विचारी मनांसाठी आधार आणि तरुण लिहित्या हातांसाठी उमेद!
By विजय बाविस्कर | Published: May 25, 2024 11:09 AM2024-05-25T11:09:50+5:302024-05-25T11:10:52+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११९ वा वर्धापन दिन दि. २६ मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मराठी साहित्यविश्वाच्या या आधारवडाने दिलेल्या सुखद सावलीची चर्चा!
विजय बाविस्कर, समूह संपादक, लोकमत
ग्रंथकारांची मातृसंस्था म्हणून ज्या संस्थेचा उल्लेख केला जातो त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) मुहूर्तमेढ १९०६ मध्ये पुण्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात रोवली गेली. संस्था कितीही दिग्गज लोकांनी स्थापन केली, तरी तिचे भवितव्य ती चालवणाऱ्या पुढच्या पिढ्यांवरच अवलंबून असते. काही अपवाद वगळता ‘मसाप’ला सक्षम वैचारिक नेतृत्व लाभले. लिहित्या-वाचत्या लोकांसाठी वर्तमानकाळ किती कसोटीचा आहे, याची नेमकी जाणीव असलेले ‘मसाप’चे वर्तमान कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान कार्यकारी मंडळ काम करीत आहे.
पुण्यातील या संस्थेमध्ये प्रवेश करताना पूर्वी लोकांच्या मनावर अकारण ताण यायचा. कारण तिथला अतिशय चाकोरीबद्ध, इतरांना शिरकाव करू न देणारा साहित्य व्यवहार. लिहिणाऱ्या-वाचणाऱ्यांचा वर्ग प्रामुख्याने मुंबई-पुण्यातलाच असतानाच्या काळातले ते चित्र आज बदलले आहे. कसदार साहित्यनिर्मिती करून उर्वरित महाराष्ट्रातील लेखक मंडळींनी आपले स्थान साहित्य व्यवहारात निर्माण केले. या बदलाची नोंद न घेणाऱ्या शहरी साहित्य संस्था कालबाह्य ठरत गेल्या. या नेमक्या वळणावर ‘मसाप’ने मात्र ग्रामीण भागात आपल्या शाखांचा विस्तार केला आणि साहित्य चळवळ ग्रामीण भागात अधिक कशी फोफावेल, यादृष्टीने प्रयत्न केले. आज साहित्य परिषदेच्या ग्रामीण भागातील शाखा तेथील साहित्यिकांना उत्तेजन मिळावे यासाठी उत्तम कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत. कुटिल राजकारण, हेवेदावे यांनी ग्रासलेल्या साहित्य संस्थांच्या राजकारणाला फाटा देऊन मूळ कामाकडे लक्ष केंद्रित करण्याचे जे प्रयत्न विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केले, त्यामुळे ‘मसाप’मधले वातावरण बहरलेले दिसते. पुण्यासह महाराष्ट्रभरातल्या साहित्य संस्थांना जोडून घेण्यात्तून मसाप अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे तिथला राबता वाढला.
परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता ती अत्याधुनिक व्हावी असे साहित्यप्रेमींना वाटत होते. विश्वस्त डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. डी. पाटील, यशवंतराव गडाख, डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे यांनी या साठी पदरमोड केली, ही सांस्कृतिक विश्वातील लक्षणीय घटना होय! आज परिषदेचे सभागृह, कार्यालय, ग्रंथालय यात झालेला बदल सर्वांना सुखावणारा आहे. ते श्रेय पदाधिकाऱ्यांच्या कौशल्याचे, तत्परतेचेही! समाजजीवनात भाषा आणि साहित्य व्यवहारासमोर आव्हाने उभी राहतात तेव्हा साहित्य संस्थांनी भूमिका घ्यावी, अशी समाजाची किमान अपेक्षा असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पंतप्रधानांना लाखभर पत्रे पाठवण्यापासून दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यापर्यंत साहित्य परिषदेने आपले काम चोख केले. भाषा शिक्षणाच्या कायद्यासाठी कृतिशील पुढाकार घेतला. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देण्यासाठी साहित्य महामंडळाने केलेल्या घटनाबदलात महत्त्वाची भूमिका बजावली. दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटलायजेशन आणि नुकताच प्रकाशित केलेला ‘अक्षरधन’ हा संशोधन ग्रंथ यामुळे जुन्या ग्रंथांचे जतन आणि संशोधन यांनाही परिषद प्राधान्य देते, ही महत्त्वाची गोष्ट आहे. साहित्य परिषदेच्या पुरस्कार निवडीतील पारदर्शकता टिकविण्याचे आव्हान या संस्थेने यशस्वीपणे पेलले आहे. कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या मर्ढे (जि. सातारा) येथील घराची दुरवस्था झाली होती. परिषदेच्या सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेने मर्ढेकरांच्या घराचे स्वखर्चाने पुनरुज्जीवन केले. अशी कामे मार्गी लावण्यासाठी साहित्य संस्थांनी पुढाकार घेणे अपेक्षित असते, परिषदेने तो घेतला.
घटनेवर बोट ठेवून संस्थेला वेठीस धरणारे लोक सर्वत्र असतात, पण घटनेमध्ये कालोचित बदल अत्यावश्यक असतात. येत्या पन्नास-शंभर वर्षांचा काळ नजरेसमोर ठेवून ‘मसाप’ने हे आव्हान पेलण्याची वेळ आलेली आहे. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्थापन केलेल्या समित्यांचे मसुदे बासनातच राहिले, विद्यमान पदाधिकाऱ्यांना हे लक्षात ठेवून तत्परता दाखवावी लागेल.येणारा गुंतागुंतीचा काळ नवनवीन आव्हाने घेऊन येईल. त्या वाटांवरून चालू पाहणाऱ्या नव्या लेखकांना ‘मसाप’च्या वटवृक्षाचा आधार वाटत राहावा, हीच वर्धापन दिनाच्या निमित्ताने अपेक्षा...
vijay.baviskar@lokmat.com