स्टंट: प्रवेश दुसरा
By admin | Published: March 8, 2016 09:01 PM2016-03-08T21:01:43+5:302016-03-08T21:01:43+5:30
सामान्यत: कोणीही जेव्हां मोठ्या लढाईच्या तयारीने मैदानात उतरतो, तेव्हां एक मोहीम फत्ते झाल्यानंतरच दुसऱ्या मोहिमेस हात घालत असतो. भूमाता ब्रिगेडचा हिशेब मात्र काही वेगळाच असावा.
सामान्यत: कोणीही जेव्हां मोठ्या लढाईच्या तयारीने मैदानात उतरतो, तेव्हां एक मोहीम फत्ते झाल्यानंतरच दुसऱ्या मोहिमेस हात घालत असतो. भूमाता ब्रिगेडचा हिशेब मात्र काही वेगळाच असावा. गेल्या प्रजासत्ताकिदिनी तिने शनिशिंगणापूर येथील महिलाना मज्जाव करणाऱ्या चौथऱ्यावर चढाई करण्याचे जाहीर केले होते. तथापि तेथील परंपराभक्त लोकानी (यात महिलाही आल्या) या चढाईस विरोध दर्शविला आणि पोलिसाना सतर्क केले. त्याना जेव्हां संघर्षाचा वास आला तेव्हां त्यांनी भूमाता कार्यकर्त्यांना त्यांच्या इप्सित स्थळी जाण्यास मज्जाव केला. अंती त्यांनी तो प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या विवेकाच्या आधीन करुन स्वत:स मोकळे करुन घेतले. म्हणजे शनिशिंगणापूरची मोहीम फत्तेविना तशीच राहून गेली व प्रवेश पहिला संपला. दुसऱ्या प्रवेशाचे ऐलान झाले. नाशिकनजीकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करायचा व त्यासाठी मुहूर्त महाशिवरात्रीचा. पण येथेही शनिशिंगणापूरचीच पुनरावृत्ती झाली. भूमाता कार्यकर्त्यांना नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरच पोलिसांनी अडविले. त्याचा म्हणे त्यांना मोठा धक्का बसला. पण तसे काहीही झाले नव्हते. आपल्याला पोलीस अडवतील याची त्यांना पूर्ण कल्पना आणि अपेक्षाही होती व त्यामुळेच त्यांनी इलेक्ट््रॉनिक माध्यमाना थेट त्र्यंबकेश्वरी न जाण्याचा मित्रत्वाचा सल्ला दिला होता. अर्थात या कार्यकर्त्यांना भले त्र्यंबक गाठता आले नसले तरी त्यांच्या आंदोलनाची वार्ता तिथे पोहोचली होती आणि योगायोगाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तिथे शिवदर्शनासाठी दाखल झाले होते. त्यांनी माध्यमांशी बोलताना शिवमंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ इच्छिणाऱ्या आणि त्यांची वाट अडविणाऱ्या अशा दोन्ही भगिनींविषयी आदरभाव व्यक्त केला व चर्चा आणि समन्वयातून मार्ग काढण्याचा आशावादही व्यक्त केला. पण अधिक मौजेची बाब म्हणजे राज्यघटनेच्या चौकटीत राहून या पेचप्रसंगातून मार्ग काढावा लागेल असे सांगतानाच देवस्थानच्या काही रुढी आणि परंपरा आहेत व त्यासंबंधीही चर्चा करावी लागेल आणि गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा लागेल असेही सांगितले. म्हणजे नेमके काय, हे त्यांचे त्यांनाच ठावे!