समजा, माणसाला अदृश्य होता आले, तर?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 09:50 AM2023-05-13T09:50:55+5:302023-05-13T09:51:16+5:30
या कल्पनेच्या भुंग्याने शेकडो, हजारो वर्षांपासून माणसाचे डोके खाल्ले आहे. आपण कुणाला दिसतच नाही; याने माणसाला सुख मिळेल की दु:ख?
श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
माणसाला खरेच अदृश्य होता येईल का? तसे घडले तर काय गमतीजमती घडतील, या कल्पनेचा भुंगा शेकडो, हजारो वर्षांपासून डोके खात आला आहे. प्राचीन दंतकथांपासून ते अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनापर्यंत हा भुंगा स्वस्थ बसू देत नाही. तशी दैवी शक्ती लाभली तर तिचा उपयोग माणसांच्या भल्यासाठी होईल की काही वाईट गोष्टीही घडतील, हा त्या कल्पनेच्या भरारीतून जन्मणारा पुढचा प्रश्न आहे. अशी कोणतीही कल्पना सृजनाला तसेच संशोधनाला चालना देते. चित्रपट, कथा व कादंबऱ्यांमधून तिला सृजनाचे पंख फुटतात तर प्रयोगशाळेत संशोधनासाठी दिवस व रात्री खर्ची पडतात.
या कल्पनेला लिखित स्वरूपाचा किमान दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. ग्रीक दंतकथेमधील मेडुसा, स्थिनो व युरायली या दुर्जन बहिणींनी त्रासलेल्या समाजाची सुटका करणाऱ्या अपोलोला अदृश्य करणारी ‘कॅप ऑफ हेडीज’ ही टोपी सापडली होती. थोर तत्त्ववेत्ता प्लेटोच्या रिपब्लिकमध्ये सॉक्रेटिस व ग्लॉकॉन यांच्या संवादात जैजीज नावाच्या मेंढपाळाला एका मृतदेहावर सापडलेल्या चमत्कारी अंगठीचा उल्लेख आहे. मेंढपाळांना कळपाचा हिशेब राजाला नियमितपणे द्यावा लागत असे. तो देताना अंगठी घातलेल्या मेंढपाळाला त्याच्याकडे अदृश्य होण्याची शक्ती असल्याचे लक्षात आले. मग त्याने राजाला छळले, राणीची छेड काढली, राज्य बळकावले. त्याला अमर्याद शक्ती व सत्तेचा मोह झाला व त्यातच त्याचा अंत झाला. अमर्याद सत्तेचा मोह कसा वाईट असतो, यासाठी सॉक्रेटिसने ही कथा ग्लॉकॉनला सांगितली. याचाच अर्थ अदृश्य होण्याची शक्ती नेहमी दैवी वरदानच असते असे नाही. आपण कुणाला दिसत नाही, आपले काही अस्तित्वच नाही, ही बाब अधिक वेदनादायी असते. अदृश्यता शाप ठरतो.
अदृश्य होण्याच्या दैवी शक्तीवर आधारित २०२० मधील ‘द इनव्हिजिबल मॅन’ हा चित्रपट ज्यावर बेतला ती एच. जी. वेल्स यांची कादंबरी १८९७ची. यातूनच या कल्पनेभोवती काळ कसा थांबला हे लक्षात यावे. यातील नायक त्याच्या जुन्या प्रेयसीवर लक्ष ठेवण्यासाठी त्या शक्तीचा वापर करतो. जे. आर. आर. टोलकिनच्या ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या जुन्या तीन चित्रपटांच्या मालिकेचा नायक याच वेदनेतून वेडा होतो. व्हिक्टर रौसोच्या ‘द इनव्हिजिबल डेथ’मधील अदृश्य राजा तशाच सैन्याच्या मदतीने अमेरिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करतो. एडवर्ड पेज मिचेलच्या ‘द क्रिस्टल मॅन’मधील प्रयोगशाळा मदतनीसालाही हा शाप भोवतो. तो आत्महत्या करतो.
या विषयावरचे देशी साय-फाय म्हणता येतील असे आपले भारतीय चित्रपट मात्र भाबडे. त्यात ही शक्ती म्हणजे वरदानच जणू. १९८७ सालच्या सुपरहिट ‘मिस्टर इंडिया’मध्ये नायक अनिल कपूर दुर्जनांचा नाश करण्यासाठी ही शक्ती वापरतो. सोबतच श्रीदेवीशी दिसण्या, न दिसण्याचा लपंडावही खेळतो. त्याआधी १९७१ च्या के. रमणलाल दिग्दर्शित ‘एलान’मध्ये पत्रकार विनोद मेहराला त्या ग्रीक मेंढपाळासारखीच अद्भुत अंगठी सापडते व जटील गुन्ह्यांची पाळेमुळे तो शोधून काढतो. अपवाद, १९६४ मधील ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’ या चित्रपटाचा. त्यात कुमकुमचे वडील अदृश्यपणा देणारे द्रावण तयार करतात. ते प्यायल्याने त्यांच्या सहायकाचा मृत्यू होतो. मदन पुरी त्यांना ब्लॅकमेल करून कुमकुमशी लग्न करतो. ती मात्र किशोरकुमारच्या प्रेमात पडते.
प्लेटोच्या मेंढपाळाच्या चमत्कारी अंगठीने पुढे मनगटावरचे घड्याळ किंवा प्रयोगशाळेतील द्रावण, यंत्राचे रूप घेतले. २००६ साली ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात, सेंट अँड्र्यूज विद्यापीठ, ड्युक विद्यापीठ व इम्पेरियल कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी दावा केला, की मेटामटेरियल्सचे क्लोकिंग म्हणजे व्यक्तीभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक आवरण तयार केले तर तो पारदर्शक बनू शकतो. त्याआधी टोक्यो विद्यापीठातील सुसुमू ताची व सहकाऱ्यांनी रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी शोधल्याचा दावा केला होता. रस्त्यावर उभ्या व्यक्तीभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंग तयार केले तर ती व्यक्ती पारदर्शक बनते, त्याच्या मागून जाणारी वाहने स्पष्ट दिसतात, असा व्हिडीओ त्या प्रयोगाचे यश म्हणून जारी करण्यात आला. तो अजूनही यूट्यूबर आहे. याशिवाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक तरंगांचा उपयोग भूकंपाची आगाऊ सूचना देण्यासाठी होऊ शकेल, असे मानणारे अनेक संशोधक आहेत. भूकंपापूर्वीची स्पंदने, आवाज व प्रकाशाचे सूक्ष्म तरंग टिपण्यासाठी झाडांचा वापर कसा करता येईल यावर संशोधन सुरू आहे. कारण, झाडे त्या स्पंदनांचा, तरंगांचा प्रतिध्वनी टिपू शकतील.