तत्त्वासाठी मैदानात उतरणारा रसिला विधिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:33 AM2021-05-03T02:33:41+5:302021-05-03T02:34:19+5:30
सोली सोराबजी यांना सत्तेची दहशत कधीही वाटली नाही. सहज पाडाव करता येईल, असा हा माणूसच नव्हता!
रायन करंजावाला
मी त्यांना पहिल्यांदा १९७६ साली पाहिले. मुकुल (रोहतगी), टोनी (सचथेय) आणि मी त्यांचे भाषण ऐकायला सेंट झेविअर कॉलेजमध्ये गेलो होतो. आणीबाणीचे दिवस होते. देश एका वेगळ्या प्रकारच्या लॉकडॉऊनमध्ये होता. झेवियरच्या हिरवळीवर सोली आणीबाणीविरुद्ध बोलायला आले होते. ‘रेल्वे गाड्या वेळेवर चालणे म्हणजे शिस्त नव्हे (त्या काळी असे वारंवार म्हटले जायचे.) तर लोकशाही मूल्यांचे योग्य ते पालन म्हणजे शिस्त होय’- असे त्यांनी ठासून सांगितले- मला आजही आठवते ती त्यांच्या विचारातील स्पष्टता आणि धैर्य! धनाढ्य कुटुंबात जन्मूनही सोली यांना सुखवस्तू श्रीमंतीचे आयुष्य नको होते, त्यांना त्यापलीकडे कसली तरी आस होती! कायद्याची पदवी घेतल्यावर जमशेदजी कांगा यांच्या चेंबरमध्ये ते दाखल झाले आणि इतरांशी कडवी स्पर्धा करत झपाट्याने शीर्षस्थानी पोहोचले. कायद्याच्या जोडीला सामाजिक भान असल्याने अन्यायाविरुद्ध बोलायला ते कायम उभे ठाकत. झेवियरमध्ये त्यादिवशी ते तसेच आले होते.
सोली यांना मी दुसऱ्यांदा पाहिले ते ऑगस्ट १९७९ मध्ये सर्वोच्च न्यायालयात! १९७७ साली कॉँग्रेसची सत्ता गेल्यावर मोरारजी देसाईंच्या सरकारचे अतिरिक्त सॉलीसिटर जनरल म्हणून सोली दिल्लीत आले. मी तोवर मुंबईत कायद्याची पदवी घेऊन दिल्लीत पी. एच. पारेख अँड कंपनीत काम करू लागलो होतो. या कंपनीचे बहुतेक खटले सर्वोच्च न्यायालयात चालत, त्यामुळे सोली यांचे दर्शन व्हायचे.
एकदा सरन्यायाधीशांच्या समोर संजय गांधी यांचा जामीन अर्ज रद्द करण्यासंबंधीचे प्रकरण आले. भोजनानंतर २ वाजता हे प्रकरण सुनावणीला येणार होते. संजय गांधी स्वतः आपली बाजू मांडायला आले होते. मी न्यायदान कक्षात गेलो तेव्हा २० मिनिटे आधीच संजय तेथे बसले होते. योगायोगाने पालखीवाला त्यांचीही केस त्याच न्यायालयात असल्याने तेथे आले. त्यांनी संजयना विचारले. ‘आपण येथे का आला आहात?’ संजय यांनी कारण सांगितले आणि उलट पृच्छा केली. ‘माझ्या विरुद्ध आपण युक्तिवाद करणार का? ’ पालखीवाला यांनी तात्काल नाही म्हटले. तेवढ्यात सोली आत आले, पुढच्याच खुर्चीवर बसले. थोड्याच वेळात सुनावणी सुरू झाली. सोली यांनी प्रभावीपणे मुद्दे मांडले. तो दिवस त्यांचाच होता. त्यांना कडवा प्रतिवाद केला गेला. शेवटी संजय यांचा जामीन रद्द झाला.
१९८० साली कॉँग्रेस पुनः सत्तेत आल्यावर सोली यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली चालू ठेवली. या काळात आमच्यातला खरा संवाद सुरू झाला. मी काम करत असलेल्या फर्मच्या अनेक केसेस रोजच्या रोज असत. त्या काळातील फलि नरीमन, सोली सोराबजी, वि. म. तारकुंडे, अनिल दिवाण, पी. आर. मृदुल, वाय. एस. चितळे यांच्यासारख्यांशी रोज सकाळी ८.३० वाजता माझी बातचीत व्हायची. त्यावेळी तरुण असलेले कपिल सिबल देखील आसपास असत. सोलींच्या ऑफिसमध्ये दिवसाआड जाणे व्हायचे. बोलणे शीघ्र ,नेमके आणि मुद्द्याचे असायचे. समोरचा काय म्हणतोय हे त्यांना झटक्यात कळत असे आणि पुढच्या सेकंदाला त्यांनी त्या विषयाची नस पकडलेली असायची. खटल्याची कागदपत्रे ठेवलेल्या नस्तीच्या मागील आवरण पृष्ठावर आतल्या बाजूने टिपण काढायची त्यांची खास शैली होती. लंब्याचवड्या युक्तिवादाला ती तेवढी टिपणे पुरेशी असत. त्यांची वकिलीची शैली घणाघाती असण्यापेक्षा मन वळवणारी अधिक होती. त्यांचे मोठे प्रतिस्पर्धी फलि नरीमन यांच्या अगदी उलट. जस्टीस भगवती एकदा मला म्हणाले, ‘न्यायालयात सोली यांच्या इतका कुशाग्र बुद्धीचा माणूस मी पाहिला नाही!’
१९८० च्या प्रारंभापासून १९८९ मध्ये सोली महाभिवक्ता होईपर्यंत त्यांच्याशी सतत संपर्क होता. जे ठक्कर आणि जे नटराजन यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने १९८७ साली फेअर ॲक्स कमिशन नेमले. कामकाज चालू झाल्यावर माजी अर्थ आणि संरक्षणमंत्री व्ही. पी. सिंग यांना आयोगाने ८ ब खाली सुनावणीची नोटीस काढली. इंडियन एक्स्प्रेस बरोबर अरुण जेटली भुरेलाल यांना सल्ला देत होते. त्यांनी मला फोन करून सिंग यांच्यासाठी सोली वकीलपत्र घेतील काय, असे विचारण्याची गळ घातली. मी विचारले. सोली तयार झाले. व्हीपी सोलींचे पक्षकार झाले. आयोगाचे काम पूर्ण झाले. मात्र, निष्पन्न काहीच झाले नाही. सोली प्रथम महाभिवक्ता झाले, त्याला या प्रकरणाची पार्श्वभूमी होती. १९८९ साली व्हीपींचे सरकार आले तेव्हा कायदामंत्री दिनेश गोस्वामी महाभिवक्ता पदासाठी शांतीभूषण यांचे नाव सुचवणार होते. मात्र, शेवटी दान सोलींच्या पारड्यात पडले. महाभिवक्तापद स्वीकारावे यासाठी साऊथ ब्लॉकमधील कार्यालयातून व्हीपींनी ज्या संध्याकाळी सोलींना फोन केला तेव्हा मी एकटाच त्यांच्याबरोबर होतो. सोली यांनी त्यावेळी जे सहकारी निवडले ते कायद्याच्या क्षेत्रातील एकाहून एक सरस वकील होते. त्यातील अशोक देसाई सॉलीसिटर जनरल होते, नंतर महाभिवक्ता झाले. संतोष हेगडे पहिले अतिरिक्त सॉलीसिटर जनरल, नंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.
प्रशांत गोस्वामी अतिरिक्त सॉलीसिटर जनरल होते. कपिल सिबल यांनाही ती नेमणूक मिळाली. पुढे ते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री झाले. अरुण जेटली यांनाही अतिरिक्त सॉलीसिटर जनरलपदी नेमले गेले. वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्री झाले. नंतर मोदी यांच्या सरकारमध्ये त्यांनी अर्थ संरक्षण मंत्रिपद सांभाळले. सोली यांनी उत्तम सहकारी निवडले आणि ते त्यांच्याबरोबर ठाम राहिले. व्हीपी सिंग यांच्या काळात एका मंत्र्याने सिबल यांच्या नावाला हरकत घेतली तेव्हा सोली यांनी ‘असे असेल तर सगळेच पायउतार होतील’, असा निरोप पाठवला. पुढे काहीच झाले नाही हे वेगळे सांगायला नको. सोली पुन्हा एकवार देशाचे महाभिवक्ता झाले. दोन भिन्न सरकारात हे पद भूषवणारे ते एकमेव. यावेळी हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी या सहकाऱ्यांची त्यांनी निवड केली.
सोली यांच्या दुसऱ्या एका स्वभाव वैशिष्ट्याकडे लक्ष वेधले पाहिजे: चेंबरमधील ज्येष्ठ सहकारी आणि सर्वोत्तम शिक्षक. त्यांच्या चेंबरमधून नामवंत वकील तयार झाले. मुंबईत अर्षद हिदायतुल्ला आणि एस गणेश, दिल्लीत हरीश साळवे आणि गोपाळ सुब्रमणीयम. सोली यांचे शिकवणे असाधारण होते. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाला.
धनाढ्य घरात जन्मून त्यांनी कष्ट उपसण्याचे व्रत घेतलेल्या सोलींना असाधारण मन आणि बुद्धी, स्मरणशक्तीची देणगी लाभली होती. सहजगत्या ते एखाद्या निकालातील संबंधित परिच्छेद सांगत. प्रखर असे सामाजिक भान त्यांना होते. शिवाय तत्त्वासाठी मैदानात उतरण्याचे धैर्यही होते. सत्तेची भीती त्यांना कधीही वाटली नाही. सहज पाडाव करता येईल, असा हा माणूस नव्हता. वृद्ध आणि तरुण दोन्हींच्या संगतीत ते रमले. सोली अतिशय भावनाशील होते. थोडे काही घडले की त्यांच्या डोळ्यात पाणी येत असे. जाझ संगीतावर फार जीव. जाझ संगीतामुळेच हरीश आणि सोली यांचे प्रारंभीचे मैत्र जुळले. नव्वद वर्षांचे कृतार्थ आयुष्य ते जगले.
तुमचा प्रवास सुखकर होवो सोली...
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)