अशी ही ‘चमकोगिरी’
By admin | Published: October 11, 2014 04:56 AM2014-10-11T04:56:22+5:302014-10-11T04:56:22+5:30
औरंगाबाद आणि कोल्हापुरात झालेल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये भाषण करताना काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘चमकोगिरीचा’ पराभव करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले आहे.
औरंगाबाद आणि कोल्हापुरात झालेल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये भाषण करताना काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी ‘चमकोगिरीचा’ पराभव करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील मतदारांना केले आहे. देशाने गेल्या ६० वर्षांत केलेला विकास केवळ आपल्या १०० दिवसांच्या कारकिर्दीतच झाला, असा आव आणून प्रचारात उतरलेल्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या मंडळीचा त्यांनी त्यांच्या विराट सभांमध्ये घेतलेला समाचार भाजपाच्या वर्मी लागणारा आहे. नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येकच सभेत ‘महाराष्ट्राचा गुजरात बनविण्याची’ भाषा बोलतात, हा प्रकार महाराष्ट्राला मागे नेण्याच्या आहे, हे स्पष्ट करताना, सोनिया गांधींनी महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांत गुजरातहून पुढे असणे अधोरेखित केले आहे. त्याच वेळी महाराष्ट्राला धार्मिक व जातीय दंगलींपासून मुक्त ठेवण्याचे काँग्रेसचे प्रशासनही त्यांनी प्रशंसनीय ठरविले आहे. सन २००२मध्ये गुजरातेत झालेल्या धार्मिक दंगलीत दोन हजारांवर अल्पसंख्य स्त्री-पुरुष मारले गेले आणि त्या अपराधासाठी मोदींच्या सरकारातील काही जण तुरुंगात शिक्षा भोगत आहेत व काहींविरुद्ध न्यायालयात खटले सुरू आहेत. खुद्द भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरच खून, अपहरण व खंडणीखोरीचे गुन्हे दाखल असूनही ते भाजपाचे अध्यक्ष झाले आहेत. मात्र याहून महत्त्वाची ठरणारी मोदींची चमकोगिरी, काँग्रेस पक्षाची उपलब्धी आपल्या नावावर मांडून घेण्यातली आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे यान मंगळावर उतरले आणि त्याने त्या ग्रहाची छायाचित्रे येथे पाठवायला सुरुवात केली. त्यावेळी भाषण करताना मोदींनी आणलेला आविर्भाव, ते सारे त्यांच्या १०० दिवसांच्या कारकिर्दीतच झाले असा होता. वास्तव हे, की भाभा अणुसंधान केंद्राची स्थापना पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत १९५० च्या दशकातच झाली. सन १९७६मध्ये इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताने आपला पहिला अणुस्फोट केला. वाजपेयी सरकारने केलेले स्फोट त्यानंतरचे आहेत. इस्रो या भारतीय संस्थेने अवकाशात उपग्रह सोडण्याची व चंद्रावर यान पाठविण्याची योजना फार पूर्वीच यशस्वी केली आहे. तिच्यामागे देशातील शास्त्रज्ञांचे व आजवरच्या सरकारांचे ६० वर्षांचे परिश्रम व नियोजन उभे आहे. देश दुष्काळमुक्त झाला आहे. मध्यमवर्ग पाच टक्क्यांवरून वाढून ४० टक्क्यांवर गेला आहे. दारिद्र्याच्या सीमारेषेखाली असणाऱ्यांची संख्या ४३ टक्क्यांवरून कमी होऊन १५ टक्क्यांखाली गेली आहे. देशात चांद्रयानच नव्हे तर सर्व तऱ्हेच्या मोटारी, विमाने, इंजिने व यंत्रसामग्री तयार होऊ लागली आहे. देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होऊन त्याचा निर्यातदार बनला आहे. देशाची गंगाजळी ४०० अब्जांच्या पुढे गेली आहे आणि सामान्य कुटुंबातील मुले व मुली सन्मानपूर्वक शिक्षण घेताना दिसू लागली आहेत. महाराष्ट्राच्या सामान्य कुटुंबातला घरटी एक मुलगा वा मुलगी परदेशात शिक्षण घेत वा काम करीत आहे. ही सारी मोदींच्या चार महिन्यांच्या पंतप्रधानकीची मिळकत नाही. ती पं. नेहरूंपासून डॉ. मनमोहनसिंगांच्या सरकारांपर्यंत झालेल्या सर्व राष्ट्रनिर्मात्यांची उपलब्धी आहे. गेल्या ६० वर्षांत देशात काहीच झाले नाही, असे म्हणणे हा कृतघ्नपणा आहे आणि जे झाले ते फक्त या चार महिन्यांत झाले असे सांगणे ही चमकोगिरी आहे. गेले १५ दिवस नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रचाराला खंबीर उत्तर द्यायला काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपैकी कुणी महाराष्ट्रात उतरले नव्हते. त्यामुळे त्यांचा एकतर्फी व खोटा प्रचार चालत व खपत राहिला. सोनिया गांधींनी त्यांच्या पहिल्याच प्रचारसभेतून त्या एकतर्फी ढोंगाचे पितळ उघडे केले आहे. मोदींना तशीही फेकूगिरीची सवय आहे. नुकत्याच हरियाणातील एका सभेत बोलताना ते म्हणाले, ‘मुझे हरियाणा का कर्ज चुकाना है।’ वास्तव हे, की मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या राज्यावर कर्जाचा भार अवघा २५८३ कोटींचा होता. त्यांच्या कार्यकाळात वाढून तो १ लाख ९२ हजार कोटींचा झाला आहे. आपल्या राज्यावरील कर्जाचा भार नुसताच वाढू देऊन तो न चुकविणारे मुख्यमंत्री पंतप्रधानपदावर येताच हरियाणासारख्या दूरच्या राज्याचे कर्ज चुकविण्याची भाषा बोलत असतील तर त्यातले खरेखोटे साऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत प्रसिद्धीमाध्यमांच्या बळावर असे बरेचसे खोटेपण चालून गेले. गेल्या चार महिन्यांत झालेल्या पोटनिवडणुकांच्या निकालांनी त्या खोटेपणाचा प्रत्यय जनतेला आल्याचेही दाखवून दिले. आताची लढत हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी आहे. येथेही जुना खोटेपणा चालेल असे मोदी किंवा त्यांचे सहकारी समजत असतील तर तो त्यांचा भ्रम आहे.