शियांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना सुलेमानींच्या हत्येनं अमेरिकेचा खो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:18 AM2020-01-07T05:18:15+5:302020-01-07T05:26:44+5:30

सध्या भारताची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडेल.

Suleimani's assassination of Iran's attempt to establish Shia Muslims domination overthrows the US | शियांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना सुलेमानींच्या हत्येनं अमेरिकेचा खो

शियांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना सुलेमानींच्या हत्येनं अमेरिकेचा खो

Next

सध्या भारताची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडेल. यापुढे इराण आणि अमेरिकेत झडणाऱ्या चकमकींचे परिणाम जगाच्या अर्थकारणावर होतील. त्यात भारताचीही होरपळ होईल.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येला अनेक पैलू आहेत. सुलेमानी केवळ कमांडर नव्हते, तर इराणच्या साम्राज्यकांक्षेतील महत्त्वाचे नेते होते. इराण हा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न, विचारधारेने बळकट आणि शस्त्रसिद्ध असा देश आहे. तेलामुळे तो जगाच्या अर्थकारणावर प्रभाव टाकतो. आखाती देशांमध्ये शियांचे साम्राज्य उभे करण्याची व्यूहरचना इराणच्या राज्यकर्त्यांनी दोन दशकांपासून केली. कासिम सुलेमानी हे या व्यूहरचनेचे शिल्पकार होते. येमेनपासून लेबनॉन, सीरिया, इराक अशा देशांमध्ये इराणचा थेट प्रभाव (आर्क आॅफ इन्फ्लुअन्स) निर्माण करण्यात सुलेमानींचा वाटा महत्त्वाचा होता. इसिसला थोपविण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली होती. इस्राईलच्या विरोधातील हमासला ते सर्व बाजूंनी ताकद देत होते.


अमेरिकेच्या अनेक डावपेचांना सुलेमानी यांनी शह दिला होता. शिया साम्राज्याची भूक वाढत होती आणि सुन्नीपंथीय राष्ट्रांना इराणचा विस्तार खुपत होता. राष्टÑवादाच्या नावाखाली इराणचा दहशतवादी चेहरा म्हणूनही सुलेमानी ओळखले जात. हजारो अरब व अमेरिकी लोकांच्या हत्येला त्यांची कटकारस्थाने जबाबदार होती. अमेरिका व इस्राईलचे कट्टर विरोधक असले, तरी इसिस, अल्-कायदा वा पाकिस्तानच्या अंकित असलेल्या दहशतवादी टोळ्यांना सुलेमानी यांची बिलकूल साथ नव्हती. दहशतवादी टोळ्यांना पाठीशी घालण्यावरून सुलेमानी यांनी पाकिस्तानवर अलीकडेच उघड टीका केली होती. ते पाहता इस्लामी जगावर शियांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराणच्या प्रयत्नांना सुलेमानींची हत्या करून अमेरिकेने खो घातला आहे. सुलेमानी यांची हत्या ही सत्ताधीशाची हत्या आहे; दहशतवादी म्होरक्याची नव्हे. यामुळे ओसामा बिन लादेनपेक्षा ती महत्त्वाची समजली जाते. सुलेमानी यांना ठार मारण्यास जॉर्ज बुश व ओबामा यांनी परवानगी दिली नव्हती. इराणबरोबरचे संबंध किती ताणायचे, याबाबत या दोन अध्यक्षांची काही गणिते होती. ओबामा यांनी तर हे संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल केली. याउलट, ट्रम्प यांचा स्वभाव आहे. अविवेकी धाडस त्यांना आवडते. सुलेमानी यांना ठार केल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाश्चिमात्य चित्रपटात शोभणाºया होत्या. त्यानंतर मात्र त्यांनी सावध भूमिका घेतली. ‘इराण युद्ध जिंकत नाही; पण वाटाघाटींतही हरत नाही,’ असे म्हणत ट्रम्प यांनी चर्चेची दारे किलकिली करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, एकीकडे आणखी हल्ले करण्याची भाषा करण्याची धमकी देतानाच इराणशी चर्चा सुरू करणे सोपे नाही. सुलेमानींच्या हत्येमुळे अमेरिकेविरोधात शिया पंथीयांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, तर सुन्नी पंथीयांमध्ये समाधान आहे. सौदी अरेबिया हा सुन्नीबहुल देश अमेरिकेचा मित्र. इराणचा प्रभाव कमी होणे सौदीला आवडणारे आहे. मात्र, इराणला नमवणे सोपे नाही. राजनैतिक डावपेचांमध्ये हा देश अमेरिकेला हार जाणारा नाही. तेलामुळे रशियासह अनेक राष्ट्रांशी इराणचे मित्रत्वाचे संबंध आहेत. इराण हे अमेरिकेइतके बलाढ्य नसले तरी ताकदवान राष्ट्र आहे व अमेरिकेला टक्कर देण्याच्या मानसिकतेत आहे.

अमेरिका व इराण या दोघांच्याही मैत्रीची भारताला गरज आहे. अलीकडेच भारताने अमेरिकेशी संरक्षणाचे महत्त्वाचे करार केले. त्यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी तेहरानला जाऊन छाबार बंदराबद्दल बोलणी केली. अफगाणिस्तानातील भारतीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी हे बंदर व तेथून जाणारा रस्ता महत्त्वाचा आहे. या बंदरासाठी अमेरिकेने बँकहमी दिल्याचे अलीकडेच सांगण्यात आले. या प्रकल्पासाठी अमेरिका व इराण या दोघांची भारताला मदत हवी असतानाच ट्रम्प यांनी सुलेमानी प्रकरणात भारतालाही ओढले आहे. सध्या भारताची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडेल. इराण आणि अमेरिकेत युद्धाची शक्यता नसली, तरी चकमकी झडतील. त्याचे परिणाम जगाच्या अर्थकारणावर होतील आणि अमेरिकन निवडणुकीपूर्वीच्या ट्रम्प यांच्या या साहसवादात भारतासारख्या अनेकांची होरपळ होईल.

Web Title: Suleimani's assassination of Iran's attempt to establish Shia Muslims domination overthrows the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.