पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा!

By Shrimant Mane | Updated: March 8, 2025 07:50 IST2025-03-08T07:47:50+5:302025-03-08T07:50:54+5:30

‘हरगिला’ या आसाममध्ये सापडणाऱ्या दुर्मीळ करकोच्याने डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांना मानाचे स्थान मिळवून दिले. आजच्या महिला दिनानिमित्त विशेष ओळख!

success story of dr purnima devi barman the only indian featured in time women of the year | पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा!

पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा!

श्रीमंत माने,  संपादक, लोकमत, नागपूर

गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतील भरजरी शालूच्या पदरावर नाचणाऱ्या मोराचा डाैल, सुलोचना चव्हाण यांचा ठसकेबाज आवाज आणि  जयश्री गडकर यांचा अभिनय हा मराठी माणसांनी हृदयाच्या कुपीत जपलेला ठेवा. तिकडे दूर आसाममध्ये असाच एक पक्षी नव्याने पदरावर अवतरला.  तो देखणा नाही. मोराचा डाैल तर अजिबात नाही. प्रेमाचे प्रतीक सारस पक्ष्यासारखा दिसत असूनही तो कशाचेच प्रतीक नाही. बगळ्यासारखा ध्यानस्थ असतो. पाचेक फूट उंची व फैलावल्यानंतर आठ फुटांपेक्षा लांब पंख, लांबलचक चोच, गळ्याखाली तसाच लांब खाद्यान्नाचा बटवा असा त्याचा आकार. गिधाडांसारखा बेढब. काम मात्र गिधाडांपेक्षा मोठे. 

गिधाडे मेलेली जनावरे फस्त करतात, हा त्यांच्याही पुढे ! कचऱ्याच्या ढिगांवरच राहतो. मृत जनावरांच्या पोटातील घाण,  कचऱ्यातील मांसाचे अवशेष खाऊन भूक भागवतो. स्वच्छतादूत आहे. माणसांचा मित्र आहे. ब्रिटिशांनी त्याचे महत्त्व ओळखले होते. ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांच्या गणवेशावर तो शोभून दिसत होता. कलकत्ता महापालिकेच्या बोधचिन्हावरही तो होता. पण, माणसांनी स्वच्छतेचा आग्रह धरल्यावर परिसर चकाचक होऊ लागला आणि या पक्ष्याची उपासमार सुरू झाली. या दुर्मीळ पक्ष्याचे नाव ग्रेटर ॲडज्युटंट नावाचा स्टाॅर्क म्हणजे करकोचा. काळा किंवा पांढरा करकोचा, चित्रबलाक, मुग्धबलाक किंवा उघड्या चोचीचा करकोचा यांसारखी सिकोनियाडाय फॅमिलीतील पक्ष्यांची ही १५ वर्षांपूर्वी नामशेष होऊ पाहणारी प्रजाती. तो आसाममध्ये प्रामुख्याने आढळतो. स्थानिक भाषेत त्याला हरगिला म्हणतात. आसामी भाषेत हर म्हणजे हाड आणि गिला म्हणजे गिळणारा. नावातच पक्ष्याचे पूर्ण वर्णन. 

हरगिला आत्ता आठवण्याचे कारण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आसामच्या डाॅ. पूर्णिमादेवी बर्मन यांचा टाइम मासिकाने यंदा ‘वुमन ऑफ द इअर’ म्हणून केलेला गाैरव. यंदा ‘टाइम’ने निवडलेल्या कर्तबगार महिलांच्या कथा स्तिमित करणाऱ्या आहेत. फ्रान्सच्या आग्नेय सीमेवरील प्रोव्हान्स प्रांतातील झीजेल पेहलिकोह या ७२ वर्षांच्या आजींनी त्यांच्या पतीनेच घडवून आणलेल्या सामूहिक अत्याचाराचा सामना केला. 

पीडिता असूनही ओळख जाहीर करीत त्या आता समाज बदलविण्यासाठी सरसावल्या आहेत. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात गर्भपाताला बंदी आहे. त्यामुळे अमेंडा झुरावस्की ही गर्भवती मातृत्वाला पोरकी झाली. ती आता गर्भपातबंदीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढत आहे. अभिनेत्री ऑलिव्ही मन स्तनाच्या कर्करोगाची जागृती करीत आहे, तर आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन लेखिका व संपादक रिकेल विलिस तृतीयपंथी महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. या यादीतील डाॅ. पूर्णिमादेवी बर्मन यांची कर्तबगारी अचंबित करणारी आहे. 

पूर्णिमादेवी मूळच्या प्राणिशास्त्राच्या अभ्यासक. पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांनी ‘आरण्यक’ या स्वयंसेवी संस्थेत काम केले. कामरूप जिल्ह्यात हरगिलाचा अभ्यास करून पीएच.डी मिळविली. 

२००७ मध्ये एक दिवस हरगिलाची अनेक घरटी व त्यांत चोची उघडून आईची वाट पाहणाऱ्या पिल्लांचा आश्रयस्थान असलेले एक मोठे झाड तोडले गेले. पूर्णिमादेवी धावत गेल्या. झाडतोड्यावर चिडल्या. हरगिला पक्षी अपशकुनी आहे. तो रोग पसरवतो. मेला ते चांगलेच झाले, असा त्याचा बचाव होता. पूर्णिमादेवींना वाटले, आपल्याही चिल्ल्यापिल्ल्यांवर अशी वेळ आली तर? हरगिला वाचविण्यासाठी ‘हरगिला आर्मी’ ही महिलांची फाैज त्यांनी उभी केली. या आर्मीतील महिलांची संख्या वीस हजारांच्या घरात आहे. आर्मीचे काम सुरू झाले तेव्हा आसाममध्ये ग्रेटर ॲडज्युटंटची  संख्या अवघी ४५० होती. इंटरनॅशल युनियन फाॅर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या लुप्तप्राय पक्ष्यांच्या यादीत तो होता. हरगिला आर्मीच्या प्रयत्नांमुळे पंधरा वर्षांत ही संख्या आता १८००च्या पुढे गेली आहे. 

या आर्मीच्या पक्षीरागिणी हरगिलाची घरटी शोधतात, सुगरणीने खोपा सांभाळावा तशी जपतात. पिल्लांची काळजी घेतात. ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील गुवाहाटी, मोरिगाव, नगाव जिल्ह्यांमधील यशानंतर आर्मीने बिहारमधील भागलपूर जिल्ह्याकडे लक्ष वळविले. भारतात या दोनच टापूंत हरगिलांचे प्रजनन होते. कंबोडिया हा जगात केवळ तिसरा टापू आहे. तिथे आर्मी पोहोचली. ग्रीन ऑस्कर म्हणविला जाणारा प्रसिद्ध व्हिटले पुरस्कार ब्रिटनची राजकुमार ॲन हिच्या हस्ते पूर्णिमादेवींना मिळाला. 

भारतात राष्ट्रपतींकडून नारीशक्ती पुरस्कार मिळाला. पुढे हे संवर्धन लोकसंस्कृतीत पाझरले. पॅशनला फॅशनची जोड मिळाली. आसामी महिलांचे पारंपरिक विणकाम काैशल्य मदतीला आले. कुरूप व बेढब हरगिलाही देखणा झाला. टी शर्ट, साड्या, शाली, दुपट्टे व बेडशिटरवर विणला गेला. आता हरगिला ब्रँडचे स्टाॅर्क टी शर्ट, स्टाॅर्क स्टोल, साड्या तसेच ऱ्हिनो स्टोलही ऑनलाइन मिळतात. लोकगीतांमध्ये मोरासारखाच हरगिला उमटला. पिल्लांच्या बारशाचे सोहळे साजरे होऊ लागले. घरट्यांवर आनंदाची तोरणे सजली.  
shrimant.mane@lokmat.com


 

Web Title: success story of dr purnima devi barman the only indian featured in time women of the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Assamआसाम