‘साहित्य’ आहे, पण ‘साहित्यिक’ नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 08:40 IST2024-12-21T08:38:27+5:302024-12-21T08:40:04+5:30

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना ‘विंदांचे गद्यरूप’ या ग्रंथासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद...

sudhir rasal statement there is literature but not literary | ‘साहित्य’ आहे, पण ‘साहित्यिक’ नाहीत!

‘साहित्य’ आहे, पण ‘साहित्यिक’ नाहीत!

- मुलाखत : दासू वैद्य (ख्यातनाम साहित्यिक)

फार लोकप्रिय नसलेल्या समीक्षा प्रकारात आपण व्रतस्थपणे लेखन करता. या पुरस्काराच्या निमित्ताने आज आपल्या मनात काय भावना आहेत? 

- माझ्या दृष्टीने हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या मोठ्या विचारवंत समीक्षकांना हा पुरस्कार मिळालाय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. सी. मर्ढेकर, प्रभाकर पाध्ये, पु. य. देशपांडे अशा अनेकांना हा पुरस्कार दिला गेला. या पंक्तीत आपण बसलो आहोत. आपली लायकी नसेलही कदाचित, पण तिथे प्रवेश मिळाला, याचं अतिशय समाधान आहे. 

‘विंदांचे गद्यरूप’ या लेखनामागची भूमिका काय आहे?

- एक अतिशय मौलिक असा सिद्धांत समीक्षेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जीवनवेधी कला (vital art) म्हणून विंदा वाङ्‌‌मयाकडे पाहत. आता प्रश्न असा आहे की, कलेच्या क्षेत्रातून  वाङ्‌‌मय आपल्याला वेगळं काढता येतं का? मुख्य म्हणजे विंदांनी एवढा महत्त्वाचा सिद्धांत ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने मांडला. पुस्तक इंग्रजीतून छापलं गेलं. त्याचं मराठी भाषांतर झालं. अपवाद वगळता कोणीही त्याची दखल घेतली नाही. मी ठरवलं, विंदांच्या कवितेवर मी लिहितो त्याच्या जोडीला त्यांचे समीक्षात्मक लेखनही विचारात घेतले पाहिजे. विंदा करंदीकरांचा सिद्धांत महत्त्वाचा आहे. त्याची चिकित्सा आपण केली पाहिजे. या भूमिकेतून मी हा ग्रंथ लिहिला. 

हे लेखन विंदांच्या संदर्भात असलं, तरी आजच्या मराठी साहित्याकडे तुम्ही कसं पाहता? 

- खरं म्हणजे हे बोललं तर हा माणूस निराशावादी आहे, असं म्हणाल. चंद्रकांत पाटील यांचं एक वाक्य सांगतो. ते म्हणाले, मराठीत कवी आहेत; पण कविता नाही. ज्याला आपण चांगली कविता म्हणतो ती तूर्त बाजूला ठेवू. आज मराठीत कादंबऱ्या लिहिल्या जातात, पण कादंबरीकार नाहीत. जसं- श्री. ना. पेंडसे यांना मी कादंबरीकार मानतो. खांडेकर, फडके हे कादंबरीकार होते. मराठीमध्ये आता कादंबरीकार राहिलाच नाही. सुट्या-सुट्या कादंबऱ्या अनेकजण लिहितात, पण अखंडपणे कादंबऱ्यांमागून कादंबऱ्या लिहून काहीतरी विशेष साधायचा असा प्रयत्न नाही. तसंच आळेकर, एलकुंचवार यांच्यानंतर जवळपास नाटककार नाहीच. अनेक गोष्टी मासिकांवरही अवलंबून आहेत. मासिक हा प्रकारच नसेल, तर या वाङ्‌‌मय प्रकारांचे होणार काय? साहित्य संस्थांनी वाङ्‌‌मयीन मासिकं चालवायला पाहिजेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज प्रतिष्ठान हे चांगल्या प्रकारे करू शकेल, असं मला वाटतं. 

साधारणपणे बऱ्याच जणांच्या लेखनाची सुरुवात कविता लेखनाने होते. तुम्ही समीक्षेकडे कसे वळलात?

- कविता मी अजिबातच लिहिली नाही. प्रयत्नही केला नाही. कवितेचे संस्कार माझ्यावर नाहीत. वाङ्‌‌मय म्हणून मराठीशी संबंध पदवीला आला. एकविसाव्या वर्षी प्रथम आधुनिक कविता भेटली. मग भराभरा सगळे कवी वाचून काढले. मी पहिली समीक्षा बी. रघुनाथांच्या कथेवर लिहिली. माझ्या पहिल्या निबंधाची कोणी दखल घेतली नाही. मग मी मर्ढेकरांवर उस्मानिया विद्यापीठाच्या जर्नलमध्ये लिहिलं. भाऊ पाध्ये यांच्या ‘वासूनाका’वर मी परीक्षण लिहिलं. इथून समीक्षालेखन सुरू झालं. 

नव्या पिढीत समीक्षेच्या वाटेला फार कुणी जात नाही...

- पहिली गोष्ट माझ्या दृष्टीने समीक्षा हे शास्त्र आहे. शास्त्रात मांडणीचे आद्य तत्त्व तर्क आहे. तार्किकदृष्ट्या विचार करता येणे आवश्यक आहे. अतिशय उच्च पातळीवर तर्क आणि गणित एकच. इथे विश्लेषणात्मक बुद्धी विकसित झाली पाहिजे. आपल्याकडे नव्वद टक्के प्राध्यापक वर्गात अलंकारिक भाषेत शिकवतात. माझं वर्गातलं बोलणं अनेकांना कंटाळवाणं वाटतं. रंजक व्याख्यानामुळे विद्यार्थी खुश होतात, पण त्यांची बुद्धी विकसित होत नाही. विश्लेषणात्मक क्षमता  शिक्षण पद्धती  निर्माण करत नाही. दुसरं, मराठीकडे येणारा विद्यार्थी सर्वसामान्यपणे सामान्य बुद्धीचा असतो. उत्तम विद्यार्थी इतर शाखांकडे जातात. हा शासनाचा दोष आहे. मराठी विद्यार्थ्यांना शासनानं नोकऱ्यांत प्राधान्य द्यावे. जेणेकरून मराठीकडे चांगले विद्यार्थी वळतील. 

आज समीक्षा लिहिणारी काही नावं सांगता येतील का? 

- मराठीमध्ये नव्वद टक्के समीक्षा आस्वादकच आहे. विश्लेषणात्मक समीक्षा नाहीच. दोन-तीन नावं घ्यायची तर वसंत पाटणकर, हरिश्चंद्र थोरात, नव्या पिढीत नितीन रिंढे  यापेक्षा अजून नावंच नाहीत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण मराठी शाळा बंद पडताहेत. मराठीच्या पदवी-पदव्युत्तर वर्गात विद्यार्थीसंख्या रोडावते आहे..

- याबद्दल शासनाने कठोर धोरण घेतलं पाहिजे. भाषिक अल्पसंख्याकांचा विचार फक्त महाराष्ट्रातच होतो. आजच्या हैदराबादमध्ये तेलुगू आलंच पाहिजे. तेलुगुशिवाय तिथे फार काळ टिकू नाही शकत. सगळीकडेच आहे हे. 

श्री. पु. भागवतांनी सांगितलेला जुना अनुभव आहे. कोलकत्याला श्रीपुंनी ग्रंथखरेदी केली, पण ग्रंथविक्रेता श्रीपुंशी इंग्रजीत बोलायला तयार नव्हता. शेवटी वीणा आलेसींनी  बंगाली बोलून मध्यस्थी केली. त्याने बिल मात्र इंग्रजीत दिले. महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते. सार्वजनिक ठिकाणी आम्ही मराठी बोलणं बंद केलं आहे. मुंबई शहर हा मराठीसाठी खरा अडथळा आहे. मुंबईतील उच्चभ्रू लोकांचा मराठीला विरोध आहे. राजकीय पक्षही तसेच. शासन कुणाचंही असो, मराठीसाठी कुणी काहीही करणार नाही. आता तर आधी कळस मग पाया असं होतंय. वर मराठी विद्यापीठ स्थापन करायचं आणि खाली मराठी शाळा बंद करायच्या. कसं जमणार?

यावर चांगले उपाय तुम्हीच सुचवू शकता..

- पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसाने न्यूनगंड सोडला पाहिजे. संभाषणाची सुरुवात मराठीतच केली पाहिजे. इथे मराठी सगळ्यांना यायला हवी. छत्रपती संभाजीनगरात लुगडं नेसलेल्या माळीणबाईंना, ‘बैंगण कैसे दिये?’ असं विचारतात. हे भयंकर आहे. 

एका नव्वद वर्षाच्या अभ्यासकाला सानंद अभिमानाने विचारतोय, नवे संकल्प, नव्या योजना काय आहेत?

- कामं तर खूप आहेत. कवितेच्या अध्यापनाबद्दल ग्रंथ करायचाय. मी कवितेवर खूप लिहिलं. आता मराठी नाटकांवर लिहायचंय. विंदांनी अनुवादित केलेल्या ‘किंग लियर’वर लेखन नियोजित आहे. श्याम मनोहरांच्या नाटकावर लिहितोय. हे लेखन संपत आलंय. 

 

Web Title: sudhir rasal statement there is literature but not literary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.