पुरे झाले सोहळे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 07:21 PM2019-01-07T19:21:28+5:302019-01-07T20:08:19+5:30
समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता
मिलिंद कुलकर्णी
खान्देशात विज्ञानाचा जागर सध्या सुरु आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने प्रारंभी शहादा, शिरपूर, जळगाव आणि फैजपूर या चार ठिकाणी आविष्कार संशोधन स्पर्धा घेतली. यातील विजेत्यांना विद्यापीठात दोन दिवसीय प्रदर्शन व स्पर्धा उपक्रमात सहभागी होण्याची संधी देण्यात आली. उच्च शिक्षणात संशोधनाला महत्त्व देण्यासाठी विद्यापीठाचा हा उपक्रम अभिनंदनीय असाच आहे. यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांच्यात संशोधनवृत्ती जोपासली जावी म्हणून तालुका आणि जिल्हा पातळीवरील विज्ञान प्रदर्शने ठिकठिकाणी सुरु आहे. विद्यार्थी त्याठिकाणी वेगवेगळी उपकरणे, संशोधन प्रकल्प मांडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासन, उच्च व शालेय शिक्षण विभाग, विद्यापीठ यांच्या माध्यमातून विज्ञान, संशोधनाविषयी जाणीवजागृती व्हावी, यासाठी हे उपक्रम होत आहेत.
हे सगळे छान छान सुरु असताना दोन प्रश्न सतावतात. विज्ञानाविषयी जागृतीसाठी हे उपक्रम होत असताना समाजात विज्ञाननिष्ठा का वाढत नाही? अजूनही अंधश्रध्दांचा प्रभाव आणि पगडा का कायम आहे? अंधश्रध्दा निर्मूलनाविषयी तसेच जादूटोणाप्रतिबंधक कायदा करावा म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन संघटनेसारख्या संस्थांना का लढा द्यावा लागत आहे? या प्रश्नाची उत्तरे मिळत नाही.
परवाच आपल्याच विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि खान्देशपूत्र डॉ.एस.एफ.पाटील यांनी पुण्यात व्यक्त केलेली याचविषयाशी संबंधित खंत अंतर्मुख करणारी आणि एकंदर शिक्षणव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारी आहे. फर्ग्यूसन गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यात डॉ.पाटील म्हणाले की, आपल्या देशात उद्योग, विज्ञान तंत्रज्ञानावर आधारीत शिक्षणपध्दती विकसीत झाली नाही. औद्योगिक क्षेत्र व शिक्षण क्षेत्रामध्ये संवाद नाही. आपल्याकडील संशोधनही निराशाजनक आहे. जागतिक पातळीवर आपले मानांकन खाली येत आहे. सी.व्ही.रामन यांच्यानंतर एकाही शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले नाही.
एकीकडे समाजात विज्ञाननिष्ठा वाढत नाही आणि शिक्षणक्षेत्रात संशोधनाचा दर्जा सुमार आहे, असाच निष्कर्ष तूर्त तरी काढता येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो की, विज्ञान प्रदर्शनापासून तर आविष्कार संशोधन स्पर्धांपर्यंत उपक्रम आम्ही शालेयपातळीपासून तर विद्यापीठांपर्यंत आयोजित करीत असतो. त्यावर शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत असते. मग या उपक्रमांमधून नेमके काय हाती पडते? केवळ सोहळे साजरे करण्यासाठी आणि वार्षिक उपचार पूर्ण केल्याचे समाधान मिळविण्यासाठी तर हे उपक्रम होत नाहीत ना? त्या उपक्रमाचा दर्जा, त्यातील संशोधन प्रकल्पांमधील गुणवत्ता, त्याची उपयोगिता याविषयी मूल्यांकन होत आहे काय? त्याचा आढावा घेतला जात आहे काय? आणि हे सगळे होत असेल तर आमचा संशोधनाचा दर्जा का उंचावत नाही? समाजातील विज्ञाननिष्ठा का वाढत नाही, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून वेगवेगळ्या विषयांवर राष्टÑीय परिषदा घेण्यासाठी मोठा निधी महाविद्यालये आणि विद्यापीठांना देण्यात येतो. या परिषदांना उपस्थित राहणे, संशोधन अहवाल सादर करणे यासाठी प्राध्यापकांना मानांकनाचे गुण देण्यात येतात. त्यावर प्राध्यापकांची वेतनवाढ निश्चित होत असते. त्यामुळे परिषदांना उपस्थिती चांगली असते, पण देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या परिषदा होतात. त्यातून काय हाती लागते, याविषयी एकदा फेरआढावा घेण्याची आवश्यकता आहे.