असे मतलबी लोकानुनयी कायदे होऊ नयेत
By admin | Published: March 29, 2016 03:49 AM2016-03-29T03:49:35+5:302016-03-29T03:49:35+5:30
साऱ्या चिकित्सांचा आरंभ धर्मचिकित्सेपाशी सुरू होतो, हे मार्क्सचे प्रसिद्ध वचन आहे. याच आयुष्यावर नव्हे तर मागच्या व पुढच्या अनेक आयुष्यांवर धर्माचे नियंत्रण असल्याचे सांगितले
- सुरेश द्वादशीवार
(संपादक, लोकमत, नागपूर)
साऱ्या चिकित्सांचा आरंभ धर्मचिकित्सेपाशी सुरू होतो, हे मार्क्सचे प्रसिद्ध वचन आहे. याच आयुष्यावर नव्हे तर मागच्या व पुढच्या अनेक आयुष्यांवर धर्माचे नियंत्रण असल्याचे सांगितले जात असल्याने ही चिकित्सा महत्त्वाची ठरते. प्रगती, विकास आणि न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुतेसारख्या मूल्यांसाठीही ही चिकित्सा होणे आवश्यक असते.
धर्मांधतेचा वा अतिरेकी धर्मश्रद्धेचा आग्रह धरणारी माणसे या चिकित्सेला विरोध करतात आणि माणसांचे धर्मांनी बांधून ठेवलेले आयुष्य जसेच्या तसे राखण्याचा व त्यावरील धर्माचे नियंत्रण (म्हणजे धार्मिक पुरोहितांचे वर्चस्व) कायम टिकवण्याचा प्रयत्न करतात. पंजाब विधानसभेने नुकत्याच पारित केलेल्या भारतीय दंड संहिता (पंजाब सुधारणा विधेयक) २०१६ नव्या कायद्याने नेमके हेच केले आहे. शीख धर्माला व सगळ्याच भारतीयांना श्रद्धेय असलेल्या गुरू ग्रंथसाहेबाची अवहेलना करणाऱ्या इसमाला जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद या सुधारणा कायद्यात केली आहे. ग्रंथसाहेबाची अवहेलना कोणताही विवेकी व शहाणा माणूस जाणीवपूर्वक कधी करणार नाही. मात्र सर्वच धर्मग्रंथांच्या आजवर होत आलेल्या चिकित्सेप्रमाणेच ग्रंथसाहेबाची चिकित्सा करावी असे एखाद्या अभ्यासकाला वाटले तर तो या नव्या कायद्यानुसार जन्मठेपेचा कैदी होण्याची शक्यता मोठी आहे. त्याने केलेली चिकित्सा साधी टीकास्पद असली तरी ती धर्माच्या व धर्मगुरुंच्या मते अवहेलनाच ठरू शकते. परंपरेने लावलेला धर्मग्रंथांचा अर्थ आताच्या काळात कोणी नव्या स्वरूपात मांडला तरी तो धर्माच्या अवहेलनेचा भाग आहे असे म्हटले जाऊ शकते. असे म्हटले गेल्याचे पुरावे जगातील सर्वच धर्मांच्या इतिहासात आहेत. मौलाना अबुल कलाम आझाद या विद्वान धर्म पंडिताने त्याच्या तफासीरुल कुराण या पवित्र कुराणाची चिकित्सा करणाऱ्या ग्रंथात कुराणाचा जो नवा अर्थ मांडला त्यासाठी त्यांना इरतदाद, इरतकाम यासारखी दगडांनी ठेचून तीनदा ठार मारण्याची शिक्षा मक्केच्या मशिदीने सुनावली होती, ही बाब येथे उल्लेखनीय ठरावी. भारतीय परंपरेतही वेदांना अनुकूल असलेला विचारच धर्मदृष्ट्या ग्राह्य मानला जाईल असे सांगितले गेले. वेदांशी प्रतिकूल असणारा विचार वा वेदांचा परंपरेला मान्य नसलेला अर्थ लावणारा इसम येथेही धर्माचा अपराधीच मानला गेला.
ख्रिश्चन, ज्यू व जगातले इतर धर्मही त्यांच्या अशा परंपरागत बांधणीहून वेगळे नाहीत. ल्यूथर मार्टिनला जिवंत जाळण्याची शिक्षा याच बांधणीतून सुनावली गेली ही बाब येथे लक्षात घ्यायची. त्याचवेळी एखाद्या प्रामाणिक अभ्यासकाने धर्मग्रंथाचा लावलेला अर्थ व केलेली चिकित्सा धर्मगुरुंना मान्य होणारी नसेल वा परंपरेहून वेगळी असेल तर मग ती धर्मग्रंथाची अवहेलना ठरेल आणि अशा अभ्यासकाला पंजाबच्या आताच्या कायद्यानुसार न्यायासनासमोर उभे करून थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकेल. पंजाब विधानसभेचा व तीत बहुमत असलेल्या अकाली दल-भाजपा युतीचा हा कायदा करण्याचा पवित्रा येणाऱ्या निवडणुकीत शीख मते संघटित करण्याच्या राजकीय दृष्टीने घेतला गेला आहे हे उघड आहे. मात्र राजकारणावर आणि गठ्ठा मतांवर लक्ष ठेवून केले जाणारे असे कायदे विकासाच्या व ज्ञानाच्या मार्गात केवढे मोठे अडसर उभे करतात आणि त्याचवेळी ते समाजाला कायम बंदिस्त करतात हे लक्षात घेणे गरजेचे असते. मतांचे राजकारण आले की त्यात पक्षीय अहमहमिका येते. पंजाबातही तेच झाले. अकाली दल-भाजपा युतीने हे विधेयक मंजूर करताच काँग्रेस व इतर पक्षांच्या तेथील आमदारांनी हाच कायदा हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व इतर धर्मांच्या ग्रंथांनाही लागू करा अशी आणखी व्यापक पण प्रतिगामी मागणी पुढे केली. असे कायदे उद्या देशात झाले तर कधीकाळी लिहिले गेलेले व परंपरेने डोक्यावर घेतलेले पवित्र ग्रंथ देश व समाज यांचे वर्तमानच भयभीत करणार नाही, त्यामुळे त्यांचे भविष्यही बंदिस्त व थांबलेले ठरणार आहे. गेल्या १०० वर्षांत भारतातील सर्वच धर्मांत मोठ्या सुधारणा घडून आल्या. स्त्रियांवर असलेले निर्बंध शिथिल झाले. दलितांवर लावलेली धार्मिक बंधने दूर झाली.
समाजात मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य, समता व बंधुतेसारखी समाजाला जवळ आणणारी मूल्ये रुजलेली दिसली. राजा राममोहन रायांपासून गांधी व आंबेडकरांपर्यंतच्या सगळ्या सुधारकी महापुरुषांनी माणसावरील धर्माची व धर्मग्रंथांची जाचक बंधने दूर करण्यासाठी त्यांचे आयुष्य वेचले. परिणामी आजच्या पिढ्यांची आयुष्ये अधिक मोकळी आणि स्वतंत्र झाली. त्यांचे जगण्याचे मार्गही प्रशस्त व प्रगल्भ झाले. या स्थितीत पंजाब विधानसभेच्या धर्मग्रस्त आमदारांनी धर्मचिकित्सेवर, धर्मग्रंथाच्या अवहेलनेचे कारण पुढे करून निर्बंध लादण्याचा प्रयत्न चालविला असेल तर त्याचा विचार साऱ्या देशातील राजकीय नेत्यांनी व जाणकार विचारवंतांनी अतिशय गंभीरपणे केला पाहिजे. असे प्रयत्न समाजाला मागे नेण्यासाठी कारणीभूत होतात आणि समाजाच्या प्रगतीच्या पावलात बेड्या अडकवितात ही बाब अतिशय विवेकपूर्ण पद्धतीने साऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. बांधलेले समाज पुढे जात नाहीत आणि त्यांच्यात थांबलेली चिकित्सा त्यांना काळाच्या मागे नेत असते ही बाब मध्य आशियातील अतिरेकी संघटनांच्या आताच्या कारवाया साऱ्या जगाला शिकवू शकणारी आहे.