स्वतंत्र भारतातल्या 'परतंत्र' लोकांकडे आपले लक्ष आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 08:00 AM2023-08-15T08:00:10+5:302023-08-15T08:01:54+5:30
अनेक समाजगटांच्या नशिबी आजही पारतंत्र्य लिहिलेले आहे. त्यांच्या मुक्तीचा विचार हाच आता स्वातंत्र्याचा अर्थ असला पाहिजे आणि जबाबदारीही!
- विनायक सावळे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंनिस
आमच्या हायस्कूलला शिकवणारे सर चर्चेत होते. कारण त्यांच्या अंगात संतोषी माता यायची. ते दर शुक्रवारी शेवटच्या तासाला घुमायचे, घुमताना सगळेच विद्यार्थी आश्चर्याने, उत्सुकतेने, भयभीत होऊन त्यांना बघत असत. अविवाहित होते. अंगात संतोषी माता येते म्हणून मी विवाह करू शकत नाही, असे ते जाहीरपणे सांगत. शुक्रवारचं त्यांचं घुमणं गावातही चर्चेचा विषय. काही पालकांनी तक्रार केल्यावर मुख्याध्यापकांनी त्यांना समज दिली. आश्चर्य म्हणजे त्यांचं घुमणं पुढे कायम बंद झालं.
बारावीत एका विद्यार्थ्याच्या अंगामध्ये दशामाता यायला लागली. विद्यार्थी शाळेतच घुमू लागला. काही शिक्षकही त्याला नमस्कार करू लागल्यावर त्याचे प्रस्थ वाढले. चमत्कार करू लागला. तोंडातून विविध देवांच्या मूर्ती काढू लागला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याला आव्हान दिले. आव्हानातून त्याने पळ काढला. पुढे हे कमी कमी होत गेले आता जवळपास थांबले आहे.
तिसरे उदाहरण. तो मांत्रिक आहे. पस्तीशीचा. केस वाढलेले. कपाळावर कायम टिळा अंगावर ओढणी. कानात बाली. अंगात देवी येते असा त्याचा दावा. लोक त्याचा आशीर्वाद घ्यायला येतात. देवीचं करतो म्हणून अविवाहित राहण्याचा निर्णय. या तिन्ही सत्य घटना आहेत. त्यातील साम्यस्थळे नीट बघा. तिघांच्याही अंगात कोणती तरी देवी येते आणि अंगात देवी येते म्हणून आम्ही विवाह करणार नाही, असा त्यांचा निर्णय. वर न लिहिलेली एक माहिती पुढे सांगतो. तिघांचाही वर्तनव्यवहार हा समाजमान्यतेच्या संदर्भात लिंग-विपरीत स्वरूपाचा होता.
बाहेरून शरीराने जरी ते पुरुष दिसत होते तरी आतून मात्र त्यांच्यात स्त्री मन होते. शरीर-मनाच्या या गोंधळात तिघांनाही अंगात देवी आणण्याचा अंधश्रद्धेचा आधार घ्यावा लागला.. एक शिक्षक, एक विद्यार्थी तिसरा शेतकरी यात कोणीही प्रचंड बुवाबाजी करून पैसा कमावलेला नाही. अंधश्रद्धेचे पांघरूण घेऊन त्यांना आपली लैंगिक ओळख लपवायची होती. आपला मनोव्यापार अन्य पुरुषांसारखा नाही, याची जाणीव झाली, तेव्हा ते प्रचंड अस्वस्थ झाले असतील. रात्र रात्र विचार करत बसले असतील. कदाचित आत्महत्येचाही विचार केला असेल. आपण इतर पुरुषांसारखे नाही, वेगळे आहोत, हे स्वीकारणे प्रचंड जड गेले असेल. समाजात टिंगलीचा विषय झाले असतील. कदाचित अनेक टग्यांची लैंगिक शिकारही झाले असतील. कुटुंबात प्रचंड अपमानित झाले असतील. या सगळ्यातून स्वतः ची सुटका करण्यासाठी त्यांनी हा अंधश्रद्धेचा आधार घेतला असेल. सन्मानपूर्वक जगण्याच्या धडपडीतून निवडलेला हा मार्ग असेल....
पण स्वतःच्या इच्छा, आकांक्षा मारून जगणे हे कुठले सन्मानपूर्वक जगणे? अशा स्वरूपाची माणसे आपल्या अवतीभवती असू शकतात. त्यांचा लिंगभाव वेगळा असू शकतो, हे आपल्या सुसंस्कृत समाजाला अजून कळायचे आहे. एका सर्वेक्षणानुसार हे प्रमाण लोकसंख्येच्या १०% असू असते असे म्हटले आहे. म्हणजे आपले शहर जर एक लाख लोकसंख्येचे असेल, तर त्यात १०,००० माणसांच्या वाट्याला हे असले जिणे येत असावे.
भारतीय संविधानाने सांगितलेली समानता, स्वातंत्र्य, आत्मप्रतिष्ठा, सन्मानाने जगण्याचा अधिकार या सगळ्या मूलभूत अधिकारांपासून कोसो दूर असलेला हा आपल्याच समाजातील वर्ग आहे. आपल्या कुटुंबात, गल्लीत, गावात, आपल्या अवतीभवती ही माणसे आहेत. घुसमटलेली, तथाकथित संस्काराच्या आणि मूल्यांच्या ओझ्याखाली दबलेली, स्वत्व गमावून बसलेली. या घुसमटीतून सुटण्यासाठी त्यांच्या अंगात देवी घुमू लागली तर, यात दोष कोणाचा? त्यांचा की त्यांना न समजू शकणाऱ्या समाजाचा? पारतंत्र्यातून आपण मुक्त झालो, त्याला आता सत्त्याहत्तर वर्षे झाली. पण, आपल्या समाजातल्या अनेक गटांच्या नशिबी वेगवेगळ्या कारणांनी हे असले पारतंत्र्य आजही लिहिलेले आहे. त्यांच्या मुक्तीचा विचार हाच आपल्या आजच्या स्वातंत्र्याचा अर्थ असला पाहिजे आणि तीच जबाबदारीही!
vinayak.savale123@gmail.com