असा मित्र सुरेख बाई
By admin | Published: November 26, 2015 10:09 PM2015-11-26T22:09:48+5:302015-11-26T22:09:48+5:30
शरद पवार काट्याच्या वाडीतील प्राथमिक शाळेत शिकले की नाही, ठाऊक नाही. जर शिकले असतील आणि त्यांचे तेव्हांचे गुरुजी आज हयात असतील तर ते नक्कीच सांगतील
शरद पवार काट्याच्या वाडीतील प्राथमिक शाळेत शिकले की नाही, ठाऊक नाही. जर शिकले असतील आणि त्यांचे तेव्हांचे गुरुजी आज हयात असतील तर ते नक्कीच सांगतील की ‘शरद वर्गातला मोठा खोडकर विद्यार्थी हो’! तो खोडकरपणा त्यांनी आजही अगदी जपून ठेवला आहे. ‘प्रौढत्वी नीज शैशवास जपणे’ वगैरे. या खोडकर स्वभावातूनच अधूनमधून मध्यावधी निवडणुकांचे भाकीत ते करीत असतात. एरवी त्यांचा फल ज्योतिषावर आणि भाकितांवर वगैरे विश्वास नसल्याचे त्यांचे सवंगडी सांगत असले तरी अशी राजकीय भाकिते ते नेहमीच व्यक्तवून मोकळे होत असतात. मध्यंतरी त्यांनी बऱ्याचदा लोकसभेच्या मध्यावधीची भाकिते केली पण हवामान खात्याच्या भाकितांसारखीच त्यांचीही गत झाली. आताचे त्यांचे ताजे भाकीत आहे राज्यातील विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे. अर्थात त्यासाठी त्यांनी मुहूर्त सांगितला आहे तो मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतरचा. तूर्तास राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपा आणि सेना यांच्यातील कुरबुरी वाढल्या आणि सेनेने सत्तात्याग वा युतीत्याग केला (तसे होणे असंभव कारण आतमध्ये राहून छळण्यात अधिक मौज असते) तर आपण फडणवीस सरकार पडू देणार नाही असे पवारांनीच नि:संदिग्धपणे सांगितले होते. त्यामुळे समजा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत युती झाली नाही (ती तर विधानसभेच्या वेळीही झाली नव्हती) तर दोघे स्वतंत्रपणे ती निवडणूक लढवतील, कपाळमोक्ष करुन घेतील आणि मग मध्यावधी निवडणुकीशिवाय पर्यायच राहणार नाही, असा पवारांच्या या भाकिताचा खुलासा. म्हणजे त्या स्थितीत ते फडणवीस सरकार वाचविण्याच्या काही भानगडीत पडणार नाहीत! परंतु प्रत्यक्षात तसे काही नसावे. विधान परिषदेची निवडणूक आम्ही काँग्रेससोबतलढविणार असल्याचे जाहीर करुन आणि त्याद्वारे युतीनेही युतीधर्म पाळावा असाच मित्रत्वाचा सल्ला त्यांनी दिला असावा. तसेही सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सेना-भाजपा युतीचे शिल्पकार प्रमोद महाजन पवारांचे सख्खे मित्र होते अणि या मित्रांच्या पश्चात त्यांचे गड सुरक्षित राखणे आपलेच कर्तव्य आहे, असा पवारांच्या मनातील रास्त समज असावा. त्यामुळे मध्यवधीची हूल उठवून दिली की मुळातच अंत:करणी घाबरट असलेले सेना आणि भाजपाचे लोक निमूट युतीला चिकटून राहतील असा त्यांचा विचार असावा. नव्हे तोच तर त्यांचा खरा प्रयत्न आहे आणि म्हणूनच युतीच्या दोन्ही भागीदारांनी ‘असा मित्र सुरेख बाई’ म्हणून गप्प बसावे.