असेही प्रकाशन!
By admin | Published: May 29, 2016 03:16 AM2016-05-29T03:16:32+5:302016-05-29T03:16:32+5:30
प्रकाशन सोहळ्यात एवढ्या ‘बंदोबस्तात’ पुस्तकं का बांधतात? रंगीत कागदात जे पॅकिंग केलेलं असतं ते इतकं जाम चिकटवलेलं असतं की ते उघडता उघडत नही. मग झटापट
- रविप्रकाश कुलकर्णी
प्रकाशन सोहळ्यात एवढ्या ‘बंदोबस्तात’ पुस्तकं का बांधतात? रंगीत कागदात जे पॅकिंग केलेलं असतं ते इतकं जाम चिकटवलेलं असतं की ते उघडता उघडत नही. मग झटापट करून वेडावाकडा कागद फाडून पुस्तकं बाहेर काढली जातात आणि फाटलेला रंगीत कागद हे सगळं चोळामोळा करून फेकून दिलं जातं. मग वाटतं हा आटापिटा कशासाठी?
चंद्र्रशेखर टिळक यांच्या ‘भावतरंग’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा. आता टिळक हे यशस्वी अर्थविषयक पुस्तकांचे लेखक आहेत. राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकांच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्या आहेत. पण त्यांचा पहिलाच कवितासंग्रह म्हटल्यावर त्याचं कौडकौतुक हे गृहीतच. पहिलेपणाचे अप्रूप असतंच... सांगायची गोष्ट वेगळीच आहे.
मोरया प्रकाशनतर्फे भावतरंग कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. अर्थात प्रकाशनाचा ‘तो’ क्षण (बरीच भाषणं वगैरे झाल्यानंतर) आला. व्यासपीठावरची मंडळी उभी राहिली. पुस्तकाचा गठ्ठा-रंगीत कागदातून गुंडाळलेला, त्यावर रिबीन बांधलेली असा पुढ्यात आला. आता हा जामानिमा पण ठरलेला आहे. मृदृला दाढे - जोशी यांच्या हस्ते कवितासंग्रहाचं प्रकाशन. त्या पुस्तकाच्या गठ्ठ्यावरची रिबीन सोडायला लागतात. पण त्याची गाठ सुटत नाही. मग बाजूचे एक-दोन जण पुढे सरसावतात. पण सुदैवाने आधीच रिबीनची गाठ सुटते.
स्टेजवरच्या टिळकांसह असलेल्या मंडळींनी सुस्कारा सोडला असेल तर तो समजण्यासारखा आहे. पण माझ्या शेजारी बसलेल्याने सुस्कारा सोडलेला मला दिसला. त्यानेच तर पुस्तकाचा गठ्ठा बांधलेला नव्हता? हे म्हणजे टिळकांनी त्यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे काही घडले का? ते तसे घडणारच होते?
प्रकाशन सोहळ्यात एवढ्या ‘बंदोबस्तात’ पुस्तक का बांधून ठेवतात? रंगीत कागदात जे पॅकिंग केलेलं असतं ते इतकं जाम चिकटवलेलं असतं की ते उघडता उघडत नही. मग झटापट करून वेडावाकडा कागद फाडून पुस्तकं बाहेर काढली जातात आणि फाटलेला रंगीत कागद हे सगळं चोळामोळा करून फेकून दिलं जातं. मग वाटतं हा आटापिटा कशासाठी? त्यापेक्षा साधेपणानं पुस्तकं बांधता येणार नाहीत? पण म्हणतात ना, लक्षात कोण घेतो?
यावरून आठवलं, मागे गोदावरी परुळेकर यांच्या ‘माणूस जेव्हा जागा होतो’ या आत्मकथेचं प्रकाशन होतं. हस्ते दत्तो वामन पोतदार. पण पुस्तकाला बांधलेली रिबीन सुटेचना. बहुधा सूटगाठीची निरगाठ झाली असावी. क्षणभर चिंता. पण दत्तो वामनांनी हा घोटाळा ओळखला. ते म्हणाले, ‘काळजी करू नका, असं म्हणून त्यांनी खिशातून पाकीट काढलं आणि त्यातून छोटी कात्री काढली आणि रिबीन कापली. प्रकाशन झालं!
पण दत्तो वामन म्हणाले, असं होतं हे मला माहीत आहे. म्हणून नेहमी मी खिशात कात्री ठेवतो...’
आता पुस्तक प्रकाशन सोहळा म्हटलं की पुस्तक असायलाच पाहिजे हा नेहमीचा प्रघात झाला. पण कधी-कधी प्रकाशन सोहळ्यापर्यंत पुस्तकाच्या प्रती झालेल्या नसतात, हाती पडत नाहीत. अशावेळी काय करायचं? असाच एकदा प्रसंग उद्भवला. सगळेच संबंधित चिंताग्रस्त. ही गोष्ट ज्यांच्या हस्ते प्रकाशन होतं त्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लक्षात आली. त्यांनी संबंधितांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित करतो.
त्याप्रमाणे तर्कतीर्थांनी रीतसर प्रकाशन केलं. हजर असलेल्यांनी टाळ्या वाजविल्या. प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
आता हे कसं घडलं?
तर्कतीर्थांनी कुठलंतरी पुस्तक रंगीत कागदात बांधून आणायला सांगितलं. प्रकाशन प्रसंगी त्यांनी पुस्तकावरची रिबीन सोडली आणि पुस्तक बाहेर काढलंच नाही. फक्त ते म्हणाले, ‘या पुस्तकाचे प्रकाशन झालं हे मी जाहीर करतो.’
कधीकधी पुस्तक तयार नसताना दुसऱ्याच पुस्तकावर नवं कव्हर लावून पुस्तक प्रकाशन झालेलं पण मी पाहिलेलं आहे.
शेवटी उंचावलेलं पुस्तक असलेला फोटो वृत्तपत्रातून येणं हेच उद्दिष्ट पार पडल्याशी कारण, असंच ना?
असाच अलीकडचा प्रसंग भिकू बारस्कर यांच्या ‘हळवे मन’ कथासंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी उद्भवला. भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन. विशेष पाहुणे मिलिंद जोशी. शिवाय लेखकासह इतर मंडळी स्टेजवर प्रकाशनासाठी सज्ज. पण पुस्तकाचाच पत्ता नाही! अर्थात गोंधळ उडणं साहजिकच. एवढ्यात हॉलच्या दारात आलेला कुरीयरवाला म्हणाला, ‘ओ साहेब, तुमची पुस्तकं घ्या.’ तो गठ्ठा सासणे सोडतात. भिकू बारस्करांच्या पुस्तकाचं प्रकाशन एकदाचं झालं. पण लगेचच लक्षात येतं हा सगळा बनाव लेखक भिकू बारस्कर यांनी घडवून आणला होता. बारस्कर तसे नाटकवाले. त्यांना काही वेगळ्या पद्धतीनं पुस्तक प्रकाशन करायचं होतं. म्हणून त्यांनी लढवलेली ही शक्कल होती. अर्थात ही गोष्ट दाद देण्यासारखीच.
असाच आणखी एक प्रसंग. पुस्तकाचे नाव तेजस्विनी. लेखिका डॉ. शुभा चिटणीस. याप्रसंगी ५८ निरांजनांचं तबक होतं. बटण दाबताच ५८ दिवे उजळले. प्रकाशन झालं. आता यामागची पार्श्वभूमी म्हणजे लेखिकेच्या शब्दांत, ‘ज्या माझ्या चरित्र नायिकांनी आपल्या आयुष्याची पाने माझ्यापुढे मोकळेपणी उलगडून ठेवली त्या तर सर्व जणी माझ्या तबकातील ५८ निरांजनांच्या स्वरूपात आहेतच! ती ही निरांजने. एका क्लिकने उजळली. ही कल्पनापण दाद देण्यासारखीच.
जुन्या परंपरेप्रमाणे लग्न लागल्यानंतर नवऱ्या मुलीकडून नवऱ्या मुलाकडच्या नातेवाइकांना डोक्यावरून झाल ठेवण्याचा कार्यक्रम असतो. म्हणजे काय तर सुपात कणकेचे दिवे ठेवले जातात. त्यात तेलवात पेटवून ते सूप मुलाच्या कुटुंबीयांच्या डोक्यावरून पुढे-पुढे नेतात. आता मुलीची जबाबदारी तुमच्यावर, हा त्याचा अर्थ. यात तेलवात आणि कणिक वाया जातेच आणि दिव्यांचा भडका उडण्याचा धोकादेखील असतो.
त्यापेक्षा ही ‘तेजस्विनी’ आयडिया बेस्ट. सुपात असे दिवे ठेवावेत. उद्या असं ‘तेजस्विनी सूप’ लग्नात दिसलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. तर पुस्तक प्रकाशनं असाही अनुभव देऊन जातात!