निष्काम तपोमूर्ती प.पू.विद्यासागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2017 12:18 AM2017-06-28T00:18:14+5:302017-06-28T00:18:14+5:30

श्रमण संस्कृतीच्या माध्यमातून जगावर उपकार करणारे निर्ग्रंथ जैनाचार्य विद्यासागरजी महाराज हे भारताच्या पवित्र भूमीला लाभलेले ज्योतिर्मय संत आहेत.

Sukkam Tapopurti H.P. Vidyasagarji Maharaj | निष्काम तपोमूर्ती प.पू.विद्यासागरजी महाराज

निष्काम तपोमूर्ती प.पू.विद्यासागरजी महाराज

Next

-निर्मल कुमार पाटोदी

श्रमण संस्कृतीच्या माध्यमातून जगावर उपकार करणारे निर्ग्रंथ जैनाचार्य विद्यासागरजी महाराज हे भारताच्या पवित्र भूमीला लाभलेले ज्योतिर्मय संत आहेत. त्यांची कीर्ती जगभरात पसरली आहे. त्यांचे आशीर्वाद व प्रेरणा यातून गोवंशरक्षा, शिक्षण, आरोग्य तसेच धर्मक्षेत्रात भक्त व श्रद्धाळू त्यांच्या भावनेला प्रत्यक्ष रूप देत आहेत. त्यांच्याजवळ मोरपंखांनी निर्मित ‘पिच्छी’ अणि गुरुंनी मुनी दीक्षा प्रसंगी प्रदान केलेला नारळाचा कमंडलू आहे. मान, सन्मान, पदवी, उपाधी, अलंकार यांचा त्यांनी आजीवन त्याग केला आहे. ‘माझी ओळख तोच सांगू शकतो, जो माझ्या अंत:करणात सामावू शकतो. मी जिथे बसलो आहे तिथे पोहोचू शकतो. तुमची दृष्टी तिथपर्यंतच पोहोचू शकते. माझी खरी ओळख म्हणजे या भौतिक शरीरात बसलेला मी एक चैतन्यपुंज आत्मा आहे. ’,असे ते स्वत:ची ओळख देताना सांगतात. त्यांच्या आदर्शांची उंची हिमालयाहून मोठी आहे. त्यांची प्रेरणा मनुष्याला सद्मार्गावर चालण्याचा आधार देते.
आचार्य श्रींची आकांक्षा आहे की, भारताच्या आध्यात्मिक भूमीवर परत ‘सोने की चिडिया’वाले युग अवतरावे. भारत विश्वगुरूच्या स्थानी प्रस्थापित व्हावा. प्राचीन गुरुकुल पद्धतीत समाविष्ट असलेली गणित, रसायन, आरोग्य, ज्योतिष, वास्तुशास्त्र, नक्षत्र, योग, इतिहास, अध्यात्म आणि व्याकरणावर आधारित ज्ञानप्रणाली शिक्षणप्रणालीचा भाग व्हावी. जगातील भाषांमधील ज्ञानासाठी आमच्या भाषांच्या खिडक्या सदैव खुल्या असाव्यात. संविधान संमत राजभाषा हिंदी तसेच प्रादेशिक भाषांना शिक्षण, प्रशासन आणि न्यायाच्या क्षेत्रात महत्त्व मिळावे. त्यामुळे ते म्हणतात : ‘आपला देश- आपली भाषा’, ‘इंडिया हटाओ-भारत लौटाओ’. मुलींच्या आयुष्यात सुधारणा व्हावी यासाठी ‘जीवनाचे निर्वाहन नव्हे निर्माण’ या सूत्रावर चालत ‘प्रतिभा स्थली’ ज्ञानोदय विद्यापीठ (जबलपूर), चंद्रगिरी (छत्तीसगड), रामटेक (नागपूर-महाराष्ट्र) येथे त्यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मचारिणी भगिनी निष्काम सेवाभावातून शिक्षण प्रदान करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.
१९९२ पासून तरुणांसाठी ‘श्री भारतवर्षीय दिगंबर जैन प्रशासकीय प्रशिक्षण संस्था’ जबलपूरमध्ये संचालित आहे. येथील सुमारे ४०० युवक आज मध्य प्रदेश शासनात कार्यरत आहेत. दिल्लीमध्ये ‘यूपीएससी’ तसेच ‘आयएएस’साठी ‘अनुशासन’ तसेच इंदूरमध्ये ‘आचार्य ज्ञानसागर छात्रावास’ आणि ‘प्रतिभा-प्रतीक्षा’ संचालित आहे.
परमपूज्य मुनिश्री आवाहन करतात की, ‘पशुधन वाचवा व मांसाची निर्यात बंद करा. गाईला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करा.’. गोवंशाला सन्मान द्यायचा असेल तर मुद्रेवर गाईचे चित्र अंकित केले पाहिजे. गोवंशाच्या रक्षणातूनच ग्रामीण जीवनाचा कायापालट होईल व दूधामुळे देश स्वस्थ होईल.
पूज्य विद्यासागरजी महाराज यांच्या कुशल लेखणीतून प्राकृत, अपभ्रंश, संस्कृत, बांगला, कन्नड आणि हिंदीत झालेले साहित्यिक योगदान हिंदी जगासाठी अक्षय्य निधी आहे. हिंदीमधील त्यांनी लिहिलेले महाकाव्य ‘मूकमाटी’ अप्रतिम आहे. यात शोषित व वंचितांच्या उद्धाराचा संदेश आहे. ३०० हून अधिक स्तंभलेखकांच्या सखोल लेखणीतून या कृतीवर भाष्य केले आहे. मनुष्य जीवनाची सार्थकता सिद्ध करणे हेच याचे उद्दिष्ट आहे. कुठलाही संप्रदाय, धर्म, पंथ किंवा संस्कृतीच्या बाजूवर प्रकाश टाकण्याऐवजी संपूर्ण मानवजातीला उत्कर्ष शिखरावर पोहोचण्याचा मार्ग दर्शविते. ११ आवृत्त्यांमध्ये भारतीय ज्ञानपीठ, नवी दिल्ली येथून प्रकाशित या महाकाव्याचे हिंदी, मराठी, कन्नड, बांगला तसेच इंग्रजीत भाषांतर झाले आहे.
२४ तास खड्गासन मुद्रेत दोन्ही हातांच्या ओंजळीत केवळ गरम पाणी, दूध, तांदूळ, डाळ हेच त्यांचे जेवण आहे. साखर, मीठ, हिरव्या भाज्या, फळ आणि रस, तेल, सुका मेवा इत्यादींचा त्यांनी आजीवन त्याग केला आहे. लाकडाच्या बाकावर आपल्या इंद्रिय शक्तीला नियंत्रित करत तपोसाधनेतून एकाच कडेला दिवसातून केवळ तीन तास झोपतात. दिवसा झोपत नाहीत. सर्व भौतिक साधने जसे वाहनांचा त्याग केला आहे. अंगावर काहीच घालत नाहीत. सर्व ऋतूंमध्ये पायीच विहार करतात. शहरापासून दूर असलेल्या शांत स्थळावर साधना करण्यास प्राथमिकता देतात. न सांगता विहार करतात. कुठल्याही प्रचार-प्रसाराशिवाय पिच्छी परिवर्तन करतात. भक्त व श्रद्धाळू त्यांना देवाचे चालते-फिरते रूप मानून नमन करतात.
आचार्य विद्यासागरजी यांचा जन्म अश्विन शुक्ल १५ संवत २००३, १० आॅक्टोबर १९४६ मध्ये कर्नाटकमधील संतांचे पावित्र्य लाभलेले गाव ‘चिक्कोडी’ (जिल्हा : बेळगाव) येथील मल्लपा पारस आणि श्रीमंती अष्टगे यांच्याकडे दुसऱ्या अपत्याच्या रूपात झाला. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्यावर साधू व मुनींचा सखोल प्रभाव पडला होता.
आचार्य श्री जी यांनी अजमेर येथे संस्कृतचे प्रकांडपंडित ८४ वर्षीय आचार्य ज्ञानसागर यांच्या मार्गदर्शनात प्रत्यक्ष शिक्षण घेतले व ज्ञान ग्रहण केले. ३० जून १९६८ रोजी ते मुनी झाले. नसिराबाद (अजमेर) येथे मार्गशीर्ष कृष्ण द्वितीय, संवत २०२१, बुधवार, २२ नोव्हेंबर १९७२ रोजी महाकवी गुरू ज्ञानसागर यांनी संस्कारित करुन त्यांना आपले आचार्य पद सोपविले. एखाद्या आचार्यांनी वृद्धावस्थेमुळे आपले पद विसर्जित केले, अशी ही माहीत असलेली इतिहासातील पहिलीच घटना होती. स्वत: मुनी होऊन ते खालच्या आसनावर बसले. अतुलनीय शिष्य विद्यासागरजी यांनी शुक्रवार १ जून १९७३ रोजी गुरूंच्या आज्ञेनुसार समाधीमरण संस्कार केले.
त्यांच्या वैराग्य मार्गामुळे प्रभावित होऊन माता श्रीमंती आर्यिका समयमती जी, वडील मल्लपा हे मुनी श्री मल्लिसागर जी, भाऊ शांतिनाथ हे मुनी श्री समयसागर जी, अनंतनाथ हे मुनी श्री योगसागर जी, भगिनी शांता आणि सवर्णा ब्रह्मचारिणी झाले व सगळेच मोक्षमार्गाचे प्रवासी झाले. वर्तमान युगातील ही अद्वितीय घटना आहे. इतकेच नाही तर त्यांच्याकडून दीक्षा मिळालेले जवळपास १०० मुनिराज, २०० आर्यिका माता बाल ब्रह्मचारी आहेत. विज्ञानाच्या युगातील भौतिक झगमगाटापासून आरोग्य, शिक्षण, संस्कृती, भाषा, गोरक्षा व अहिंसेसोबत अध्यात्म धारण करून महामानव विद्यासागर देश व जगाला विनाशापासून वाचविण्याचा मार्ग प्रशस्त करत आहेत.

Web Title: Sukkam Tapopurti H.P. Vidyasagarji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.