अशी ही घोटाळेबाजी....
By Admin | Published: July 9, 2015 10:25 PM2015-07-09T22:25:14+5:302015-07-09T22:25:14+5:30
डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत जेवढे घोटाळे समोर आले त्याहून अधिक ते मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात पुढे आले.
प्रथम स्मृती इराणी (पदवी घोटाळा) नंतर सुषमा स्वराज (आयपीएल ‘मोदी’ घोटाळा), पुढे वसुंधरा राजे (आयपीएल ‘मोदी’ घोटाळा), दुष्यंतकुमार (पुनश्च आयपीएल ‘मोदी’ घोटाळा) ही केंद्रातील घोटाळेबाजी शमत नाही तोच महाराष्ट्रात पंकजा मुंडे-पालवे (२०६ कोटींचा कथित घोटाळा), विनोद तावडे (१८१ कोटींचा कथित घोटाळा) आणि आता पन्नास जणांचे जीव घेऊनही न थांबलेला मध्य प्रदेशातील शेकडो कोटींचा व्यापमं घोटाळा. डॉ. मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत जेवढे घोटाळे समोर आले त्याहून अधिक ते मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात पुढे आले. फरक एवढाच की मनमोहनसिंग म्हणायचे ‘कायदा त्याच्या मार्गाने जाईल आणि खऱ्या गुन्हेगारांना शिक्षाही होईल,’ मोदी आणि त्यांचा परिवार मात्र तसे न म्हणता एकेका कथित घोटाळेबाजाला ‘क्लीन चिट’ (स्वच्छतेचे प्रमाणपत्र) देऊन मोकळे सोडण्यावर भर देत आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात मंत्री तुरुंगात गेले. अधिकाऱ्यांना बेड्या पडल्या. मोदी सरकारातील असे संशयित मंत्री मोकाट आहेत. शिवाय देशातून फरार असलेली ललित मोदींसारखी माणसे केंद्र सरकारच्या मदतीने देशोदेशीचे दौरे करीत आहेत. आणखीही एक फरक नोंदविण्याजोगा, मनमोहनसिंगांच्या सरकारने नीतीचे सोंग कधी घेतले नाही आणि मोदींचे सरकार त्या ढोंगातून बाहेर पडायलाच तयार नाही. मोदींच्या मंत्र्यांच्या वतीने त्यांच्या पक्षाचे वा संघाचे प्रवक्ते बोलतात. मोदींचे मंत्री त्यांच्याचप्रमाणे पत्रकारांना कधी सामोरे जात नाहीत. मोदींनी विकासाची मोठमोठी आश्वासने द्यायची, त्यांच्या सरकारातील इतरांनी त्यांचे प्रचारी समर्थन करायचे आणि संघ परिवारातील सज्जनांनी दुसरीकडे राजकारणाचे धर्मकारण करीत न्यायचे अशी ही आताची श्रमविभागणी व वाटचाल आहे. दूरचित्रवाहिन्यावरील शोध पत्रकारांनी आणि घोटाळे उघडकीला आणणाऱ्या व्हिसल ब्लोअर्सनी घोटाळ््यांचे निर्णायक पुरावे देशाला दाखविले, सुषमाबार्इंचा घोटाळ््यातील सहभाग उघड केला, वसुंधराबार्इंची व त्यांच्या चिरंजीवांसकटची सारी बाजू देशासमोर आणली, पंकजा व विनोद आदिंचे घोटाळेही साऱ्यांसमोर आणले आणि आता व्यापमंच्या महाघोटाळ््यात खुनापासून भ्रष्टाचारापर्यंतचे अनेक व्यवहार कसे अडकले आहेत आणि त्यांचे स्वरूप केवढे भीषण आणि उच्चपदस्थांपासून अखेरच्या माणसापर्यंत कसे व्यापक आहे हेही देशाला पाहता आले. एवढे होऊनही मोदी भारतात बोलत नाहीत व बोललेच तर रेडिओशी बोलतात. आज त्यांची अवस्था भारताचे अनिवासी पंतप्रधान अशी झाली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव बोलके मंत्री अरुण जेटली मात्र साऱ्यांना क्लीन चिट देऊन मोकळे होतात. अधूनमधून राजनाथसिंह बोलतात. मात्र त्यांचाही पाय त्यांच्या चिरंजीवाने केलेल्या कथित घोटाळ््यात अडकला आहेच. तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह तीन हजार कोटींच्या गुंत्यात अडकलेले तर मध्य प्रदेशचे गृहमंत्री बाबूलाल गौर आपल्याच बोलण्या-वागण्यात फसलेले. (एका रशियन मंत्रीणबाईंशी बोलताना त्यांनी काढलेले अचाट उद््गार ‘मला धोतर नेसता येत नसले तरी ते सोडता चांगले येते’ हे) दिल्लीत आजवर १४ सरकारे आली. पण त्यातले कोणतेही सरकार एवढ्या अल्पावधीत इतक्या साऱ्या आवर्तात सापडलेले दिसले नाही. इंदिरा गांधी आणीबाणीत अडकल्या. पण पुढे त्यांनी जनतेच्या मदतीनेच त्यातून स्वत:ची सुटका करून घेतली.
यश आणि अपयश यांचे वाटेकरी ही सगळीच सरकारे आहेत. पण भ्रष्टाचार आणि त्याचे बिनदिक्कत
समर्थन याबाबतीत मोदी सरकारचा हात धरू शकेल असे सरकार याआधी या देशात आले नाही. ज्या दिवशी लालकृष्ण अडवाणी यांनी ‘हे सरकार देशात आणीबाणी आणणारच नाही असे नाही’ हे म्हटले त्या दिवशी या साऱ्या आवर्ताचे गांभीर्यच देशासकट विदेशांच्याही लक्षात आले. त्यातून ते राममाधव संघातून भाजपात आयात झालेले. ते म्हणाले, ‘आणीबाणी येऊ शकेल पण ती पूर्वीसारखीच असेल असे मात्र नाही.’ (म्हणजे काय, इंदिरा गांधींनी १९७५ च्या आणीबाणीत आपल्या विरोधकांना तुरुंगात नुसतेच डांबले होते. आता येऊ घातलेली आणीबाणी वेगळी असेल याचा अर्थ नेमका काय होतो) पण माणसे बोलून थांबतात. लोकांना अर्थ लावण्याची मोकळीक देतात. शहाणे मंत्री स्वत:वर भाषण बंदी लादतात. तशी ती मनोहर पर्रीकरांनी स्वत:वर सहा महिन्यांसाठी लावलीही आहे.
तात्पर्य, घोटाळे फार झाले आहेत आणि घोटाळेबाजांची संख्याही मोठी झाली आहे. आता या सरकारला
नितीश कुमारांना किंवा लालूप्रसादांना नीतीचे धडे शिकविण्याचा अधिकार उरला नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगडफेक करू नये असे म्हणतात. इथे तर घर काचेचे आहे आणि तेही आतून तडकण्याच्या अवस्थेत आहे. अन्यथा ममता बॅनर्जींसारख्या प्रादेशिक नेतृत्वाने मोदी सरकारला समोरासमोरचे बोल सुनावण्याएवढे धाडस आणलेच नसते. विकास थांबल्याने देश बऱ्याचदा मागे राहतो. कधी तो नेतृत्वाच्या अपुरेपणामुळेही थांबलेला दिसतो. पण आताचा भारत देश थांबल्याजोगा दिसतो आहे तो केवळ या साऱ्या घोटाळ्यांपायी.