सुरेश भटांचे कृतघ्न विस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 03:32 AM2018-03-20T03:32:44+5:302018-03-20T03:32:44+5:30
कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा परवा स्मृतिदिन होता. नागपुरात सुरेश भटांच्या नावाने असलेल्या सांस्कृतिक सभागृहात मात्र त्या दिवशी सामसूम होती. भटांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करायला कुणीच आले नाही. एरवी कळपाने जयंती-पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघालासुद्धा त्या दिवशी भटांचा विसर पडला. नागपुरात साहित्य संस्थांचा सुकाळ आहे.
- गजानन जानभोर
कविश्रेष्ठ सुरेश भट यांचा परवा स्मृतिदिन होता. नागपुरात सुरेश भटांच्या नावाने असलेल्या सांस्कृतिक सभागृहात मात्र त्या दिवशी सामसूम होती. भटांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करायला कुणीच आले नाही. एरवी कळपाने जयंती-पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विदर्भ साहित्य संघालासुद्धा त्या दिवशी भटांचा विसर पडला. नागपुरात साहित्य संस्थांचा सुकाळ आहे. भटांच्या पुण्याईवर मोठी झालेली माणसेही त्यात आहेत. पण, तीही कृतघ्न झालीत. या नतद्रष्ट्यांनी भटांची आठवण ठेवली नाही म्हणून भट विस्मृतीत जाणार नाहीत. आपल्या निसर्गदत्त प्रतिभेने समाजमन समृद्ध करणा-या माणसांचा विसर पडणे ही गोष्ट त्याकाळातील माणसांची संस्कृती आणि प्रवृत्ती अधोरेखित करीत असते. भटांची गझल, कविता सामान्य माणसांसाठीच होती. ती दुर्बोध नाही आणि एकलकोंडीही नव्हती. माणसात रमणारा आणि त्याच्या जगण्याची कविता लिहिणारा हा खºया अर्थाने ‘महाकवी’ होता. भटसाहेबांची कविता अंत:प्रेरणेतून आलेली होती. जुन्या इंग्रजी कविता किंवा कादंबºया वाचून त्यांना ती स्फूरली नाही, त्यामुळे त्यांच्या कवितांवर अमक्या-टमक्यांचा प्रभाव होता, असे म्हणण्याची बिशाद मराठीच्या कुठल्याही समीक्षकात नव्हती.
भटसाहेब कलंदर होते. ‘फाटक्या पदरात माझे मावेल अंबर...दानही करशील तू पण मी असा आहे कलंदर’ असे असूनही त्यांचा संसार शुन्याचा पण सुखाचा होता. आपल्या पश्चात आपले स्मरण व्हावे, जयंती-पुण्यतिथी लोकांनी साजरी करावी अशी संस्थात्मक तजवीज या अवलियाने कधी करून ठेवली नाही. नागपुरात भटांचे साधे घरही नाही. पण, मराठी कवितेला जनाभिमुख करणाºया या श्रेष्ठ कवीची आठवण राहावी म्हणून नितीन गडकरींनी जिद्दीला पेटून नागपुरात त्यांच्या नावाचे जागतिक दर्जाचे सांस्कृतिक सभागृह महानगरपालिकेला उभारायला लावले. पण, मनपातील आपलीच माणसे अशी दळभद्री निघतील याची कल्पना बहुदा गडकरींनाही नसावी. ज्येष्ठ नेते सुसंस्कृत असून उपयोग नाही, त्यांचे कार्यकर्तेही तसेच निपजावे लागतात. ज्या महापालिकेत आलिया भटशी सुरेश भटांचे नाते जोडणारे ‘महाज्ञानी’ नगरसेवक आहेत तिथे त्यांचा विसर पडावा हे एका अर्थाने बरेच झाले. नागपूर विद्यापीठालाही त्यांच्या नामस्मरणाची गरज वाटू नये, ही बाबसुद्धा तेवढीच संतापजनक आहे. विदर्भ साहित्य संघाबद्दल तर आता काहीच बोलायला नको. विदर्भाच्या साहित्य चळवळीचे नेतृत्व करणाºया या संस्थेवर टीका करायलाही अलीकडे लाज वाटू लागली आहे. भट जिवंत असताना विदर्भ साहित्य संघांशी त्यांनी उभा दावा मांडला होता. भटांबद्दलचा तो राग या कद्रू पदाधिकाºयांच्या मनात अजूनही आहे का, असा प्रश्न कुणी विचारला तर तो चुकीचा ठरू नये.
भटसाहेबांसारखी माणसे कोणत्याच कळपात रमली नाहीत. ती कुणाच्या सावलीतही कधी नव्हती. ते स्वतंत्र वादळ होते. भट सतत अस्वस्थ असायचे. त्या अस्वस्थतेतूनच त्यांनी जे काही लिहिले ते अक्षय ठरले. म्हणूनच आजही साºयांच्याच मनात त्यांच्या कवितांना अढळ स्थान आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळात भटांच्या ‘लाभले आम्हास भाग्य...’ या मराठी गौरव गीताचे जाहीर वाचन होेते. पण, त्याचवेळी मात्र त्यांच्या गावातील माणसे अशी बेईमान व्हावीत हा विषण्ण करणारा अनुभव आहे. ज्यांना या श्रेष्ठ कवीचे विस्मरण झाले त्यांचे स्मरण तर सोडा साधे नावही उद्या जगाला आठवणार नाही. पण, भट असे विस्मृतीत जाणार नाहीत. त्यांनीच लिहून ठेवले आहे, ‘राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी...’