मसापचे आश्वासक परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:32 AM2017-11-03T03:32:56+5:302017-11-03T03:33:31+5:30

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही

 The support of masap changes | मसापचे आश्वासक परिवर्तन

मसापचे आश्वासक परिवर्तन

Next

- विजय बाविस्कर

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य संस्थांची मातृसंस्था आहे. १ एप्रिल २०१६ रोजी परिषदेत परिवर्तन झाले आणि नव्या मंडळींनी गेल्या दीड वर्षांत केलेले काम 'परिवर्तना'ची साक्ष पटवून देणारे आहे, असे म्हणायला हरकत नाही. ही मंडळी केवळ सभागृहाचे नूतनीकरण किंवा इमारतीला बाहेरून रंगकाम करून थांबली नाहीत. परिषद आतून-बाहेरून बदलावी यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, ते अभिनंदनास पात्र ठरावेत.
कार्यक्रमांचे बदललेले रूप, मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवयित्री, एक कवी, लेखक तुमच्या भेटीला यासारखे सुरू झालेले नवे उपक्रम, त्यामुळे लोकांचा वाढलेला राबता, साहित्यविषयक काम करणाºया संस्थांना बरोबर घेऊन जाण्याची दाखविलेली तयारी, साहित्यातील सर्व प्रवाहांसाठी असलेली स्वागतशील भूमिका यामुळे परिषदेविषयी पूर्वी सर्वसामान्यांना वाटणारी तिरस्काराची भावना आणि हितचिंतकांना तिथे जाताना येणारे दडपण आता अनुभवायला येत नाही, अशी चर्चा साहित्यिक आणि साहित्यरसिक करतात तेव्हा परिषद योग्य मार्गाने चालली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये .
विद्यमान पदाधिकाºयांनी परिषदेचे पुणे शहर परिसरापुरते मर्यादित असलेले काम ग्रामीण भागापर्यंत पोहचवून ग्रामीण भागातील वाङ्मयीन कार्यकर्ते आणि साहित्यिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले. संमेलनापर्यंत रसिकांना पोहचणे शक्य नसेल तर रसिकांपर्यंत संमेलनांनी पोहचले पाहिजे, या भूमिकेतून साहित्य परिषदेने अजनुज (ता. खंडाळा जि. सातारा ) येथे घेतलेले परिषदेच्या इतिहासातले पहिले शिवार साहित्य संमेलन लक्षणीय ठरले.
न्या. रानडे यांनी पहिल्या ग्रंथकार संमेलनाचे महात्मा फुले यांना निमंत्रण पाठविले होते, ते त्यांनी नाकारताना या संमेलनात शेतकरी, शेतमजुरांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अपेक्षेची पूर्तता १११ वर्षांनंतर होताना दिसते आहे, हे शुभचिन्ह आहे. कारण याच शिवारातल्या माणसांनी मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, शाखा मेळावा हे उपक्रम ग्रामीण भागात घेण्याचा परिषदेचा निर्णयही स्वागतार्ह आहे. आजच्या बालकुमारांची साहित्याशी असलेली नाळ तुटत चालली आहे. जिल्हावार एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलने घेण्याचा परिषदेचा निर्णय स्वागतार्ह आहे. पदाधिकाºयांनी अल्पावधीतच लोणावळ्यात धुंवाधार पाऊस असतानाही मनशक्ती केंद्राच्या सहकार्याने अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली जे बालकुमार साहित्य संमेलन घेतले, ते कमालीचे यशस्वी झाले. अंदरमावळातल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी या संमेलनात सहभागी झाले होते. आता परिषदेने ग्रंथालयाचा कायापालट करण्याची गरज आहे. दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनसाठी युद्धपातळीवर प्रयत्न हवेत. समृद्ध परंपरा असलेल्या म. सा. पत्रिका या मुखपत्राकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. ही पत्रिका त्याच त्या लेखकांना सतत लिहिण्याची संधी देते किंवा त्याच त्या लेखकांवर पुन्हा पुन्हा लिहून येते, अशी चर्चा साहित्य वर्तुळात आहे. संपादकांनी कल्पकता दाखवून पत्रिकेचे संदर्भमूल्य कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. परिषदेच्या तरुण नेतृत्वाची कार्यतत्परता, उत्साह भविष्यातही टिकायला हवा.

Web Title:  The support of masap changes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे