समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर...
By विजय दर्डा | Published: May 22, 2023 07:37 AM2023-05-22T07:37:53+5:302023-05-22T07:38:45+5:30
परिस्थिती सुधारली नाही, तर १९७१ ची नौबत येऊ शकते, पुन्हा पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात, असे इम्रान खान म्हणाले. असे होऊ शकेल?
-डाॅ. विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड,
लोकमत समूह
पाकिस्तानात सध्या काय चालले आहे, हे आपण सर्व जण जाणतो. इम्रान खान आणि लष्करामध्ये संघर्ष पेटला आहे. आजवर पाकिस्तानातला कोणताही राजकीय नेता लष्कराविरुद्ध टिकू शकलेला नाही. अर्थात, इम्रानसारखे आव्हानही आजवर कुणी सैन्याला दिलेले नाही, हेही तितकेच खरे! या संघर्षात कोणाची सरशी होईल, हे आताच सांगता येणार नाही. आजघडीचा सर्वांत मोठा प्रश्न हा, की पाकिस्तानात १९७१ ची पुनरावृत्ती होऊ शकते का? खुद्द इम्रान खान यांनी तशी चिंता जाहीरपणे प्रकट केली आहे. इम्रान यांच्या म्हणण्याचा साधा अर्थ असा की, पाकिस्तानचे दोन तुकडे होतील.
खरोखरच असे काही घडेल?- आताच तसे म्हणता येणार नाही; पण १९७१ च्या आधीही तशी शंका कोणी घेतली नव्हती. पाकिस्तान आपल्या पूर्वेकडच्या प्रदेशावर दमनचक्र चालवीत होता तेव्हा बांगलादेश जन्माला येईल, असे कोणाला वाटले होते? त्यावेळी शेख मुजिबूर रहमान यांच्या अवामी लीगने पाकिस्तान नॅशनल असेंब्लीत ३०० पैकी १६७ जागा जिंकल्या होत्या; परंतु जनरल याह्याखान यांनी त्यांना सत्तेवर येऊ दिले नाही. पूर्व पाकिस्तानमध्ये लष्कराने घनघोर दमनचक्र सुरू केले. लोक भारतात पळून येऊ लागले. पाकिस्तानच्या मागे अमेरिका असल्याने जगाने डोळे मिटून घेतले; परंतु भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मोठ्या धैर्याने परिस्थितीचा सामना केला. पाकिस्तान आणि भारतात युद्ध झाले, त्यात पाकिस्तानचा पराभव झाला. पूर्व पाकिस्तानचा बांगलादेशच्या रूपात पुनर्जन्म झाला. कालांतराने याह्याखान यांनी षड्यंत्र रचून मुजिबूर रहमान यांना ठार केले. रशियाने भारताला या षड्यंत्राची कल्पना दिली होती; परंतु ती माहिती काही तास आधी मिळाली असती, तर कदाचित मुजिबूर रहमान यांचा जीव वाचवता आला असता.
पाकिस्तानचे दोन तुकडे होऊ शकतात, असे इम्रान खान यांना का वाटते आहे, हे सांगणे कठीण! परंतु पाकिस्तान या क्षणाला जर्जरावस्थेत आहे आणि डागडुजी झाली नाही तर घर कोसळायला वेळ किती लागतो? पाकिस्तानचा पायाच कच्चा आहे. भारताच्या केवळ एक दिवस आधी स्वातंत्र्य मिळवणाऱ्या या देशाला राज्यघटना तयार करायला नऊ वर्षे लागली होती. पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री योगेंद्रनाथ मंडल यांनी भारतातले नामांकित वकील राम जेठमलानी यांच्याकडूनही मदत घेतली होती. तरीही तिथली घटना अशी तयार झाली की, मनात येईल तेव्हा सैन्याने तिच्या चिंधड्या उडवल्या. जगाला दाखवण्यासाठी १९५६ साली पाकिस्तान प्रजासत्ताक झाला; परंतु तिथल्या तंत्रात प्रजेसाठी जागा कधीच मिळाली नाही. तसा प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेत्याची सत्ता एकतर उलथवली गेली किंवा तो अल्लाला प्यारा झाला.
पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडीत हत्या झाली. त्यानंतर त्या देशात अशा हत्यांचा सिलसिला सुरू झाला. पाकिस्तानात प्रजासत्ताक केवळ कागदावर दिसते. आहे ते केवळ सैन्य. इम्रान यांचा अपवाद वगळता लोकांमध्ये प्रिय असा एकही नेता आज त्या देशात नाही. तरुणवर्ग इम्रान खान यांचा दिवाना आहे. इम्रान पाकिस्तानचे भले करतील, असे त्यांना वाटते; परंतु इम्रान यशस्वी व्हावेत, असे चीनला वाटत नाही. सेनादले आणि आयएसआय यांच्या षड्यंत्रांमुळे पाकिस्तानमधील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था केव्हाच संपली आहे. केवळ सैन्याचीच सत्ता दिसते. पाकिस्तानच्या सैन्यदलांच्या ताकदीचीही कल्पना करणे कठीण आहे. भारताशी आजवर झालेल्या युद्धात पाकिस्तानला माती खावी लागली आहे. अमेरिकेकडून सर्व प्रकारची मदत मिळूनही, आधुनिक शस्त्रे, लढाऊ विमाने आणि रणगाडे मिळूनही, आतून चीनची पूर्ण साथ मिळूनही भारताच्या पराक्रमी सैन्याने पाक सैन्याच्या चिंध्या उडवल्या.
भारताला त्रास देण्यासाठी त्यांनी दहशतवाद्यांना पाळले; तेच त्यांच्यावर उलटले. साप पाळाल तर एक दिवस तोच तुम्हाला डसल्याशिवाय राहणार नाही, असे हिलरी क्लिंटन यांनी पाकिस्तानला म्हटले होते. आता पाकिस्तानच्या सैन्यावर दहशतवाद्यांचा हल्ला झाला नाही, असा एकही महिना जात नाही.
‘तेहरिके तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या नावाची दहशतवादी संघटना तर खुलेआम पाकिस्तानवर ताबा मिळवण्याची भाषा करत असते. अफगाणिस्तानला लागून असलेल्या मोठ्या प्रदेशात पाकिस्तानी सैन्याची नव्हे, तर या टीटीपी संघटनेची वट आहे. गतवर्षी डिसेंबरमध्ये खैबर पख्तूनख्वामध्ये टीटीपीने सैन्याच्या ३० जणांना ओलिस ठेवले होते. टीटीपीमध्ये तालिबान्यांबरोबर अल कायदा आणि इस्लामिक स्टेटचे दहशतवादी येऊन मिळाले आहेत. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचे षड्यंत्र रचल्याचा संशय ज्यांच्यावर आहे त्या बैतुल्ला मसूदने हे सगळे संघटन केले असल्याचे बोलले जाते. मसूद हीसुद्धा आयएसआयचीच निर्मिती आहे. आज देशात शरियत कायदा लागू करण्याची मागणी टीटीपी उघडपणे करते. सैन्यावर हल्ल्याच्या गोष्टी केल्या जातात. देशाच्या उत्तर भागात टीटीपीचे घोषित सरकार असून त्याचे मंत्रिमंडळही आहे. पाकिस्तानी सेना त्यांचे काहीही बिघडवू शकलेली नाही. गतवर्षी जवळपास २७५ सैनिकांना टीटीपीने ठार केले. दुसरीकडे गिलगिट बाल्टिस्तानच्या प्रदेशात पाकिस्तानविरुद्ध सतत आंदोलने होत आहेत. कारगिलपर्यंतचा रस्ता खुला केला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. या भागातील लोक पाकिस्तानला वैतागले आहेत. स्वतंत्र होऊन ते काश्मीरमध्ये येऊ इच्छितात. तिथल्या अल्पसंख्याकांचे भारतावर प्रेम आहे.
या पार्श्वभूमीवर एके दिवशी पाकिस्तानचे खरेच तुकडे पडले, तर आश्चर्य नव्हे! या संपूर्ण देशाचा रिमोट कंट्रोल सैन्याकडे आहे. सैन्याचा रिमोट कंट्रोल पूर्वी अमेरिकेकडे असायचा, आता चीनकडे आहे. त्यांच्या तालावर नाचण्यास नकार दिल्यानेच इम्रान सत्तेवरून गेले.
एक नक्की : पाकिस्तानने आत्मघाताचे बटन दाबले आहे. या सगळ्या धामधुमीत पाकिस्तानची अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती न लागोत म्हणजे झाले. आता खुदाच पाकिस्तानचे रक्षण करो!