साहित्य संमेलनाध्यक्षांची अशीही लोकप्रियता...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:13 AM2024-11-04T08:13:01+5:302024-11-04T08:14:27+5:30
Marathi Sahitya Sammelan: दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचं छायचित्रं असलेली शुभेच्छापत्रं किंवा मग, कुणी तयार करत असेल तर... याला काय म्हणायचं? अर्थात, हा ताराबाईंबद्दल महाराष्ट्राच्या जनमानसात असलेला आदरच होय!
- डॉ. मुकुंद कुळे
(मुक्त पत्रकार)
सण-उत्सवांच्या निमित्ताने टी-शर्ट, चहा-कॉफीचे मग किंवा शुभेच्छापत्रांवर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश वा छायाचित्र प्रिंट करून घेणं आता नवीन राहिलेलं नाही. किंबहुना तरुणाईची ती ओळखच बनली आहे, कारण त्यातून त्यांची कल्पकताच प्रतीत होत असते. पण दिल्ली येथे भरणाऱ्या आगामी ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांचं छायचित्रं असलेली शुभेच्छापत्रं किंवा मग, कुणी तयार करत असेल तर... याला काय म्हणायचं? अर्थात, हा ताराबाईंबद्दल महाराष्ट्राच्या जनमानसात असलेला आदरच होय!
वास्तविक गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद, हे एक समीकरणच झालेलं आहे. अगदी स्थळनिवडीपासून ते अध्यक्षनिवडीपर्यंत कुठलाही विषय या वादाला वर्ज्य नसतो. अशा वेळी दिल्ली येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली आणि सर्वच प्रकारच्या वादांना जणू विराम मिळाला. अर्थात, ही किमया डॉ. तारा भवाळकर यांच्या कणखर तरी ऋजू व्यक्तिमत्त्वाची. त्यांच्या लेखनात आणि वक्तृत्वात रोखठोकपणा-ठामपणा आहेच, मात्र अनावश्यक ताठरता-काठिन्य नाही. त्यामुळेच संमेलनाध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झाल्यावर पक्षीय राजकारणाच्या पल्याड जाऊन साऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं, अगदी घरी जाऊन केलं. परंतु यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या निवडीने कोणत्याही प्रकारची वैचारिक-बौद्धिक मिरासदारी मानणाऱ्यांपेक्षा मातीशी-निसर्गाशी इमानदारी राखणाऱ्या बहुजनांना त्यांच्या या निवडीचा आनंद अधिक झाला. त्यामुळेच तर जात-धर्माच्या आणि कोणत्याही सामाजिक स्तराच्या पल्याड जाऊन प्रत्येकाने त्यांच्या निवडीचा आनंद साजरा केला. हा आनंद साजरा करण्यात त्यांच्या सांगली जिल्ह्यातील राजकारणी, समाजकारणी यांच्यापासून ते त्या राहत असलेल्या मार्गावरील दुकानदार-भाजीवाले साऱ्यांचा समावेश होता. आपण गेली अनेक वर्षे ज्या बाईंना बघतोय त्या दिल्ली येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्याचं समजल्यावर त्यांच्या घरासमोरच्या दुकानदार-भाजीविक्रेत्यांनी अगदी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला.
एखादा साहित्यिक संमेलनाध्यक्ष झाल्यावर साहित्य विश्वात त्याचं होणारं कौतुक हा एकप्रकारे उपचाराचाच भाग असतो. परंतु यंदा, समाजाच्या सर्व स्तरातून ताराबाईंचं होत असलेलं स्वागत ही लक्षणीय बाब आहे. किंबहुना लोकसाहित्याच्या निर्मितीमागे ज्याप्रकारे लोकमानसाची प्रेरणा असते, तसंच काहीसं यावेळी झालंय, ताराबाईंच्या निवडीमुळे संपूर्ण लोकमानस आनंदून गेलंय... आणि त्यामुळेच त्यांचं कौतुक करण्याच्या, अभिनंदन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. कुणी ताराबाईंचा फोटो असलेल्या शुभेच्छापत्रिका तयार केल्यात, तर कुणी ताराबाईंचा फोटो असलेले चहा-कॉफीचे मग तयार केलेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदावर कित्येक वर्षांनी अशा साहित्यिकाची वर्णी लागलेली आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, प्रतिभा, विचार आहे आणि ज्याचे पाय इथल्या मातीत घट्ट रोवलेले आहेत. डॉ. तारा भवाळकर यांना महाराष्ट्राच्या सर्व स्तरांतून मिळत असलेली स्वीकारार्हता याचंच तर द्योतक आहे!