विद्यार्थ्यांनो, आत्महत्येवर करूया मात!
By admin | Published: June 23, 2017 12:06 AM2017-06-23T00:06:16+5:302017-06-23T00:06:16+5:30
गेली काही वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळवंडली! श्रमांनी मोती पिकविणारा आयुष्य संपवतो, तेही आत्महत्येने आणि विद्येच्या गंगेत स्नान करणाऱ्यांनीही चंग बांधला
रामदास वाघ, (साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ)
गेली काही वर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी काळवंडली! श्रमांनी मोती पिकविणारा आयुष्य संपवतो, तेही आत्महत्येने आणि विद्येच्या गंगेत स्नान करणाऱ्यांनीही चंग बांधला आयुष्य संपवण्याचा, तोही आत्महत्येनेच? यांना यांच्या देही विराजमान झालेल्या आत्म्याची अशाप्रकारे ‘हत्या’ करण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांच्या आत्म्यावर कोणाचाच हक्क नाही का? आग लागलेल्या घरात होरपळून निघणाऱ्या जिवांचा प्रवास आपण समजू शकतो. भूकंपात भूमातेच्या उदरात प्राण गमावलेल्यांचे दु:ख आपण पचवू शकतो. एखादा वीज कोसळून दुरावतो, तर एखादा चक्रीवादळाचा बळी ठरतो. काही महापुराने प्राण गमावतात, तर काही त्सुनामी लाटांचे बळी ठरतात. काही भुकेने व्याकूळ होतात, तर काही मानवरूपी नरराक्षसांच्या पाशवी कृत्यांचे बळी ठरतात. ही सारी संकटे जीवघेणी असतात; पण आत्महत्या करणे कोणते संकट आहे? ‘जीवदेणी’ संकटे असू शकतात का? माणसामध्ये निसर्गातल्या जीवघेण्या संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य आणि बुद्धिचातुर्य असताना तो ‘जीवदेणी’च्या चक्रव्यूहात अडकतोच कसा?
मुळात जीवन हीच एक तहहयात स्वरूपाची परीक्षा असते. त्या परीक्षेचे पेपर पावलोपावली द्यावेच लागतात. कधी सुलभता वाट्याला येते तर कधी क्लिष्टता. परंतु त्यातून मार्ग काढीत यशोशिखर गाठण्याची मजा काही औरच असते. खरे तर अपयशाला भिण्याचे काही कारणच नाही. आयुष्यात अपयश नसते, तर यशाची किंमत तरी कशी कळणार? अपयशाने खचून न जाता अपयशाची कारणे शोधून नव्या जोमाने पुन्हा तयारी करण्यासाठी सज्ज व्हायचे असते. परंतु गेल्या काही वर्षात दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयश आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर काहींनी पेपर अवघड गेल्याची धास्ती बाळगत निकालाआधीच आत्महत्या केल्या. मात्र जेव्हा निकाल हाती आला तेव्हा निकालाआधीच आत्महत्या केलेली मुले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचे स्पष्ट झाले. जीवनयात्रा संपवण्याइतपत टोकाचा निर्णय विद्यार्थी का घेतात, हाच तर खऱ्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनला आहे. खरे तर कोणत्याही पालकाने आपल्या पाल्यांवर आपल्या अपेक्षांचे ओझे न लादता त्यांची कुवत, आवाका आणि रुची हेरून त्या दिशेने त्यांना वाटचाल करू देणेच हिताचे ठरू शकेल.
Suicide? What a suicide? It is a curse, not a boon but life is a gift given by God and parents, shape it beautifully as their . आप, तेज वायू, पृथ्वी आणि आकाश ह्या पंचमहाभूतांच्या साम्राज्यात जन्मलेल्या जीवाचे संगोपन करताना आईवडील नावाच्या तीर्थक्षेत्राची होणारी परवड विचारात घेतली, तर प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचेसुद्धा डोके चक्रावून जाते. आपल्या लेकरांच्या जीवनात अमृताचा वर्षाव करताना किती संघर्ष करतात ते ! अरे, तुमचे मन दुखवू नये म्हणून ते तुम्हाला काही बोलतसुद्धा नाहीत. तुम्ही काही बरेवाईट करू नये म्हणून ते घरात डोंबाऱ्याचा खेळ खेळतात. आई रागावली, तर वडील पाठराखण करतात आणि वडील रागावले, तर आई ढाल बनून पुढे सरसावते. साऱ्या आयुष्याचा श्रावण तुमच्या जीवनात ओतून तुमचे जीवन प्रेमधारांनी चिंब भिजवून टाकतात ते अन् तरीही तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटते? त्यांना सोडवते तरी कसे तुम्हाला? एवढा लाखमोलाचा जीव घडवणाऱ्यांच्या भाळी एवढे क्षुद्र दु:ख येऊच कसे शकते, तेच कळत नाही.
तुम्ही तरुण आहात, उगवते आहात, तेजस्वी आहात. उद्याचा उज्ज्वल महाराष्ट्र आहात. उद्याचा शक्तिशाली बलवान भारत आहात. तरीही तुमच्या मनात स्वत:ला संपवण्याचा हीन विचार कसा येऊ शकतो. का? काय संकट कोसळले होते तुमच्यावर? आभाळ कोसळले होते, का धरती दुभंगली होती? संकटाला तरुण घाबरतो का? संकटांपासून दूर जाण्यासाठी हा जन्म लाभला का? ‘ऊठ गड्या, तोड बेड्या, घाव आता घाली’ अशा निर्धाराने पुढे सरसावणाऱ्या मर्द मावळ्यांचे वंशज आपण ! लाथ मारू तेथून पाणी काढू ही आपली जीवनधारा, ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ ही दत्ताजी शिंद्यांची संघर्ष वाणी विसरलात काय? मरायचे, तर इतिहास घडवण्यासाठी, श्वास कोंडण्यासाठी नव्हे.
‘मानवतेच्या शत्रूसंगे
युद्ध आमचे सुरू,
जिंकू किंवा मरू’
- अशा ध्येयाने वेड्या झालेल्या शिवबाच्या महाराष्ट्रात जन्मणारा मावळा काय पालापाचोळा वाटला तुम्हाला? वाटेल तेव्हा चुरगळून टाकायला? अरे, हा मावळा स्वत:ला संपवण्यासाठी जन्माला येत नसतो. तो वाटेत आडव्या येणाऱ्या शाहिस्तेखान, अफझलखान यांची वाट लावतो. अरे मर्द मावळ्या, तुझ्यात अवतरू दे कृष्ण, दुष्ट कंसाची नि:पात करण्यासाठी. तुझ्यात अवतरू दे राम, दुष्ट रावणाचा नि:पात करण्यासाठी. तू स्वत:ला दुर्बल का समजतोस? अरे, तू तेजाचा गोळा आहेस. तू स्फूल्लिंग आहेस. तू काय करू शकत नाहीस? तू विद्यार्थी असो का शेतकरी, तू जग बदलू शकतोस ! तू सूर्यचंद्रतारकांना फिके पाडू शकतोस. पण तू भांबावला आहेस. मृगजळामागे धावणाऱ्या हरिणीप्रमाणे तू हताश झाला आहेस. ‘मी काहीच करू शकत नाही’ या न्यूनगंडाने तू ग्रासला गेला आहेस. हेच तुझ्या जीवनाचे सर्वात मोठे दु:ख आहे. तू विसरलास तुझ्या अस्तित्वाला. तू विसरलास तुझ्यातील दिव्य शक्तीला. आत्मभान हरवू नकोस. झोपेने पेंगळू नकोस. जागा हो. पेटव मशाल. आठव सुरेश भट...
‘उष:काल होता होता काळरात्र झाली
अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...’
तुझ्या मशालीने तुला अंधार घालवायचा आहे. अंधार घालवण्याऐवजी तूच अंधारपथाचा पांथस्थ होण्याचे वेडेपण का स्वीकारतोस? मशाल पेटवण्याऐवजी स्वत:ला का पेटवतोस? तुला क्षितिजाच्या सीमा तोडून दिक्कालच्या पलीकडे जावयाचे आहे. तूच आहेस ना सूर्यबिंबाला कवेत घेणारा. तूच आहेच ना कल्पना चावलाचा दुर्दम्य आशावाद ! तूच आहेस ना अभिनव बिंद्राचं सुवर्णस्वप्न. ‘माझ्या छातीवर पहिली गोळी’ हा शिरीषचा स्वर तुझा नाही का? भारतमातेच्या मुक्तीसाठी हसत हसत गळफासात मान घालणारा भगतसिंग तुझा आदर्श नाही का? तू तळपता सूर्य आहेस. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी ‘ने मजसि ने परत मातृभूमीला सागरा, प्राण तळमळला’, असे म्हणणाऱ्या क्रांतिपर्वाची वाट तू कशी विसरलास? तेजाचा एवढा मोठा महासागर तुझ्या पाठीमागे असताना, तू अंधारकोठडीचा धनी होतोच कसा? अरे, तू देशाचा विश्वास आहेस, दुर्बलांचा श्वास आहेस, गरिबांचा घास आहेस. उद्याच्या उजळणाऱ्या स्वप्नांची परिपूर्ती आहेस. थांबू नकोस. चालत राहा. उद्याचा सूर्य तुझी वाट पाहात आहे. त्याच्या उजेडात न्हाऊन निघण्यासाठी. चल, आपण आपल्या आईला सांगू या...
‘कशास आई भिजविसी डोळे,
उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा
असे उष:काल !’