रफिक नावाचं शिखर

By admin | Published: May 25, 2016 03:29 AM2016-05-25T03:29:19+5:302016-05-25T03:29:19+5:30

अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या रफिक शेखने एव्हरेस्ट काबीज केले. हे यश मराठवाड्यासाठी ऊर्जा देणारे आहे. शिवाय येथील युवकांना नव्या क्षेत्राची ओळख करून देणारे आहे.

The summit of Rafiq | रफिक नावाचं शिखर

रफिक नावाचं शिखर

Next

- सुधीर महाजन

अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या रफिक शेखने एव्हरेस्ट काबीज केले. हे यश मराठवाड्यासाठी ऊर्जा देणारे आहे. शिवाय येथील युवकांना नव्या क्षेत्राची ओळख करून देणारे आहे.

रफिक नावाच्या तरुणाने इतिहास घडविला. दुष्काळी मराठवाड्यास त्याने थेट एव्हरेस्ट शिखरावर नेऊन बसवले. तो मराठवाड्यासाठी पहिला एव्हरेस्टवीर ठरला. औरंगाबादच्या कुशीत असलेल्या ठिपक्याएवढ्या नायगावातल्या या युवकाने थेट एव्हरेस्टवर धडक दिली; पण हा प्रवास सोपा निश्चितच नव्हता. पावला पावलावर जोखीम आणि जिवाशी खेळ. हिमालयातील बेभरवशाचे हवामान. येथे फक्त शारीरिक क्षमताच उपयोगाची नाही, तर मानसिक संतुलन आणि संकट समयी निर्णय क्षमता या गोष्टीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या. एकूण व्यक्तिमत्त्व आव्हान झेलणारे असले पाहिजे. रफिक या शब्दाचा अरबीमधील अर्थ हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा. रफिक म्हणजे, मित्र, सहचर, दयाळू आणि हळुवार इतकी वैशिष्ट्ये या नावात आहेत आणि ती त्याच्यात दिसतात.
नायगावचा रफिक औरंगाबादला आला आणि एन.सी.सी.चे वेड लागले. तेथून सुरू झाली फिटनेसची यात्रा. पुढे रनिंग आणि पोलीस दलात हवालदार. नोकरीतही वेड फिटनेसचे. याच वेडामुळे तो गिर्यारोहणाकडे वळला. छोटे-मोठे ट्रेक करताना हिमालयाने साद घातली. २००५ मध्ये त्याने हिमाचल प्रदेशातील माऊंट शितिघर आणि माऊंट सेव्हन सिस्टर ही दोन-पाच हजार मीटरपेक्षा जास्त असलेली शिखरे काबीज केली. उत्तराखंडातील माऊंट कॉमेट हे ७,७५६ मीटर उंचीचे शिखर त्याने २०१३ मध्ये सर केले आणि त्यानंतर एव्हरेस्ट त्याला खुणावू लागले. २०१३ ते १६ ही तीन वर्षे रफिकने एव्हरेस्टचे स्वप्न पाहिले नव्हे तर ध्यास घेतला. सतत एव्हरेस्टचा विचार केला. औरंगाबादच्या लगतचे डोंगर पादाक्रांत केले. छोट्या-मोठ्या ट्रेकमध्येही तो सहभागी झाला. गौताळा असो की अजिंठा नवागतांच्या ट्रेकमध्ये तो सहजपणे सहभागी व्हायचा, असे ट्रेक त्याच्यासाठी किरकोळ पण त्याच्यातला उत्साह नवागताइतकाच दिसायचा. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याला एव्हरेस्ट मोहिमेवरून दोन वेळा माघार घ्यावी लागली हे त्याचे मित्र सांगायचे. त्यावेळी त्याचे मोठेपण इतरांना कळायचे; पण या गोष्टीचा अभिमान म्हणण्यापेक्षा आजच्या काळात केले जाणारे ‘मार्केटिंग’ त्याने कधी केले नाही. हा विनय आणि साधेपणा त्याच्या ठायी आहे.
गेल्या दोन मोहिमा त्याला अर्धवट सोडाव्या लागल्या. २०१४ मध्ये हिमस्खलन झाले. यात १६ शेरपा मृत्यू पावले होते. त्यानंतर एव्हरेस्ट मोहीम नेपाळ सरकारने थांबविली. त्यानंतर २०१५ मध्ये मोहीम सुरू असताना काठमांडू येथे भूकंप झाला आणि त्याही वेळी मोहीम अर्धवट सोडून परत यावे लागले. लागोपाठ दोन वर्षांच्या अनुभवानंतरही तो खचला नाही, की निराश झाला नाही. या दोन्ही मोहिमांसाठी त्याला विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी आर्थिक मदत केली होती. या मदतीचे चीज झाले नाही ही बोचणी त्याच्या बोलण्यातून सतत जाणवत असे. या तिसऱ्या वेळी मदत कशी मागावी एवढे अवघडलेपण त्याला आले होते. मदतीसाठी मिळालेले लाखभर रुपये असो की, १० रुपये या प्रत्येकाची नोंद तो ठेवतो. एवढा सच्चेपणा त्याच्यात आहे. पहिल्या मोहिमेत मृत्यूचे तांडव पाहून तो हादरला नाही की, काठमांडू भूकंपात एव्हरेस्ट हलताना पाहून तो धास्तावला नाही. म्हणून त्याने तिसऱ्यांदा प्रयत्न केला. दुर्दम्य इच्छाशक्तीने त्याला यश मिळवून दिले.
रफिकच्या या एव्हरेस्ट विजयाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. गेल्या सहा महिन्यांपासून माध्यमांमध्ये मराठवाड्याचा दुष्काळ गाजतोय. त्यामुळे मराठवाडा हा दुष्काळी, मागास भाग अशीच प्रतिमा देशभर सध्या तयार झाली आहे. नकारात्मक अशी ही प्रतिमा आहे. तिला रफिकच्या या यशाने छेद दिला. गिर्यारोहणासारख्या ‘इंडिया’च्या क्षेत्रातही मराठवाडा मागे नाही हे दिसले. रफिकच्या यशाने मराठवाड्यातील युवकांसाठी गिर्यारोहणाचे क्षेत्र खुले करून दिले. या क्षेत्रातही भरारी घेता येते, असे आश्वासक वातावरण तयार झाले आहे.

 

Web Title: The summit of Rafiq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.