यश सर्वव्यापी होवो...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 05:20 AM2019-10-15T05:20:07+5:302019-10-15T05:20:42+5:30

देशाच्या विविध भागांतून गुणवान खेळाडू पुढे येत असल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा निकोप झाल्यास, तसेच निर्णयांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय क्रिकेट संघ साता समुद्रापारदेखील सातत्यपूर्ण यशाची चव चाखू शकेल.

Success is universal ... | यश सर्वव्यापी होवो...

यश सर्वव्यापी होवो...

Next

पुणे हे अनेक ऐतिहासिक घटनांना साक्षीदार असलेले शहर आहे. रविवारी क्रीडा क्षेत्रातील एक ऐतिहासिक घटना येथे घडली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेट सामना जिंकून मायदेशात सलग ११ मालिका विजय मिळविण्याचा दुर्लभ विश्वविक्रम भारतीय संघाने पुण्यात केला. जिथे एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, तिथे सलग ११ मालिका जिंकणे खचितच अभिमानास्पद आहे. फिरकीच्या जोरावर घरच्या मैदानावर सामने जिंकणारा संघ, अशी आपली ओळख होती. ती आता मागे पडली आहे.

पुण्यात वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांचे घेतलेले प्रत्येकी १० बळी, हा त्याचा पुरावा ठरावा. खेळाडूंनी सांघिक भावनेने केलेल्या खेळाला या यशाचे श्रेय द्यायला हवे. ‘प्रत्येक खेळाडू हा वैयक्तिक स्वार्थ न बाळगता संघाला विजयी करण्याच्या भावनेने खेळतो,’ या कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्यात तथ्य जाणवते. २०१३ ते २०१९ या काळातील हे यश मिळवून देण्यासाठी योगदान असलेल्या सर्वांचे यानिमित्ताने अभिनंदन करायला हवे. मानवी स्वभाव हे न सुटलेले कोडे आहे. एखादी गोष्ट साध्य झाली, की आपले मन त्यापुढील अपेक्षा बाळगायला सुरुवात करते. या वृत्तीचा भारतीय क्रिकेटमधील आताच्या यशासोबत संदर्भ जोडायचा म्हटल्यास, अशी अपेक्षा यथोचित ठरते. मायदेशात आपण मालिका विजयांचा विश्वविक्रम केलाय. यशाची हीच पताका आता साता समुद्रापार, सर्व खंडांत फडकायला हवी. ते साध्य करण्याची धमक टीम इंडियात नक्कीच आहे. सव्वाशे-एकशेतीस कोटींच्या आपल्या देशात सर्वच जण क्रिकेटतज्ज्ञ आहेत, असे गमतीने म्हटले जाते. १९८३ च्या विश्वविजेतेपदानंतर रेडिओ, टीव्ही तसेच आक्रमक जाहिरात पद्धतीमुळे सर्वसामान्य माणसाला हा खेळ कळायला लागला... आणि नंतर आपलासाही वाटला. यामुळे विदेशात सातत्याने यश मिळविण्यासाठी काय करावे लागेल, हे सामान्य माणूसही सांगेल. ते गुपित नक्कीच नाही. विदेशांतील वातावरणाशी जुळवून घेताना थोडेफार कमी-जास्त होणारच. शेवटी कितीही प्रयत्न करतो म्हटले, तरी निसर्गासमोर मानवी क्षमतांना मर्यादा ही येतेच; पण चेंडू उसळी घेणाऱ्या वेगवान खेळपट्ट्यांवर टिकाव धरण्याची तसेच याच खेळपट्ट्यांचा लाभ उचलून प्रतिस्पर्ध्यांचे २० बळी घेण्याची क्षमता, यात आपल्या फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये पाहिजे तसे सातत्य नाही. आपले मुख्य अस्त्र असलेली फिरकी गोलंदाजीही विदेशांत म्हणावी तशी घातक ठरत नाही. खरी मेख आहे ती इथे. अर्थात, भविष्यात हे चित्र बदलण्याची चिन्हे नक्कीच दिसत आहेत.

१० महिन्यांनंतर कसोटी संघात परतल्यावर आफ्रिकेविरुद्ध ६ बळी घेणारा वेगवान गोलंदाज उमेश यादव सामन्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट बोलून गेला. ‘संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. संधी मिळाली की चमकदार कामगिरी करून, आपले संघातील स्थान टिकविण्याची क्षमता अनेक गोलंदाजांमध्ये आहे. मिळालेली संधी साधली नाही तर आपली जागा घेण्यास इतर खेळाडू सज्ज आहेत, हे मला माहीत होते. त्यामुळे मी जीव ओतून गोलंदाजी केली. शिवाय, फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचा फायदा झाला,’ असा त्याच्या बोलण्याचा मथितार्थ होता. देशाच्या विविध भागांतून गुणवान खेळाडू पुढे येत असल्याने संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली आहे. ही स्पर्धा अधिक निकोप झाल्यास तसेच निर्णयांची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय क्रिकेट संघ साता समुद्रापारदेखील सातत्यपूर्ण यशाची चव चाखू शकेल. यासाठी क्रिकेटचे प्रशासन सांभाळणाºया संघटनेने नुसता पैसा कमावणे, हेच एकमेव ध्येय असल्याचा समज सोडून जबाबदारी स्वीकारायला हवी.

भारतीय संस्कृतीत प्रकाशाचा उत्सव अर्थात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. या सणाच्या काळात संघटनेत मोठे बदल होत आहेत. देशाची एकहाती सत्ता सांभाळणाºया घटकाकडे सूत्रे जाणार असल्याने या संघटनेच्या संचलनात शिस्त तसेच सुसूत्रता येईल आणि त्याचा फायदा होऊन टीम इंडियाच्या यशाचा सूर्य सर्वव्यापी होईल, अशी अपेक्षा मंगलमय सणाच्या पार्श्वभूमीवर बाळगायला हरकत नाही.

Web Title: Success is universal ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.