी आपले आयुष्य वाहून घ्यावे हा हेतू मनात बाळगून हे स्वप्न पाहणारे पालक अत्यल्प असतील, हे वास्तव आहे.
मान मरातब, चांगली आर्थिक मिळकत आणि एका स्थिर करिअरचा पर्याय देत बुद्धिमत्तेलाही चांगला वाव देणारे क्षेत्र म्हणून पालक व विद्यार्थी वैद्यकीय करिअरकडे बघत असतात. अर्थात जागतिकीकरणाच्या रेट्यात एका पिढीच्या आकांक्षांचे संक्रमण होत असताना डॉक्टरांची जुन्या पिढीची तुलना ही आता स्वप्न पाहणाऱ्या पालकांशी व विद्यार्थ्यांशी व त्यांच्या वैद्यकीय प्रवेशाच्या हेतूशी होऊ शकत नाही.
९५ टक्के स्वार्थ व व्यवसायाच्या निमित्ताने सहज होणाऱ्या ५ टक्के परमार्थाच्या अपेक्षा ठेवत वैद्यकीय प्रवेश घेताना स्वतः पाल्यासाठीचा हा नियम मात्र समाज वैद्यकीय व्यवसायाकडे बघताना लावण्यास तयार नाही. डॉक्टरकडे रुग्ण म्हणून जाताना नेमकी याच्या विपरीत अपेक्षा असते. या वैचारिक द्वंद्वामुळे वैद्यकीय क्षेत्राला व्यवसाय म्हणून मान्यता देण्यास समाज, तसेच शासनही तयार नाही. हा व्यवसाय थेट जगण्या-मरण्याशी निगडित असल्याने या व्यवसायात नफ्याला मर्यादा असली पाहिजे, हेही मान्य. समाज व वैद्यकीय व्यवसायाची फक्त भावनिक नव्हे, तर व्यावसायिक गरजेत मोठी दरी निर्माण झाल्यामुळे आज हे क्षेत्र आधीसारखे अर्थ, धर्म, मोक्षासाठी राजमार्ग वाटेनासे झाले.
डॉक्टरकी नको असल्याचे कारण फक्त आर्थिकच नव्हे, तर भावनिक व सुरक्षिततेचेही आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे व आजवर एकाही प्रकरणात गुन्हेगारांना ठोस शिक्षा झालेली नाही. याविरोधात कायदेही तेवढे सशक्त नाहीत. म्हणून भारत हा जगातील सर्वाधिक डॉक्टरांवर हल्ले करणारा देश आहे. एकीकडे समाजमान्यता मिळत नसताना या बुद्धिजीवी वर्गाला राजमान्यताही मिळताना दिसत नाही.
‘याचसाठी का हा अट्टहास’ असे आज बारावीच्या हुशार विद्यार्थ्याला व त्यांच्या पालकांना वाटल्याने काही प्रमाणात बुद्धिवंतांचा वैद्यकीय क्षेत्राकडे ओघ आटणे स्वाभाविक आहे.
वैद्यकीय व्यवसायाचे आर्थिक गणित हे दिवसेंदिवस जटिल होत चालले आहे. त्यापेक्षा व्यवस्थापनाची डिग्री किंवा इतर व्यवसाय निवडून कमी वयात चांगले आयुष्य जगता येऊ शकते, हे आज डॉक्टरांच्या चाळिशीत आलेल्या पिढीला दिसते आहे. त्यातच वैद्यकीय शिक्षणाचा पदव्युत्तर शिक्षणासह एकूण कालावधी एक तप उलटले तरी संपत नाही. म्हणूनच वैद्यकीय व्यवसायात असलेले ९० टक्के डॉक्टर हे आपल्या पाल्यांना वैद्यकीय शिक्षणात प्रवेशासाठी इच्छुक नाहीत.
हजारामागे एका डॉक्टरची आपल्या देशाला गरज असताना हे प्रमाण ५० टक्के म्हणजे २००० मागे १ एवढे कमी आहे. ग्रामीण भागात तर ही तूट खूप गंभीर आहे. महामारीच्या तोंडावर वैद्यकीय प्रवेशाकडे बुद्धिवंतांचा ओघ आटणे ही धोक्याची घंटा आहे. या पहिल्या घंटानादातच समाजमन व शासनाने आत्मचिंतन करावे.
amolaannadate@gmail.com