विचारी लोकांची मान लाजेने खाली जावी, असा प्रसंग!
By वसंत भोसले | Published: December 23, 2023 09:14 AM2023-12-23T09:14:53+5:302023-12-23T09:16:19+5:30
जागतिक कीर्तीच्या भारतीय महिला खेळाडूंना एक शत्रू असतो : पुरुषी अहंकार आणि वासना! साक्षी मलिकसारख्या खेळाडूचा बळी या अहंकारानेच घेतला आहे.
- वसंत भोसले, संपादक, लोकमत, कोल्हापूर
हरयाणासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या प्रदेशात जन्माला आलेल्या जागतिक दर्जाच्या महिला कुस्तीपटूला पुरुषी अहंकारापुढे बळी जावे लागले...तिचे नाव साक्षी मलिक ! कुस्तीपटू होण्याचे स्वप्न साक्षीने पाहिले, ते किमान ‘सन्मान’ मिळावा यासाठी! हरयाणात जन्मलेल्या मुलींसाठी एरवी ‘मान’ तसा दुरापास्तच! कुस्तीपटू होण्याचा निर्णय साक्षीने वयाच्या बाराव्या वर्षी घेतला, पण ते स्वप्न सत्यात आणणे सोपे नव्हते. मुलींनी कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यालाच विरोध होता; पण साक्षीने हार मानली नाही! गावातली एकही मुलगी कुस्ती खेळत नसल्याने सराव करायचीही संधी नाही, घरच्यांचा विरोध, समाजाचा अतितीव्र विरोध, मुलगी म्हणून हीन वागणूक, मुलांच्या बरोबर सराव करणे अशा अनेक समस्यांवर मात करीत तिने ऑलिम्पिकपर्यंत मजल मारण्याची जिद्द मनी धरली.
वयाच्या अठराव्या वर्षी तिने ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत भाग घेऊन पदक पटकाविले. सहा वर्षांनी ब्राझीलच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पराभव समोर दिसत असताना हार न मानता शेवटच्या पाच मिनिटांत आठ गुणांसह विजय मिळवला. भारताच्या इतिहासात महिलांच्या कुस्ती स्पर्धेतील ते पहिलेवहिले पदक होते. तिने आपल्या जिद्दीने, कष्टाने आणि आत्मविश्वासाने इतिहास रचला.
साक्षीसारख्या कितीतरी धडाडीच्या मुली आता सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा गाजवत आहेत. भारताचा तिरंगा घेऊन या मुली जागतिक स्पर्धेच्या मैदानावर विजयी फेरी मारतात तेव्हा अभिमान वाटतो. जागतिक दर्जाचे खेळाडू घडणे सोपे नसते.
भारतीय मैदानांवरच्या या जागतिक कीर्तीच्या महिला खेळाडूंचा आणखी एक शत्रू असतो : पुरुषी अहंकार आणि वासना! क्रीडा संघटनेतील पदाधिकारी, प्रशिक्षक आणि निवड प्रक्रियेतील पुरुष या खेळाडूंकडे ‘खेळाडू’ म्हणून न पाहता हातातल्या अधिकारांच्या बळावर त्यांना आपल्या वासनेची शिकार बनवण्याच्या धडपडीत असतात!
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करून साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी वर्षापूर्वी नवी दिल्लीत जंतर-मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन केले होते. अनेक दिवसांच्या लढ्यानंतर बृजभूषण शरण सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. वेळेवर निवडणुका घेऊन पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही म्हणून आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारताला प्रवेश नाकारण्यात आला. लोकसभेचे सदस्य असणाऱ्या महासंघाच्या अध्यक्षाचे वर्तन गंभीर असताना त्यांना पदावरून हटविले जात नव्हते. ते सातत्याने मस्तवालपणे वागत राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रीडा क्षेत्राची मानहानी होत असताना केंद्रातील भाजप सरकारने बृजभूषण यांचीच पाठराखण करण्याचे धोरण कायम ठेवले. खूप टीका झाल्यावर अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिला, पण गुन्हा दाखल करण्यात आला नाही. नार्को टेस्टची मागणी करण्यात आली, मात्र सरकारने नेहमीच विरोधी भूमिका घेण्यात धन्यता मानली.
कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या ताज्या निवडणुकीत पंधरा जागांपैकी तेरा जागा बृजभूषण सिंह यांच्या समर्थकांनीच जिंकल्या. अध्यक्षपदासाठी बृजभूषण यांचे निकटवर्तीय असलेले संजय सिंह निवडून आले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. त्यांच्या विरोधात अनिता शिओरॅन उभ्या होत्या. बृजभूषण यांचे निकटवर्तीयच पुन्हा भारतीय कुस्ती महासंघ चालविणार असतील तर आपण कुस्ती खेळण्याचा त्याग करीत आहोत, असे जाहीर करताना साक्षीला अश्रू आवरले नाहीत. त्यापाठोपाठ बजरंग पुनिया पद्मश्री परत करणार आहेत.
देशाची शान-मान वाढविणाऱ्या खेळाडूंवर खेळच सोडण्याची वेळ यावी, हे लाजिरवाणे आहे. सर्वच क्रीडा संघटनांमध्ये प्रचंड राजकारण, गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि अनागोंदी आहे. महिला खेळाडूंच्या वाट्याला लैंगिक शोषण येते. संस्कृती रक्षणाचा टेंभा मिरवणाऱ्या सरकारच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्याच एका खासदारासाठी देशाला लाजेने मान खाली घालावी लागावी; यापेक्षा खेदजनक काय असू शकते?